शरीफांच्या अटकेचे पडसाद आणि परिणाम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2018
Total Views |

 



निवडणुका तोंडावर असताना शरीफांच्या या अटकेमुळे पीएमएल-एन समोर एक मोठे आव्हान उभे ठाकले असून या पक्षाच्या एकूणच राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

 

लंडनहून पाकिस्तानात विमानतळावर उतरल्यानंतरच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि त्यांची कन्या मरियम यांना शनिवारी अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची रवानगी थेट अदायला तुरुंगात झाली. पाकिस्तानच्या नॅशनल अकाऊंटेबिलिटी ब्युरो अर्थात ‘नॅब’ने शरीफ यांच्याविरोधात एवनफिल्ड संपत्तीच्या भ्रष्टाचार प्रकरणात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नवाझ शरीफ यांना दहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा येथील न्यायालयाने सुनावली. मे महिन्यामध्ये नवाझ शरीफ, त्यांची मुलगी मरियम आणि जावयाने क्रीमिनल प्रोसिजर कोड (सीआरपीसी) च्या कलम ३४२ अन्वये जबाब नोंदवला होता. त्यानंतर फिर्यादी आणि डिफेन्स कौन्सिलची अंतिम सुनावणी घेण्यात आली.

 

न्यायालयाचा निकाल

 

न्यायाधीश मोहम्मद बशीर यांनी उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती कमाविल्याप्रकरणी आणि ‘नॅब’ला तपासात केलेल्या एकूणच असहकार्याबाबत नवाझ शरीफ यांना १० वर्षांची शिक्षा सुनावली आणि सोबत १०.६ दशलक्ष डॉलरचा दंडही ठोठावला. या सगळ्या शिक्षा शरीफांना एकत्र भोगाव्या लागणार आहेत. शरीफांची मुलगी मरियम, जिच्याकडे त्यांची राजकीय वारसदार म्हणूनही पाहिले जाते, तिलाही न्यायालयाने २.६ दशलक्ष डॉलरचा दंड आणि सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, तर तिचे पती कॅप्टन सफदर यांनाही एक वर्षांची शिक्षा न्यायालयानेसुनावली. या तिघांवरही न्यायालयाने आगामी १० वर्षं निवडणूक लढविण्यावर बंदी घातली आहे. शिवाय, न्यायालयाच्या निकालानुसार त्यांच्या लंडन येथील एकूण चार मालमत्ताही पाकिस्तान सरकार जप्त करणार आहे. शरीफपुत्र हसन आणि हुसैन यांना फरार घोषित करण्यात आले असून ‘इंटरपोल’च्या मदतीने त्यांना पाकिस्तानात आणले जाईल आणि त्यानंतर त्यांना दहा दिवसांत इस्लामाबाद उच्च न्यायालयात या खटल्याविरोधात दाद मागता येणार आहे.

 

शरीफांच्या पक्षाची भूमिका

 

लंडनमध्ये असताना आपल्यावरील सर्व आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे नवाझ शरीफ यांनी म्हटले होते. ज्या दिवशी (६ जुलै) या खटल्याचा निकाल जाहीर करण्यात आला, त्या दिवशी शाबाज शरीफ, ज्यांना गेल्याच वर्षी पीएमएल-एनच्या पक्षाध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आली होती, त्यांनी पत्रकारांना संबोधित करताना हा पाकिस्तानसाठी काळा दिवस असल्याचे सांगितले. त्याचबरोबर न्यायालयाचा निकाल अमान्य असून हा निर्णय चुकीचा, तसेच राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगत या प्रकरणात अनेक त्रुटी राहिल्याचेही ते म्हणाले.

