समाजमनाचा कल कोण ठरविणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2018
Total Views |

 
2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेध सुरू झाले आहेत. राजकीय पक्ष तर फार पूर्वीच कामी लागले आहेत. विविध गठबंधन, आघाड्या वगैरे तयार होताना दिसत आहेत. विरोधी पक्षांना नरेंद्र मोदींचा पराभव करायचा आहे. परंतु, मोदींचा पराभव कसा करायचा याचा मार्ग मात्र या मंडळींना अजूनही गवसत नाही आहे. देशातील गरीब, कष्टकरी आणि ज्यांचे हातावर पोट आहे अशी मंडळी, आपल्या उदरनिर्वाहाच्या कामात इतकी गुंतली आहे की, त्यांना 2019च्या निवडणुकीचा आजपासूनच विचार करण्याची सवड नाही. पण, देशातील मध्यमवर्गीय चाकरमानी समाज मात्र अत्यंत उत्सुकतेने, चवीने निवडणुकीची चर्चा करताना दिसत आहे. कुठेही चार-पाच जण भेटले की चर्चा, 2019 मध्ये कोण निवडून येणार, यावर येतेच. प्रत्येक जण आपापल्या अनुभवांवरून, आपापल्या योग्यतेवरून मत प्रदर्शित करताना दिसतो.
 
या अशा अनेक चर्चांचा धांडोळा घेतला, त्यांच्यात सहभागी झालो असता, सर्वांचे एका बाबतीत एकमत होताना दिसते व ते म्हणजे- 2014 सारखी 2019 साली मोदींची लाट नाही. भाजपाला बहुमत प्राप्त करण्यासाठी कसून मेहनत घ्यावी लागणार आहे. मग कुणीतरी त्यांना म्हणते की, बाबांनो! 2014 साली मोदींची लाट होती, हे तुम्हांस केव्हा समजले? निकालानंतरच ना! मग 2019 साली मोदींची लाट आहे की नाही, हे निकालानंतरच समजेल की! त्याचा युक्तिवाद ही मंडळी बळेबळेच मान्य करतात. काही वादविवादपटू, मोदींनी हिंदू समाजाचा कसा विश्वासघात केला, यावर पोटतिडिकेने बोलत असतात. 2014 साली देशातील बहुसंख्य हिंदूंनी नरेंद्र मोदींना मतदान केले. या देशात स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांपासून हिंदूंची सर्वार्थाने जी अवहेलना होत आहे, ती मोदी थांबवतील, या आशेपोटी त्यांनी मोदींना बहुमताने निवडून दिले. परंतु, गेल्या साडेचार वर्षांत मोदींनी निराशा केली, असा यांचा आरोप असतो. निराशेचे मुख्य कारण म्हणजे अयोध्येत राममंदिराचे अजून काहीही झाले नाही. मध्यंतरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गंमतच केली. ते म्हणाले, नरेंद्र मोदींनी जशी एका झटक्यात नोटबंदी लागू करून हजार व पाचशेच्या जुन्या नोटा रद्द केल्यात, तसे एका झटक्यात ते राममंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा का करत नाहीत? तसे पाहिले तर प्रश्न नक्कीच टाळ्याखाऊ आहे, पण तर्कहीन आहे.
 
आर्थिक स्तरावरचे प्रश्न जितक्या तातडीने सोडविता येतात, तितक्या झटपट सामाजिक प्रश्न सोडविता येत नाहीत. कुठला तरी निर्णय तडकाफडकी घेऊन टाकायचा आणि नंतर तोंडघशी पडायचे, असला उपद्व्याप तात्कालिक समाधान देणारा असला, तरी तो मुत्सद्देगिरीचा म्हणता येत नाही. राममंदिराचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे आणि हे न्यायालय आपल्या प्रसिद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण कूर्मगतीने त्याची सुनावणी करत आहे. तसेही श्रद्धेच्या प्रश्नात न्यायालय खूप काही करू शकते असे नाही. परंतु, अयोध्येची ती जमीन मूळ कुणाची? तिथे आधी राममंदिर होते की मशीद, यावर न्यायालय निर्णय देणार आहे. निर्णय कुठलाही येवो, एका पक्षाला तो मान्य नसणार. त्या वेळी परिस्थिती काय वळण घेते, हे आज सांगता यायचे नाही. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाची वाट बघण्यापलीकडे सरकार काहीही करू शकत नाही. ही सर्व वस्तुस्थिती असताना, मोदी सरकारने हिंदूंसाठी काहीही केले नाही, असे म्हणणे कितपत सयुक्तिक आहे, याचा ज्याने त्याने विचार करावा.
 
