अनुकंपा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2018
Total Views |



 
अनुकंपा म्हणजे काय, हा प्रश्‍न अगदी साध्या संकल्पनेच्या कोनातून पाहिला तरी समजायला कठीण वाटतो आणि तो तितकासा सोपाही नाही.
 

आपण रस्त्यावरून चालत असताना बर्‍याच वेळा काही म्हातारी किंवा अपंग व्यक्ती, अन्नाविणा खंगलेली माणसं आपल्याला दिसतात. आपल्याला बर्‍याच वेळा त्यांच्याविषयी करूणा वाटते. का कुणास ठाऊक, पण बहुधा मनात येणार्‍या त्या करूणेला व दयेला काय संबोधायचे, हे बहुतेकांना समजत नाही. आयुष्यात बर्‍याच प्रसंगी आपल्याच मनात येणार्‍या अनेक भावना आपल्यालाच ओळखता येत नाहीत. का? त्या आपल्याला तितक्याच प्रकर्षाने जाणवून घ्यायच्या नसतात का? अनुकंपा मनात येते, मग ती कुणी आजारी असो म्हणून असेल, कुणावर घोर संकट आले असावे म्हणून असेल वा कुणाची सुखद स्थिती लयाला जाऊन आपल्यासमोरच आपण त्यांची दुर्दशा पाहिली असेल म्हणून असेल पण, मनात काहीतरी पटकन हलतं. मनाला चटका लावून जातं. आपल्यापैकी बरेच जण या अशा अवघड भावनांच्या भोवर्‍यात आपण हरवून तर जाणार नाही, या चिंतेपोटी दूरच राहतात.

 

अशा या करूण भावनांत अनुकंपेच्या भावविभोर स्थितीला सामोरं जाणे सर्वांनाच जमेल असे नाही. विशेषतः जे स्वतः पटकन भावूक व्हायच्या स्वभावाचे आहेत, त्यांना तर अशा भावनेच्या खोलीत जायचे म्हटले तरी खूप कठीण वाटेल.  अनुकंपा म्हणजे सहानुभूती का? तर नक्कीच नाही. सहानुभूतीत आपण दुसर्‍याच्या कठीण स्थितीबद्दल विचार करतो तेव्हा तो चुकचुकत करतो. आपण कुठेतरी स्वतःला अपराधी मानतो.

 

कदाचित आपण त्या व्यक्तीला त्याच्या त्रासातून बाहेर काढू शकत नाही. आपण मदतीत कुठेतरी कमी पडतो आहोत, ही रूखरूख आपल्या मनात राहते. परानुभूतीमध्ये आपल्याला दुसर्‍यांच्या मनातील भावनांचा तसाच आणि तितक्याच आवेगाने अनुभव घेता येतो का, याची खात्री आपल्याला नसते. एखाद्या स्त्रीला मूल होत नाही किंवा एखाद्या लेकराचे मायेचे छात्र हरपते, तेव्हा त्यांच्या मनात येणार्‍या त्या गंभीर दुःखी भावनांचा मागोवा आपल्याला खरंच तितक्या सच्चेपणाने घेता येतो का? खरे तर नाही, कारण प्रत्येकाच्या भावनांची उर्मी वेगळी असते, त्याची तीव्रता प्रत्येकाच्या मनात समान असेलच असे नाही. म्हणून तर म्हणतात ना, दुःखाची जाणीव प्रत्येकाची वेगळी असते.

 

पण, या सगळ्यात खूप महत्त्वाची आहे ती अनुकंपेची भावना. आयुष्यात आपल्या काय किंवा दुुसर्‍याच्या काय, सुख काही आयुष्यभर राहात नाही. कठीण आणि दुःखद प्रसंग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात घडतच असतात. दु:खाला काही तोटा नाही. पण, माणसाच्या जीवनात जितकी वेदना दिसते, तितकीच त्या वेदनेवर फुंकर घालता येणारी माणुसकीही अधूनमधून का होईना, आपल्याला दिसते. परोपकार करणारी अनेक मंडळी दुसर्‍या व्यक्तीच्या जीवनातील दुःख थोडं कमी करता येईल का, यासाठी सदैव झटत असतात. या जगात दुःख इतके आहे की, परोपकाराची वा परानुभूतीचा वसा घेऊन चालणार्‍या माणसांना कितीही केले तरी कमीच वाटते. संत तुकारामांचे वचन आहेच, ‘सुख पाहता जवाएवढे दुःख पर्वताएवढे.’

 

जगात कितीतरी माणसे आहेत. त्यांच्या दैनंदिन मूलभूत गरजाही पुर्‍या होत नाहीत. शिवाय इतर गंभीर समस्या आणि कष्टांचा भार वेगळाच! अशावेळी दया, करुणा वा अनुकंपा माणसांच्या सुंदर हृदयात जपली गेली तर आयुष्य किती सोपे सहज होऊ शकेल. तहानभुकेने व्याकुळ असलेल्या माणसांना अन्नपाणी देण्यास, अपघातात अडकून पडलेल्यांना सोडवण्यात वा अनाथ मुलांना आईवडिलांचे छत्र देण्यात किती आनंद मिळतो, हे अशी निरलस कामे करणार्‍या लोकांनाच माहीत असेल. मध्ये एकदा ऐकले की, एक माणूस आपल्या स्कूटरवरून पिण्याच्या पाण्याच्या पिशव्या घेऊन जायचा आणि रस्त्यामध्ये तहानेने हरपलेल्या लोकांना पाणी द्यायचा. तो फार श्रीमंत माणूस नव्हता. रोज कष्ट करून आपले घरसंसार सांभाळायचा. पण, तहानलेल्यांना पाणी देऊन त्यांची तहान शमवायची. याच ध्यासाने त्याने हे अविरत व्रत चालविले होते. खरंच त्याला अनुकंपा वाटत होती. तहानलेल्या या वाटसरूबद्दल हीच अनुकंपा त्याला साध्याशा भासणार्‍या पण, खर्‍या अर्थाने बहुमोल असणार्‍या त्याच्या असिधारा कार्यासाठी प्रवृत्त करीत होती.