 

न्यायालयाचा निकाल

 

एवनफिल्डप्रकरणी न्यायालयात फिर्यादींनी एकूण २१ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. ज्यामध्ये पनामा गेटप्रकरणी विशेष चौकशी पथकाचे प्रमुख वाजिद झिया, ‘नॅब’चे संचालक जनरल झहीर शहा, ब्रिटिश न्यायवैद्यक तज्ज्ञ रॉबर्ट विलियम रॅडले, कायदेपंडित अख्तर रियाझ राजा यांचा समावेश होता.

१९९०च्या मध्यास नवाझ शरीफांनी लंडनमध्ये विकत घेतलेल्या आलिशान संपत्तीसाठी केलेली पैशांची जमवाजमव त्यांना नैतिक मार्गाने सिद्ध करता आली नाही. तसेच, शरीफांच्या कुटुंबीयांनाही एवनफिल्ड अपार्टमेंटमधील फ्लॅटखरेदीसंदर्भात कायदेशीर पद्धतीने आपली मिळकत दाखविता आली नाही.

 

नेमके प्रकरण तरी काय?

 

२८ जुलै रोजी पनामागेट प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि शरीफांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण, या प्रकरणात वर म्हटल्याप्रमाणे त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना एवनफिल्डमध्ये संपत्ती विकत घेण्यासाठी एवढे पैसे कुठून आले, याचा हिशोबच सादर करता आला नाही. शरीफांवर तसे एकूण चार प्रकरणांत दोषारोपण करण्यात आले. त्यापैकी पहिले लंडनमधील एवनफिल्ड संपत्ती खरेदीचे प्रकरण, दुसरे अल-अझिया आणि हिल मेटल एस्टॅब्लिशमेंट आणि फ्लॅगशिप गुंतवणुकीचे प्रकरण. पण, यापैकी एवनफिल्ड प्रकरण भलतेच गाजले. एवनफिल्ड हाऊसमध्ये चार घरं शरीफ आणि कुटुंबीयांकडून विकत घेण्यात आली. त्या विरोधात ‘नॅब’ने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात न्यायालयाने निकालही दिला. शरीफांच्या मुली आणि जावयाबरोबर त्यांचे पुत्र हसन आणि हुसैन यांच्याविरुद्धही या प्रकरणी भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आला आणि अंतिम निकाल देण्यात आला.

 

एवनफिल्डमध्ये शरीफांना इतका रस का?

 

नवाझ शरीफांच्या कुटुंबाने लंडनमधील पार्क लेन या उच्चभ्रू वस्तीत एवनफिल्ड अपार्टमेंटमध्ये घरांची खरेदी केली. राजधानी लंडनच्या अतिश्रीमंत अशा हायदे पार्कच्या कोपऱ्यावरील मेफेअर भागातले हे अपार्टमेंट. युकेमधील जमिनीच्या मालकींच्या नोंदींनुसार, करनंदनवन असलेल्या पनामा, ब्रिटिश व्हर्जिनिया यांसारख्या देशातील कंपन्यांची एवनफिल्डमध्ये बहुतांशी मालमत्ता आहे.

 

या अशाच ऑफशोर कंपन्यांपैकीच निल्सन इंटरप्रायझेस लिमिटेड आणि नेस्कॉल लिमिटेड यांचे शरीफांच्या कुटुंबांशी संबंध आहेत. एवनफिल्डमध्ये शरीफ आणि कुटुंबीयांचे क्र. १६, १६ ए, १७ आणि १७ ए असे एकूण चार आलिशान फ्लॅट्स आहेत. हे सगळे फ्लॅट्स एकाच मजल्यावर असून मधील भिंती तोडून त्याचे रूपांतर एका मोठ्या फ्लॅटमध्ये करण्यात आले आहे.

 

जून १९९३ मध्ये नेस्कॉल लिमिटेडच्या माध्यमातून शरीफ कुटुंबीयांनी १७ क्रमाकांचा फ्लॅट सर्वप्रथम विकत घेतला. त्यानंतर ३१ जुलै १९९५ रोजी १६ आणि १६ ए, तर २३ जुलै १९९६ रोजी १७ ए या शेवटच्या फ्लॅटची खरेदीही शरीफ कुटुंबीयांनीच केली.