 
नोटबंदी आणि पाठोपाठ आलेल्या जीएसटीमुळे, भाजपाचा कथित परंपरागत मतदार-व्यापारी नाराज आहे, असे सांगण्यात येते. तेही कितपत सत्य आहे, हे पडताळून पाहिले पाहिजे. मोदींनी भ्रष्टाचार खणून काढला पाहिजे, म्हणून त्यांच्याबाबत अपेक्षा ठेवायची; मोदी या संदर्भात काहीही करत नाही म्हणून विरोधी पक्षांनी त्यांची टवाळी करायची आणि मोदी खरोखरच भ्रष्टाचार खणायला बसले की, ‘हे नाराज, ते नाराज’ असे म्हणत सुटायचे! याची कशी काय संगती लावायची, हे मध्यमवर्गीयांनी तसेच व्यापार्‍यांनी सांगितले पाहिजे. 70 वर्षांपासूनच्या सवयी अंगात मुरविलेल्या नोकरशाहीच्या मदतीने, तसेच फक्त आपल्या स्वार्थापुरते पाहण्याच्या सवयीने संकुचित मानसिकता झालेल्या नागरिकांना सोबत घेऊन, नरेंद्र मोदींना हा राज्यकारभाराचा शकट ओढायचा आहे. न्यायपालिकाही आपले काही नाठाळ गुणवैशिष्ट्ये घेऊन उभी असते. हे सर्व पाहिले तर सहजच लक्षात येईल की, साडेचार वर्षांच्या काळातही मोदी सरकारने खूप काही केले आहे. खूप काहीचा आरंभ केला आहे आणि खूप काहीचे संकल्प सोडले आहेत. मोदी सरकारमुळे या देशात जे काही (थोडेफार म्हणा हवे तर) बदल झाले आहेत, ते स्वप्नवत वाटावे असेच आहेत. ते काहीही असो; पण चर्चेचा एकूणच सूर, मोदींचे कसे होणार? असाच असतो.
 
 
एक गोष्ट आम्ही नेहमीच विसरतो की, 2014 सालचा भाजपाचा नेत्रदीपक विजय केवळ नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या कर्तबगारीचा नाही. मोदी येतात, सभा घेतात आणि तिथे कधीही न जिंकलेली भाजपा जिंकते. इतके सोपे समीकरण ज्यांना वाटते, त्यांचे कौतुकच केले पाहिजे. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी 2014 सालच्या विजयादशमी उत्सवात भाषण करताना म्हटले होते की, जनतेची इच्छा होती म्हणून हे सत्तापरिवर्तन झाले. 2014 सालच्या सत्तापरिवर्तनाचे हे अत्यंत चपखल विश्लेषण आहे. पण, जनतेने काय ठरवायचे, हे कोण ठरविणार? ही राजकीय मंडळी ठरवू शकते काय? त्यांची ती क्षमता त्यांनी केव्हाच गमविली आहे. समाजात गेली अनेक वर्षे निरलस, नि:स्पृहपणे कार्य करणारी लाखो मंडळी आहेत. ज्यांना सत्तेने कधी मोहविले नाही, ज्यांनी देशाशिवाय दुसरा कधी विचारही केला नाही, प्रसंगी समाजाचे तसेच सत्ताधार्‍यांचे जीवघेणे टोमणे व अन्याय निमूट सहन करीत जी मंडळी आपले समाजसेवेचे कार्य सातत्याने करीत राहिली, ती मंडळीच जनतेची मानसिकता घडविण्यास समर्थ असते. कुणी कितीही किंचाळून, नाना उदाहरणे देऊन, प्रतिपक्षाची लक्तरे वेशीवर टांगून आपली बाजू पटवून देत असला, तरी त्याचा जनतेवर प्रभाव पडतोच असे नाही. परंतु, जो आपल्या सुख-दु:खात, गरजेच्या वेळी सख्ख्या भावा-बहिणीसारखा पाठीशी उभा राहतो, त्याचाच प्रभाव अधिक व कायम असतो. कुणी काहीही म्हणो, मला जो अनुभव आला आहे, तोच खरा, असेच प्रत्येक जण म्हणत असतो. मोठमोठ्या विद्वानांनी कितीही तर्काने पटवून देण्याचा प्रयत्न केला की, निखारा शीतल असतो; पण माझा अनुभव, निखारा चटका देतो, असा असेल तर मी त्या विद्वानांच्या प्रतिपादनाकडे चक्क पाठ फिरवतो. भारतीय जनतेचे मत, कल तिच्या अनुभवांवर आधारित असते. 2014 साली या समाजहितेैषू मंडळींनी, आपल्या इतक्या वर्षांच्या कामामुळे जनतेच्या मनात असा विश्वास निर्माण केला की, यावेळी सत्तापरिवर्तन केले तरच या देशाचे काही खरे आहे.
 
 
अन्यथा हा देश रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही. तो विश्वास काम करून गेला. सत्तापरिवर्तन झाले तरीही ही मंडळी आपल्या स्वीकृत कार्यातच मग्न राहिली. आताही 2019 साली, भारतीय जनता या मंडळींच्या मतालाच प्राधान्य देणार, यात शंका नाही. आज विरोधी पक्ष जो हादरलेला दिसत आहे, तो यामुळेच. समाजमनाचा कल ठरविणारी ही मंडळी कुणाच्याच आदेशाला किंवा उपकाराला जाणत नाही, ती केवळ देशहितालाच जाणते, ही वस्तुस्थिती असल्यामुळे या सर्वांचे धाबे दणाणले आहे. हे आपण समजून घेतले पाहिजे. अशा स्थितीत, केवळ विरंगुळा म्हणून चर्चा न करता, जर आपल्या मनासारखे काही घडावे वाटत असेल, तर वेळात वेळ काढून आपणही दोन पावले पुढे सरून, यथाशक्ती काही ना काही केले पाहिजे. 2014 ची निवडणूक अभूतपूर्व अशी होती, तशी 2019 ची निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. अशा या ऐतिहासिक क्षणी, आपण केवळ निवांत क्षणी चर्चाच करत राहिलो, असा ठपका आपल्यावर बसता कामा नये, याची काळजी प्रत्येक देशप्रेमी व्यक्तीने घेतली तरी पुरसे आहे...

श्रीनिवास वैद्य
8446017838
 
@@AUTHORINFO_V1@@