सावरकरांच्या विचारधनाची पेरणी गरजेची...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2018   
Total Views |



 

बालपणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी “समाजकार्य आणि देशसेवा करशील,” असा आशीर्वाद मंगलाला दिला. अनेक वळणांवर सावरकरांचा तो आशीर्वाद दीपस्तंभ बनून मंगला यांच्यासाठी प्रेरणादायी ठरला.

 

तात्यासाहेब, ही आमची मंगला, हिने पुढच्या आयुष्यात समाजाची, देशाची सेवा करावी, असा आशीर्वाद द्या.” तात्यासाहेबांनी हरीकाका कुलकर्णींचा हात पकडून उभ्या असलेल्या चिमुकल्या मंगलाकडे अतिव स्नेहाने पाहिले. तिच्या डोक्यावर हात ठेऊन तिला आशीर्वाद दिला. ते तात्याराव होते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि ती चिमुकली होती मंगला सवदीकर, ज्या आज नाशिकच्या भोंसला मिलिटरी स्कूलच्या शिक्षक प्रशिक्षण यंत्रणेच्या प्रमुख आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आशिर्वाद आयुष्याचा वसा म्हणून मंगला यांनी सदासर्वकाळ जपला.

 

सांगलीच्या दिगंबर वाळिंबे आणि मालती वाळिंबेंची मुलगी मंगला, मूळ घरच रा. स्व. संघाच्या प्रेरणेने कार्यरत. दिगंबर वाळिंबे आणि रा. स्व. संघाचे नानाजी देशमुख यांची चांगली मैत्री. समाजकल्याणासाठी काय करता येईल यासाठी दिगंबर वाळिंबे आणि नानाजी देशमुख अखंड प्रयत्न करत. त्यांचे चिंतन, कार्य मंगला यांनी जवळून अनुभवले. त्यामुळे देशप्रेम आणि समाजभान त्यांच्या आत्मिक प्रतिमेचा आणि प्रतिभेचाही महत्त्वाचा भाग बनले. आपल्यावर झालेले देशनिष्ठेचे संस्कार नव्या पिढीनेही आत्मसात करावेत यासाठी मंगला यांनी शिक्षिकीपेशा स्विकारला.

 

पुढे १९६९ पती माधवराव सवदीकरांबरोबर मंगला नाशिकला आल्या. तिथे काही काळ आयुष्य स्तब्ध झाले. फक्त घर आणि कुटुंब. पण नोकरी करत नाही तर शिक्षण पूर्ण करू, या इच्छेने मंगलांनी कला शाखेत प्रवेश घेतला. हीच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना ठरली. त्यावेळी मंगलांचे अध्यापक होते अत्यंत विद्वान, परंतु तीतकेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला सुयोग्य दिशा मिळावी, यासाठी झटणारे असे भाऊ गोविलकर, दादा रत्नपारखी, भिवलकर वगैरे गुरूजन. हे सारे गुरूजनही रा. स्व. संघाचे स्वयंसेवक. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रातून देश-समाजकार्य करावे, याचे अनौपचारिक शिक्षणच हे गुरूजन देत असत. एकवेळ अशी आली की, काही कारणास्तव दररोज महाविद्यालयात जाणे मंगलांना जमत नव्हते. पण, मंगलाची ही अडचण समजून घेऊन भाऊ गोविलकर मंगलाच्या घरी येऊन पित्याच्या मायेने तिची शिकवणी घेत. उद्देश हाच की राष्ट्रनिष्ठ असलेल्या विद्यार्थिनीचे शिक्षण मध्येच सुटू नये. मंगला म्हणतात, “पुढे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून शिकवताना त्यामुळे माझाही हाच आग्रही दृष्टिकोन राहिला की, कोणत्याही होतकरू मुलाचे शिक्षण मध्येच सुटू नये. तसेच प्रत्येक विद्यार्थी हा उद्याचा जबाबदार भारतीय नागरिक आहे. त्याच्या मनात राष्ट्रभक्ती आणि समाजप्रेम सदासर्वदा तेवत राहील, असे प्रयत्न अध्यापक म्हणून करायचे.”

 

पुढे १९७५ साली आणीबाणी जाहीर झाली. त्यामध्ये रा. स्व. संघाशी संबंधित म्हणून भाऊ गोविलकर, रत्नपारखी, भिवलकर यांना अटक झाली. त्यांची चूक एकच होती की, ते संघस्वयंसेवक होते. या घटनेने मंगलांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला. संघविचारांची व्यक्ती आणि भारतीय नागरिक म्हणून देशाचे सार्वभौमत्व, लोकशाही अबाधित राहावी यासाठी काम करायचे, असे त्यांनी ठरवले. १९७७ ते १९९९ पर्यंत त्यांनी जनसंघ ते भाजप, राजकारणात अनेक महत्त्वाची पदे भूषवली, पण त्यातही निवडणूक लढवणे, नेता बनणे यासाठी मंगलाने कधीही पुढाकार घेतला नाही. किंबहुना, ती मंगलाची वृत्ती, महत्त्वाकांक्षा नव्हती. म्हणूनच जेव्हा जनसंघाचा वटवृक्ष म्हणून भाजप स्थिरावला, त्यावेळी मंगलांनी भारत विकास परिषदेचे काम करण्यास सुरुवात केली. सज्जन समर्थ शक्तीचा सहयोग वंचितांसाठी हे सूत्र घेऊन त्या काम करू लागल्या. पुढे महाविद्यालयामधून निवृत्ती घेतल्यानंतर दिवाकर कुलकर्णी यांनी भोंसला मिलिटरी स्कूलशी निगडित काम करावे, असा सल्ला दिला. भोसला मिलिटरी स्कूलमध्ये सातत्यपूर्वक निष्ठेने काम करता करता आज मंगला भोंसला मिलिटरी स्कूलच्या शिक्षक प्रशिक्षण यंत्रणेच्या प्रमुख झाल्या. मिलिटरी स्कूल म्हणजे विद्यार्थ्यांना प्रखर राष्ट्रनिष्ठा प्रदान करणारी आणि त्यासाठी समर्थ करणारी संस्था, असे समीकरण आहे. मंगला म्हणतात, “आठवी ते दहावी पाठ्यक्रम बदलला आहे. तसेच बदलत्या जीवनशैलीत, समाजजीवनात विद्यार्थ्यांना खर्या अर्थाने समर्थ यशस्वी राष्ट्रसेवक बनवणे, हेच मोठे आवाहन आहे. त्यादृष्टीने शैक्षणिक स्तरावर शिक्षकांचे प्रशिक्षण सरकारी तसेच खाजगी माध्यमातून करणे गरजेचे आहे आणि हो, आयुष्यात अनेक प्रसंगामध्ये द्विधा अवस्था निर्माण झाली. पण, प्रत्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मला आशीर्वाद दिला आहे, हे आठवले की, मग मार्ग दिसतो. खरेच सावरकरांचे जीवनचरित्र माझ्या आयुष्याची संजीवनी आहे. मातृभूमीसाठी, ‘तुजसाठी मरण ते जनन, तूजविन जनन ते मरण,’ हा विचार समाजामध्ये अमृतासारखा पेरावा, हेच माझे जीवनध्येय आहे.”

9594969638

@@AUTHORINFO_V1@@