 

शरीफ कुटुंबाचा आणखी एक फ्लॅट, १२ ए हा एवनफिल्ड अपार्टमेंटमध्येच असून तो नवाझ शरीफ यांचा मुलगा हसन याच्या नावावर आहे. परंतु, हा फ्लॅट ऑफशोर कंपन्यांच्या माध्यमातून खरेदी केला नसून फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या युकेमधील नोंदणीकृत कंपनीमार्फत खरेदी करण्यात आला. यामधला दखलपात्र मुद्दा हा की, हसन शरीफ खुद्द या कंपनीचे संचालक आहेत. या फ्लॅटच्या कागदपत्रांनुसार, हा फ्लॅट २९ जानेवारी २००४ रोजी ३ लाख ६५ हजार पौंडात खरेदी करण्यात आला होता.

 

एवनफिल्ड हाऊस हे ऑफशोर कंपनीच्या मदतीने मालमत्ता विकत घेण्याचे तसे एकमेव उदाहरण नाही, तर लंडनमधील एग्डवेअर रोडवरही अशाच दीडशे मालमत्ता करनंदनवनामधील ऑफशोर कंपन्यांकरवी विकत घेतल्या जातात.

 

नवाझ शरीफांच्या कुटुंबीयांचे नेमके म्हणणे काय?

 

सौदी अरेबियामधील पेपर मिल विकल्यानंतर त्यातून मिळालेल्या पैशांमधून शरीफ कुटुंबीयांच्या व्यवस्थापकीय अधिकारांखाली असलेल्या ट्रस्टने २००६ साली या मालमत्ता विकत घेतल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

 

पनामा पेपर्समधून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, करनंदनवन असलेल्या ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमधील शेल कंपन्यांची ती मालमत्ता आहे. त्याचबरोबर फुटलेल्या कागदपत्रांनुसार, २००८ साली शरीफांची मुलगी मरियम आणि मुलगा हुसैन यांनी त्याच दोन शेल कंपन्यांच्या मालमत्ता आणि तिसऱ्या एका कूम्बर ग्रुपच्या बीव्हीआय कंपनीच्या माध्यमातून ७ दशलक्ष पाऊंडांचे कर्ज स्वीस बँकेशी संबंधित असलेल्या डॉईश बँकेकडून घेतले होते. पण, डॉईश बँकेला कुठल्याही गैरव्यवहारप्रकरणी यामध्ये गोवण्यात आलेले नाही.

 

खरं तर करनंदनवन असणाऱ्या या देशांमध्ये निनावी कंपनीच्या माध्यमातून मालमत्ता खरेदी करणे हे बेकायदेशीर नाही. पण, शरीफांनी पाकिस्तानातील जनतेचा पैसा, सरकारी तिजोरीतून शेल कंपन्यांना हाताशी धरून बेकायदेशीर मार्गाने वळवला आणि लंडनमध्ये स्वत:च्याच मालमत्तावाढीच्या दृष्टीने त्यांचा विनियोग केला.

 

पाकिस्तानी लष्कराची भूमिका

 

पाकिस्तानी लष्कराच्या अधिकार्यांनी अवघ्या आठवड्यावर असलेल्या या निवडणुकीत मात्र त्यांची कुठलीही भूमिका नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण, अधिक खोलात गेल्यावर समजते की, पाकिस्तानी लष्कर माध्यमांवर, पीएमएल-एन या शरीफांच्या पक्षावर तसेच पश्तुनी चळवळीवर दबाव टाकत आहे. त्यामुळे एकूणच पाकिस्तानातील परिस्थिती पाहता, लोकशाही पद्धतीने निवडणुकांची होणारी प्रक्रिया साशंकतेच्या भोेवऱ्यात सापडली असून ही लष्कराचीच एक चाल असल्याचे तेथील जाणकारांचे म्हणणे आहे.

