राईनपाडा घटनेतील दोषींना कठोर शासन व्हावे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2018
Total Views |

रा.स्व.संघाच्या भटके विमुक्त विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष उध्दव काळे
पीडित भटके विमुक्त कुटुंबांचे पुनर्वसन व्हावे

 
 
राईनपाडा, ता.साक्री, २ जुलै :
येथे भटक्या विमुक्त जातीजमातीमधील नाथपंथी डवरी गोसावी जातीच्या पाच भिक्षेकर्‍यांना मुले पळविणारी टोळी समजून गावकर्‍यांनी केलेल्या मारहाणीत त्यांची निर्घृण हत्या झाली. या घटनेचा भटके विमुक्त विकास परिषद तीव्र शब्दात निषेध करीत असून यातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी. तसेच हा खटला जलद न्यायालयात चालवून मृतांच्या कुटुंबातील वारसांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी रा.स्व.संघाच्या भटके विमुक्त विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष उध्दव काळे यांनी केली आहे.
 
 
राईनपाडा येथे परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर ही भावना व्यक्त केली. या घटनेमध्ये मंगळवेढा, जि.सोलापूर येथील नाथपंथी डवरी गोसावी जातीतील दादाराव भोसले, राजू रामा भोसले, भारत भोसले, भारत माळवे व अम्नु इंगोले यांना ते मुले पळविणार्‍या टोळीतील असावेत अशा गैरसमजातून जमावाने दगड-काठ्यांनी त्यांना बेदम मारहाण करून ठेचून त्यांची हत्या केली. या कृत्यातील गावकरी जितके दोषी आहेत तितकेच सोशल मीडियावर चुकीचा संदेश पाठविणारेही दोषी आहेत असे काळे यांनी म्हटले आहे. शासन व पोलीस यंत्रणा यांचा काहीही धाक राहिलेला नसल्याने काही ठिकाणी स्थानिक समाजकंटकही अशा घटनास जबाबदार असतात. अशा घटना पुन्हा घडणार नाही याची काळजी घेऊन समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
 
 
शासनाने मृतांच्या कुटुंबियांना घोषित केलेली आर्थिक मदत त्वरित देवून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींना कठोर शिक्षा द्यावी. विशेष म्हणजे, या भटके विमुक्त कुटुंबीयांनी पाल टाकण्यापूर्वी पिंपळनेर पोलीस ठाण्यात या परिसरात आल्याची नोंद केली होती. हा भटके विमुक्त विकास परिषद व इतर भटके विमुक्त संघटनांनी केलेल्या जनजागृतीचा परिणाम आहे. शासनाने या घटकांची भटकंती थांबवून त्यांना स्थिरावण्याची संधी द्यावी, शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे, अशी अपेक्षाही काळे यांनी व्यक्त केली. यावेळी जळगाव जिल्हा संयोजक प्रा.दिलीप राठोड, उमेश जोगी तसेच एरंडोल येथील ज्ञानेश्वर साळुंखे उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@