वारंवार खंडित वीजपुरवठा, कचर्‍याने ग्रामस्थ त्रस्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2018
Total Views |




शहापूर : शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागाला आता वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व ठिकठिकाणी साचलेल्या कचर्‍याची समस्या भेडसावू लागली आहे. भाजपचे खा. कपिल पाटील यांच्या नुकत्याच झालेल्या दौर्‍यात ग्रामस्थांकडून ही समस्या सोडविण्याची आग्रही मागणी करण्यात आली. या संदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन खा. पाटील यांनी दिले.

 

शहापूर तालुक्याच्या निमशहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाचा दौरा खा. पाटील यांनी केला. शहरीकरण झालेल्या आसनगाव, वासिंदबरोबरच खातीवली, वेहळोली, पाषाणे, वालशेत, साने, पाली, सारमाळ, दहागाव आदी गावांना भेट दिली. तसेच तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. या वेळी वनवासी विकास विभागाच्या शहापूर प्रकल्प समितीचे अध्यक्ष अशोक इरनक, भाजपचे तालुका विस्तारक भाई देसाई, भाजपचे तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, शहापूर शहराध्यक्ष विवेक नार्वेकर, काशिनाथ म्हात्रे, निशिगंधा बोंबे, राम जागरे, जगन्नाथ विशे आदी उपस्थित होते.

 

वाढत्या नागरीकरणामुळे वासिंद व आसनगावमध्ये अनेक समस्या वाढल्या आहेत. त्यात वाढत्या कचर्‍याचे निर्मूलन करण्यात ग्रामपंचायतीला मर्यादा येत आहेत. त्याकडे खा. कपिल पाटील यांचे ग्रामस्थांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे हाल होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या संदर्भात सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन खा.पाटील यांनी दिले. आसनगावमध्येही नागरिकांनी नागरीकरणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले.

 

भातसई येथे उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे खा. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कपिल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळेच टाकीच्या कामाला मंजुरी मिळाली होती. आता या गावातील नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तालुक्यातील अन्य गावांचाही खा. पाटील यांनी दौरा केला. तसेच तेथील पाणी, वीज आदींबाबतच्या समस्यांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

@@AUTHORINFO_V1@@