 

एखादी साधारण वाटणारी पण विश्‍वासाठी गरजेची असणारी छोटीशी कृती, झपाटलेल्या ऊर्जेने करणारी माणसे विलक्षण असतात. अशा पद्धतीची अनुकंपा वा उेारिीीळेप माणसामध्ये कशी विकसित होते? ही निसर्गदत्त निर्माण होते की ती आपल्याला शिकावी लागते? खरंच कुठून येते ही अनुकंपा? खरे तर अनेक मानसशास्त्रज्ञांनी अनुकंपा ही अंतःप्रेरणा आहे, असे म्हटले आहे. याचाच अर्थ ती निसर्गदत्त आणि स्वयंभू आहे. त्यामुळे माणूस म्हणून आपल्या जगण्याचा तो एक सहजभाव आहे. लहान मुलेच काय किंवा चिंपांझीसारखे प्राणी काय, त्यांच्यातसुद्धा दुसर्‍या बाळाबद्दल अनुकंपा निर्माण होते व त्यातून त्यांना मदत करण्याची नैसर्गिक प्रवृत्ती दिसून होती. हे त्यांच्यात अंगभूत प्रेरणेने व कुठल्याही बाह्य स्वार्थाची अपेक्षा न करता दिसून येते. मानसशास्त्रात ज्यांच्यात अनुकंपेची प्रेरणा अधिक असते, अशी माणसे सामाजिक कल्याणात अधिक रमतात. पण, त्याही पलीकडे जाऊन दुसर्‍यासाठी काहीतरी करण्याची कृती त्या व्यक्तीला सुखसमाधान देते. म्हणूनच आपण समाजात खर्‍या अर्थाने सामाजिक हितात गुंतलेल्या माणसांना प्रसन्न असलेले पाहतो.

 

दुसर्‍यांच्या कष्टांबद्दल दु:खाबद्दल वा कठीण परिस्थितीबद्दल कणव बाळगणार्‍या माणसांना स्वत:साठी एक भावनिक श्रीमंती मिळते. बोधिसत्वात नमूद केले आहे की, दुसर्‍याबद्दल अस्सल वा सच्ची अनुकंपा बाळगणारी माणसे खर्‍या अर्थाने आयुष्यातला प्रसन्न अनुभव घेतात. हा प्रसन्न अनुभव अजून एक वास्तव सांगून जातो, ते म्हणजे दुसर्‍यासाठी केलेला त्याग हा खरंतर त्यातून मिळणार्‍या यथार्थ प्रसन्नतेची व्याप्ती पाहता तसा वैयक्तिक त्याग नसतोच. अनुकंपेत वैचारिक प्रगल्भता खूप महत्त्वाची मानली जाते. दुसर्‍याबद्दलची दया वा अनुकंपा केवळ भावूक नसावी तर त्यात सामाजिक भान ठेवणारी क्रिया वा कृती असावी. अनुकंपेत आईचे डोळस प्रेम असते. त्यात आंधळेपणा नसतो. म्हणजेच करुणेलासुद्धा चूक काय किंवा बरोबर काय, हे गणित व्यवस्थित जमले पाहिजे. दुसर्‍याचे भले करताना दुसर्‍याच्या दु:खात आपण वाहात जाण्याचे तसे कारण नाही. दु:खी माणसेसुद्धा चुकीची असू शकतात. अनुकंपेच्या अनुषंगाने आपण हे दोष पाहूनसुद्धा त्या माणसांना मदत करू शकतो. ही मदत करताना आपल्याला इतरांबद्दल वैताग येऊ शकतो. त्याचा उपद्रव वाटू शकतो. माणूस म्हणून या अशा गोष्टींची अनुभूती येणे नैसर्गिक आहे. याशिवाय आपल्याला ज्यांच्याबद्दल ज्या काही प्रामाणिक कारणांमुळे अनुकंपा वाटत असते, ती सत्यच असावी. त्यामुळे आपण स्वत:ला कुणासाठी बंधनात टाकायची गरज नसते. अनुकंपेत कुठल्याही अटीशिवाय व्यक्तीला वा परिस्थितीला स्वीकारता येण्याची क्षमता असावी लागते. अनुकंपा ही आपल्याभोवती असलेले लोक किती चांगले आहेत वा किती दुष्ट आहेत, यावर अवलंबून नसते, तर ती आपल्या स्वत:च्या प्रामाणिक अस्तित्वावर मूलभूत मानवी अस्तित्वावर अवलंबून असते. अनुकंपेत सोशिकपणा व सहनशीलता असावी लागते. महात्मा गांधी, बाबा आमटे व विनोबा भावे यासारखी समाजासाठी विधायकपणे झपाटणारी माणसे या अनुकंपेतूनच एक सोशिकता घेऊन तर येतातच. पण, मुळात ती प्रचंड निर्भयही असतात, कारण अनुकंपेतून व करुणेतून अनिवार्य निर्भीड कृती करताना गरज असते ती प्रसंगी रुढीबद्ध परंपरेला व दैनंदिन मर्यादांना भेदण्याची. खर्‍या अनुकंपेतून येणारी मानसिक ऊर्जा खूप मोठी आहे. ती मानवतेला वेळोवेळी नवीन वळण देत आली आहे.

-डॉ. शुभांगी पारकर

@@AUTHORINFO_V1@@