 

शरीफ आणि कायदेशीर कारवाया

 

१९९३ साली नवाझ शरीफांना त्यांच्या पहिल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली पदच्युत करण्यात आले. त्यानंतर १९९९ साली परवेझ मुशर्रफ यांनी लष्कराच्या माध्यमातून बंड करून सत्ता हस्तगत केल्यानंतर शरीफांच्या पंतप्रधान म्हणून दुसऱ्या कार्यकाळात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. लष्कराच्या दबावापोटी त्यानंतर त्यांना देशाबाहेर हद्दपार केल्यानंतर सौदी अरेबियामध्ये त्यांनी आश्रय घेतला. त्यानंतर २००७ साली पाकिस्तानात पुन्हा परतल्यानंतर २०१३ साली तिसऱ्यांदा त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधानपद पुन्हा स्वीकारले.

 

निष्कर्ष

 

लाहोर विमानतळावर विमान उतरल्यानंतर प्रतिक्रिया देताना नवाझ शरीफ म्हणाले की, “मी जे काही करतोय ते केवळ पाकिस्तानी जनतेसाठी. कारण, निवडणुकीच्या तोंडावर पाकिस्तान एका भीषण वळणावर उभा ठाकला आहे.” पण, इथे हेही समजून घेतले पाहिजे की, स्वत: न्यायालयासमोर हजर राहणे ही खरं म्हणजे शरीफांची अपरिहार्यताच. कारण, ‘नॅब’च्या न्यायालयाने शरीफांना दोषी ठरविले असून त्यांना आधी अपील आणि नंतर जामिनासाठी अर्ज करायचा असल्यास पाकिस्तानात येण्याशिवाय दुसरे गत्यंतर नव्हते. जर त्यांनी पाकिस्तानात येऊन शरणागती पत्करली नसती तर ही समस्या अधिकच जटिल झाली असती. युकेचा पाकिस्तानसोबत आरोपींच्या प्रत्यार्पणासंबंधी कुठलाही करार नाही, पण, प्रत्यार्पण कायदा, २००३च्या १९४व्या कलमाअंतर्गत अपवादात्मक प्रकरणांमध्ये विशेष व्यवस्था करून आरोपांचा ठपका ठेवलेल्या व्यक्तीला त्याच्या मायदेशी प्रत्यार्पित करणे शक्य आहे.

 

नवाझ शरीफ आरोपी असल्याचा न्यायालयाने निकाल दिल्यामुळे शरीफांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे. २५ जुलैच्या तोंडावर असलेल्या निवडणुकीत शरीफ दोषी सिद्ध झाल्यामुळे पीएमएल-एनच्या प्रचाराचे तीनतेरा वाजले आहेत, तर दुसरीकडे शरीफांविरुद्धचा हाच निकाल पीटीआयला सर्वस्वी बळ देणाराच ठरला आहे. स्वात खोऱ्यातील एका रॅलीमध्ये पीटीआय प्रमुख इमरान खान यांनी न्यायालयाच्या या निकालाचे स्वागत केले. खान म्हणाले की, “आज सर्व पाकिस्तानी नागरिकांनी अल्लाला धन्यवाद देणारी प्रार्थना केली पाहिजे. कारण, आज एका नवीन पाकिस्तानची सुरुवात झाली आहे.” खान यांनी शरीफांविरोधातील या निकालाचे स्वागत केले व पीएमएल-एनचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याबद्दल समाधानही व्यक्त केले. त्यामुळे निवडणुका तोंडावर असताना शरीफांच्या या अटकेमुळे पीएमएल-एन समोर एक मोठे आव्हान उभे ठाकले असून या पक्षाच्या एकूणच राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

 
- संतोषकुमार वर्मा
 

(अनुवाद : विजय कुलकर्णी)

@@AUTHORINFO_V1@@