आघाडीच्या जीवावर ‘उधोजी’ उदार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2018
Total Views |




मलई जिथून जितके दिवस मिळते तितके दिवस शिवसेना तिथून नाचतेच; अन्यथा ज्या कथानकात दम नाही, त्यात आयटम साँगसादर करत लक्ष वेधून घेण्याचा उपद्व्याप करते. आताही सेनेने तसेच केले.

 

चित्रपटाच्या मूळ कथानकात कोणतेही स्थानमाहात्म्य नसताना नाचगाण्याचा आयटम साँगनामक प्रकार गेल्या काही वर्षांत भलताच लोकप्रिय झाला. मूळ चित्रपटाचे कथानक उत्तम, आशयसंपन्न नसले तरी या नाचगाण्याने तरी प्रेक्षक आपल्याकडे आकृष्ट होतील व त्यातून चित्रपटाला तिकीटबारीवर यश मिळेल, असा निर्मात्यांचा त्यामागे उद्देश. पण, जसजशी २०१९ ची लोकसभा निवडणूक जवळ येत आहे, तसतसे राजकारणाच्या पटावरही भाजपच्या पराभवासाठी दुसर्‍या, तिसर्‍या वगैरे आघाडीचे कथानक आकाराला येताना दिसते. तसेच या मूळ कथानकाचा जीव बेडकाएवढा असूनही त्याला बैल-हत्ती वगैरे ठरवणारे बोलके पोपटही ठिकठिकाणी वटवट करताना दिसतात. असल्या उद्योगांची सदान्कदा तळी उचलण्यात आघाडीवर असलेले एक नाव म्हणजे शिवसेना. विरोधकांच्या या आघाडी-बिघाडी नामक कथानकात कोणतेही स्थानमाहात्म्य नसतानाही शिवसेनेने नेहमीच लक्षवेधी आयटम साँगसादर करण्याची भूमिका इमानेइतबारे निभावली. आताही गेल्या चार वर्षांपासून सत्तेच्या ताटातले तुकडे चघळणार्‍या सेनेने भाजपविरोधाचा सूर आळवत आपले तोंड उघडले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर विरोधकांची एकजूट राष्ट्रहिताच्या दृष्टीने चांगली असल्याचे प्रशस्तिपत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. शिवाय आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही, असे म्हणत त्याची स्वतःपुरती पण जगावेगळी व्याख्या करणार्‍या सेनेने ज्योतिषाचार्याच्या भूमिकेत जात उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये भाजपचा पराभव होईल,” असे भाकीतही केले. शिवसेनेचे हे भाकीत म्हणजे ज्याला स्वतःचे घर सांभाळता येत नाही, त्या गल्लीतल्या पोराने जगाची चिंता वाहण्यासारखेच.

 

मूळ दुखणे निराळे असले आणि त्यावरचा उपाय सापडत नसला की, रोग्याला काय करू अन् काय नको, असे होते. आजच नव्हे तर गेल्या चार वर्षांपासून शिवसेनेची अवस्था अगदी तशीच झाल्याचे तिने वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांवरून दिसते. स्वबळावर राज्यात सत्ता स्थापन करण्याची वल्गना करत शिवसेनेने २०१४ ची निवडणूक लढवली, पण आपल्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याची योग्यता शिवसेनेत नसल्याचे कळून चुकलेल्या जनतेने सेनेला सपशेल नाकारले. नंतर विरोधी पक्षात वगैरे बसण्याचे नाटक रंगवत शिवसेनेने पक्षफूट टाळण्यासाठी व त्यातून अब्रूचे धिंडवडे निघण्यापासून वाचण्यासाठी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. पण, एवढे करूनही सत्तेचे सोनेरी ताट स्वतःला पूर्णपणे उपभोगता येत नाही, हा सल त्या पक्षाच्या व पक्षप्रमुखांच्या मनात कायमचा राहिला. त्यामुळे भुकेल्या पक्षप्रमुख आणि त्यांच्या पेंगूसैनिकांना नेहमीच सत्तेच्या पूर्ण ताटाचे स्वप्न पडते, तसेच त्या स्वप्नाच्या अमलाखाली त्यांना विरोधकांच्या कथानकात आयटम साँगसादर करण्याचीही लहर येते. अशीच लहर शिवसेनेला आताही आली व त्याच धुंदीत विरोधकांची एकजूट राष्ट्रहिताच्या दृष्टीने चांगली असल्याचे म्हणत सेनेने त्यांच्या तालावर नाचायला सुरुवात केली. पण, ज्या विरोधकांची ख्याती सदैव एकमेकांचे पाय ओढण्याची, स्वतःच्या स्वार्थासाठी देशहितालाही तिलांजली देण्याची, जनतेला गरीब, मागासलेले ठेवण्याची, इथल्या जाती-जातीत, धर्माधर्मांत तेढ निर्माण करण्याचीच आहे, त्यांची एकजूट राष्ट्रहिताची कशी? हे सांगायला मात्र उद्धव ठाकरे विसरले.

