सदोष रस्ता बनविणार्‍या अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2018
Total Views |





भिवंडी: भिवंडी महापालिका कार्यक्षेत्रातील धामणकर नाका ते अंजूरफाटा येथे सिमेंट-क्राँक्रिटचा रस्ता बनविण्याचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. खोदलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि पादचारी यांच्या अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे. दि. २७ जून रोजी विनायक कदम यांचा अपघात होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. ठेकेदार व शासकीय अधिकारी यांनी कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या नाहीत किंवा माहितीफलकसुद्धा रस्त्यांवर लावलेले नाहीत. संबंधितांना या अगोदर लेखी व तोंडी सूचना देऊनही त्याकडे कानाडोळा केल्याने विनायक कदम यांचा हकनाक मृत्यू झाला आहे. सदर तरुणाच्या मृत्यूस ठेकेदार आणि शासकीय अधिकारी जबाबदार असल्याने त्यांच्याविरुद्ध तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे आ. महेश चौघुले यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारपोली पोलीस स्थानक यांच्याकडे पत्र दाखल करून केली आहे.

 

आ. महेश चौघुले पत्रात पुढे म्हणतात की, ”रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. परिणामी वाहनचालकांबरोबर स्थानिक रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. ठाणे, मुंबई येथे जाण्यासाठी हा एकमेव रहदारीचा मार्ग आहे. तासन्तास वेळेचा अपव्यय होत असल्याने कोणतीही कामे होत नाहीत. रस्ताबांधणीच्या कामाचे नियोजन नसून कामावर देखरेख करण्यासाठी जबाबदार असे शासकीय अधिकारी उपस्थित नसतात. यामुळे रस्ताबांधणीच्या कामाचा दर्जाही खालावलेला आहे. दि. ६ मे रोजी रस्त्याच्या मध्यभागी पाण्याची टाकी ठेवल्याने हरिश पुजारी याची मोटारसायकल त्यावर आपटून गंभीर अपघात झाला. त्याची ठेकेदाराने दखल घेतली नाही किंवा वैद्यकीय मदतही केली नाही. विनायक कदम यांचा खड्ड्यांमुळे अपघात होऊन ते जागीच मयत झाले. यास संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे (राष्ट्रीय महामार्ग) अधिकारी जबाबदार आहेत. पोलिसांनी तात्काळ त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाईबाबत आपणांस तात्काळ अवगत करावे, असेही पत्रात नमूद केलेले आहे.

@@AUTHORINFO_V1@@