सुबोधचे 'पुष्पक विमान' ३ ऑगस्टला घेणार उड्डाण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2018
Total Views |

 
आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त. नंतर लाख आले तरी पहिल्या दोस्तांची सर नाही आणि नातू आजोबाचा शेवटचा दोस्त. तो असल्यावर दुसऱ्या दोस्तांची गरजच नाही. अशाच आजोबा आणि नातवाची म्हणजेच तात्या आणि विलासची गोष्ट येत्या ३ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वर्षातील पहिल्या सहा महिन्यात ये रे ये रे पैसा, गुलाबजाम आणि न्यूड सारखे चित्रपट देणाऱ्या झी स्टुडिओज् ने या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. विशेष म्हणजे सुबोध भावेने प्रथमच पुष्पक विमानाच्या माध्यमातून कथा लेखन केलं आहे. वैभव चिंचाळकर याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटातून सुबोध भावे आणि मोहन जोशी हे कलाकार रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री गौरी किरण या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत हे विशेष. या चित्रपटाची पत्रकार परिषद नुकतीच पुण्यात पार पडली यावेळी चित्रपटातील सर्व कलाकार, झी स्टुडिओज् चे शारिक पटेल, मंगेश कुलकर्णी उपस्थित होते.
 
 
 
चित्रपटाची कथा आहे विष्णुदास वाणी म्हणजेच तात्यांची. तात्या जळगाव मध्ये राहणारे वयाची ८३ गाठलेले व्यक्तिमत्व. कीर्तन, भजन आणि शेती ह्यात आयुष्य वेचलेल्या तात्यांना तुकाराम महाराजांची वैकुंठ गमन हि कथा नेहमीच भुरळ घालत असे. हेच तात्या आपल्या एकुलत्या एक नातवाच्या म्हणजेच विलासच्या आग्रहाखातर जेव्हा मुंबई गाठतात तेव्हा मुंबईतील घुसमट त्यांना सहन होत नाही. कधी एकदा मुंबई सोडतो असे झालेले असताना, तात्या पहिल्यांदा अगदी जवळून उडणारे विमान पाहुन भारावून जातात. आयुष्यभर कीर्तनातून 'तुकाराम महाराजांचा पुष्पक प्रवास' आनंदाने सांगणाऱ्या तात्यांसाठी हि घटना कलाटणी देणारी ठरते. त्यांच्या इरसाल पण निरागस विश्वात कल्लोळ माजतो. भावनिक गुंतागुंतीच्या छटेला स्पर्शून जाणारी एक गाथा म्हणजेच 'पुष्पक विमान'. 
 
 
मंजिरी सुबोध भावे, अरुण जोशी, मीनल श्रीपत इंदुलकर, सुनिल फडतरे आणि वर्षा पाटील यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून झी स्टुडिओज् ची प्रस्तुती आहे. चित्रपटातील संवाद आणि पटकथा चेतन सैंदाणे यांचे असून, कथा सुबोध भावे यांची आहे. पटकथा व दिग्दर्शन वैभव रा. चिंचाळकर यांचे आहे. चित्रपटाचं संकलन केलंय आशिष म्हात्रे आणि अपूर्वा मोतीवाले सहाय यांनी तसेच धावणाऱ्या मुंबईला आपल्या छायाचित्रणात सुरेखपणे टिपलंय राष्ट्रीय पुरस्कार विजेते छायालेखक महेश आणे यांनी. संतोष फुटाणे यांचे कला दिग्दर्शन असून चित्रपटाला संतोष मुळेकरयांचे पार्श्वसंगीत आहे. या चित्रपटात एकूण सहा गाणी आहेत. नरेंद्र भिडे आणि संतोष मुळेकर यांची संगीतबद्ध केली असून शौनक अभिषेकी, आनंद भाटे, जयतीर्थ मेवुंडी, विनय मांडके आणिनकाश अझीझ यांनी स्वरबद्ध केली आहेत तर समीर सामंत आणि चेतन सैंदाणे यांनी शब्दबद्ध केली आहेत. कार्यकारी निर्मात्याची धुरा रत्नकांत जगताप यांनी सांभाळली आहे. चित्रपटात मोहन जोशी, सुबोध भावे, गौरी किरण आणि सुयश झुंझूरके हे कलाकार आहेत तसेच राहुल देशपांडे एका खास भूमिकेत दिसणार आहेत.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@