आणि मोदींनी जिंकला 'विश्वास', सरकारच्या पारड्यात ३२५ मते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2018
Total Views |


 
नवी दिल्ली : आज लोकसभेत गाजत असलेल्या अविश्वास ठरावाचा अखेर निकाल लागला आहे. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी मतदानाचा निकाल जाहीर करत सरकारच्या पारड्यात ३२५ मते असल्याचे सांगितले तर विरोधी पक्षाच्य़ा पारड्य़ात केवळ १२६  मते आहेत. त्यामुळे दिवसभर सुरु असलेल्या वादविवादात अखेर सरकारला यश मिळाले आहे, आणि हा अविश्वास ठराव फेटाळण्यात आला आहे.


आज संसदेत इतिहास घडला असून लोकशाही पद्धतीने निवडून दिलेल्या सत्ताधारी पक्षाच्या पारड्यात ३२५ मते पडली असून विरोधी पक्षाला पुन्हा एकदा हार पत्करावी लागली आहे. सकाळी ११ वाजेपासून सुरु झालेल्या अविश्वास ठरावावर चर्चा सत्रात अनेक घडामोडी घडल्या, मात्र अखेर १२ तासांनी सत्ताधारी पक्षाला पुन्हा एकदा विजय मिळाला असून हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.
तेलगू देसम पार्टी, समाजवादी पक्ष, काँग्रेस, आदी पक्षांनी या अविश्वास प्रस्तावाच्या पक्षात तर भाजप, जदयू, एलजेपी, राष्ट्रीय लोक समता पक्ष आदी पक्षांनी या ठरावाच्या विरोधात मतदान केले. यावेळी विरोधकांनी शेतकरी, गरीब, समूहातील मारहाण, नक्षलवाद, दहशतवाद, भ्रष्टाचार आदी मुद्दे उपस्थित करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी कठोर शब्दात हे आरोप फेटाळले, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर हे सर्व आरोप फेटाळून लावत विरोधकांवर टीकास्त्र सोडले. एकूणच संसद भवन आज एका ऐतिहासिक राजकीय दिवसाचे साक्षीदार ठरले.
यावेळी केवळ ४५१ खासदार उपस्थित होते. शिवसेना आणि बिजू जनता दलाचे खासदार अनुपस्थित होते. यावेळी अण्णा द्रमुक पक्षाने भारतीय जनता पक्षाला पाठींबा दिला आहे.आज एकूणच लोकसभेत एक ऐतिहासिक वातावरण बघायला मिळाले. यावेळी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गळाभेट घेत, संसदेचे सभागृह दणाणून टाकले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खुमासदार शैलीत विरोधकांच्या आरोपांवर उत्तरे देत टीकेची झोड उठवली.


पंतप्रधांनाच्या भाषणातील ठळक मुद्दे –

1. सर्व पक्षांना माझी विनंती आहे, त्यांनी या अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करावे.

2. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या भाषणातील गाजलेल्या भूकंपावर टीका करत हा प्रस्ताव का उपस्थित करण्यात आला ?  विरोधी पक्षाकडे जिंकण्याएवढे आकडे देखील नसताना केवळ सरकार पाडण्याच्या उद्येशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला.

3. या सर्व प्रकियेचा केवळ एकच उद्येश्य होता "मोदी हटाओ" यासाठी एवढी घाई कशाला? आपण निवडणूकांची वाट बघायला हवी. मला १२५ कोटी भारतीयांशिवाय कुणीच काढू शकत नाही.




4. मोदी वर टीका केली तर मला काहीच हरकत नाही, मात्र देशाच्या संरक्षणासंबंधात विरोधी पक्षाने इतके बेजबाबदार वक्तव्य करावे ? यासाठी देश तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असे म्हणत राहुल गांधी यांनी डोकलाम संबंधी केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधानांनी राहुल गांधी यांचा समाचार घेतला.

5. सर्जिकल स्ट्राइकला तुम्ही "जुमला स्ट्राइक" असे म्हटले तुम्ही मला हवे तितके वाईट बोलू शकता मात्र देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांविषयी तुम्हाला असे बोलण्याचा काहीच अधिकार नाही.

 
 
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९९९ मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकार १ मताने पडले असल्याचे उदाहरण देत काँग्रेसच्या संस्कृतीविषयी प्रश्न उपस्थित केले. इतिहासात अविश्वास ठरावासंबंधी घडलेल्या अनेक घटनांचे उदाहरण देत त्यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले.

लोकशाहीवर देशातील सर्वच पक्षांचा विश्वास असणे गरजेचे आहे. मात्र विरोधी पक्षांना आपला अहंकार आवरता येत नाही, म्हणून आमचे हे सरकार पाडण्याचा डाव आज त्यांनी रचला आहे. आपल्या देशातील राजकारणाला नकारात्मक राजकारणाने पूर्णपणे घेरले आहे.. विकास करण्याची प्रवृत्ती आता विरोधी पक्षांमध्ये नाही, असे सांगत त्यांनी विरोधी पक्षाचा चांगलाच समाचार घेतला.

अखेर दोन्ही पक्षांकडून झालेल्या आरोप प्रत्यारोपांमध्ये सत्ताधारी पक्ष विजयी झाला असून यामुळे विरोधी पक्षाचा मात्र काडीमोड झाला आहे.
@@AUTHORINFO_V1@@