 

शिवसेनेची आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे, विरोधकांची एकजूट कशी राष्ट्रहिताची आहे, हे सांगणारी सेना कधीही सत्ता सोडून त्यांच्यात सामील होण्याची गोष्ट करत नाही. म्हणजेच, स्वतः सत्तेत राहायचे, सत्तेचे सगळे फायदे मिळवायचे आणि विरोधकांच्या एकजुटीला राष्ट्रहिताचे प्रमाणपत्र देत फिरायचे, हा शिवसेनेचा उद्योग. दुसरीकडे जर विरोधकांची एकजूट एवढीच राष्ट्रहिताची असेल, तर या राष्ट्रहिताच्या महान कार्यात शिवसेना आपल्या उरल्यासुरल्या पेंगूसैनिकांना सोबत घेऊन सामील का होत नाही? खिशात ठेवलेल्या राजीनाम्यावरची शाईही आता उडून गेली असेल, तरीही सेनाप्रमुख विरोधकांच्या एकजुटीतून राष्ट्रहित साधण्याचा निर्णय का घेत नाही? की राष्ट्रहिताचे काम करण्यापेक्षा सेनेला सत्तेच्या माध्यमातून स्वहित साधणेच अधिक फायद्याचे वाटते? तर हो, हेच खरे आहे, शिवसेनेला ना राष्ट्राची फिकीर आहे, ना देशाची, ना जनतेची. तिला फिकीर आहे, ती फक्त सत्तेतून मिळणार्‍या मलईची. त्यामुळे ती मलई जिकडून जितके दिवस मिळते तितके दिवस शिवसेना तिकडून नाचतेच; अन्यथा ज्या कथानकात दम नाही, त्यात आयटम साँगसादर करत लक्ष वेधून घेण्याचा उपद्व्याप करते. आताही सेनेने तसेच केले.

 

दुसरीकडे, “उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थान या तिन्ही राज्यांत भाजप नावालाही शिल्लक राहणार नाही,” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या थेट १०० जागा कमी करून टाकल्या. शिवाय यातूनच त्यांनी मोदींच्या परराष्ट्र धोरणावर तोंडसुख घेत पुतीन, ट्रम्प आणि अरब राष्ट्रांकडून खासदार आयात करण्याचीही कल्पना मांडली. खरेच उद्धव ठाकरेेंसारख्या व्यक्तींनी राजकारणात यावेच का आणि आले तरी देशाच्या-जगाच्या राजकारणावर भाष्य करावेच का, हा प्रश्‍न यामुळे निर्माण होतो. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात राबवलेल्या परराष्ट्र धोरण आणि निरनिराळ्या राष्ट्रप्रमुखांच्या घेतलेल्या भेटीगाठींमुळे भारताला नेमका काय लाभ झाला, हे समजून घेण्याची उद्धव ठाकरेंची कुवत नक्कीच नाही. जास्तीत जास्त महापौर आमचाचएवढे म्हणण्यापर्यंतच ज्यांची धाव जाते, त्यांना परराष्ट्र धोरण कळण्याची सुतरामही शक्यता नाही. म्हणूनच त्यांनी ही रशिया, अमेरिका आदी देशांतून खासदार आयात करण्याची भाषा केली. अशी भाषा करण्याआधी उद्धव ठाकरेंनी आपले पेंगुळलेले डोळे उघडून जरा नीट बघितले असते तर त्यांना नक्कीच मोदींच्या परराष्ट्र धोरणामुळे खूप काही बदल झाल्याचे दिसले असते. ताजी घडामोड म्हणजे पाकिस्तानचा फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये केलेला समावेश आणि अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता रशियाशी केलेला एस-४०० ट्रायम्फ एअर डिफेन्सक्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याचा निर्णय. पण भाजप आणि मोदीद्वेष अंगी भिनल्याने सेनाप्रमुखांना हे कसे बरे दिसेल? त्यांना या द्वेषापायी सुचेल ते फक्त विरोधकांच्या ठेक्यावर नाचणेच!

@@AUTHORINFO_V1@@