पर्यटकांना खुणावणारे कोल्हापूर वस्तुसंग्रहालय ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2018
Total Views |
 

 
 
कोल्हापूर : जे-जे काही चांगलं, ते कोल्हापूर अशी ख्याती असलेल्या कोल्हापुरात ऐतिहासिक ठेवा म्हणून ज्या गोष्टी आहेत, ज्यांच्यामुळे कोल्हापूरचा महिमा सातासमुद्रापार गेला आहे, त्यामध्ये कोल्हापूरच्या वस्तुसंग्रहालयाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. कोल्हापुरात मध्यवस्तीमध्ये असलेल्या टाऊन हॉल गार्डनमध्ये कोल्हापूर वस्तुसंग्रहालय इतिहासप्रेमींसह अभ्यासक आणि पर्यटकांना खुणावत असते.
 
 
१९४६ साली स्थापना करण्यात आलेल्या कोल्हापूर वस्तुसंग्रहालयात विविध प्रकारची ७ देखणी आणि आकर्षक दालने आहेत. या दालनामध्ये धातूच्या वस्तू, नक्षीकाम केलेली मातीची भांडी व फुलदाण्या, संगीत वाद्ये, संगमरवरी शिल्पे, कलाकुसरी व धातूच्या वस्तू, मूर्ती, शस्त्रे आणि जलरंग व तैलरंग चित्रे अभ्यासक आणि पर्यटकांना भुरळ पडते. कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचं काम या वस्तुसंग्रहालयाद्वारे होत असून देशातील पर्यटकांचे हे एक प्रमुख आकर्षण आहे.
 
 
देखणा परिसर आणि ऐतिहासिक वास्तूमध्ये स्थापन केलेले कोल्हापूर वस्तुसंग्रहालय कोल्हापूरची शान असून यामध्ये सुमारे १ हजार वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने पेंटिंग, शिल्पे, शस्त्रात्रे, कलाकुसरीच्या आणि धातूच्या वस्तूंचा समावेश आहे. या वस्तुसंग्रहालयाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, कोल्हापुरातील ब्रम्हपुरी उत्खननात समुद्र देवतेचा पंचराशी धातूचा पुतळा सापडला आहे. त्याची बनावट ही रोमन आहे व तो कोल्हापुरात सापडला त्यामुळे त्यावेळी कोल्हापूर ते युरोप अशी व्यापारी देवाण-घेवाण होती, याचा हा पुरावा आहे.
 
 
हा धातूचा पुतळा कोल्हापूर वस्तुसंग्रहालयात प्रेक्षकांना आणि पर्यटकांना पाहता येतो. याबरोबरच जुन्या काळातील खेळांचे साहित्य व इतर वस्तू पटसोंगटया, गंजीफा, शंखाच्या बांगड्या, लाखेच्या थरावर रंग वापरुन नक्षीकाम केलेली मातीची भांडी, मातीच्या फुलदाण्या, तोंडाने वाजवण्याची पक्षी व माशांच्या आकाराची संगीत वाद्य, वेगवगळया वस्तूंवर केलेली बिदरीकला, दरबारी अंगरखा, कमरपट्टा, शाली व फेटे, नक्षीकाम व विणकाम केलेले दरबारी पंखे, संगमरवरी शिल्पे, सातवाहन व बहामणीकालीन मणी व बांगड्यांचे तुकडे, सातवाहन काळातील भाजलेल्या मातीच्या वस्तू तसेच चंदनाच्या लाकडात नक्षीकाम करुन केलेला देवारा, अशा कित्येक वस्तू, वाद्ये, शिल्पे, भांडी, खेळणी पाहणाऱ्यांना तासनतास खिळवून ठेवतात. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@