अविश्वास ठरावावर आज लोकसभेत चर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2018
Total Views |

लोकशाहीसाठी महत्त्वाचा दिवस ; पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया




नवी दिल्ली : केंद्र सरकारविरोधात लोकसभेमध्ये विरोधकांकडून दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर आज लोकसभेत चर्चा करण्यात येणार आहे. यासाठी लोकसभेतील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले असून मोदी सरकारविरोधात मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आजचा दिवस मोदी सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचा असून लोकसभेत काय घडणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.

लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी दिलेल्या आदेशानुसार आज सकाळी ११ वाजता या ठरावावर चर्चा करण्यात येणार आहे. विरोधकांच्या मागणीमुळे तब्बल सात तास या चर्चेसाठी देण्यात आले आहेत. मोदी सरकारला प्रत्येक मुद्द्यावर घेरण्यासाठी म्हणून विरोधकांनी देखील सर्व प्रकारची तयारी केली आहे. दरम्यान मोदी सरकार देखील या चर्चेसाठी पूर्ण तयार असून विरोधकांच्या अविश्वास ठरावापासून केंद्र सरकारला कसल्याही प्रकारचा धोका नाही असा विश्वास भाजपकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली असून आजचा दिवस हा लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, असे मोदींनी म्हटले आहे. आपले सरकार हे भारतीय संविधानाशी पूर्णपणे बांधील आहे. त्यामुळे विरोधकांशी होणाऱ्या चर्चेला सरकार पूर्णपणे तयार असून विरोधक देखील योग्य प्रकारे चर्चा करतील, असे देखील त्यांनी म्हटले आहे.


@@AUTHORINFO_V1@@