पुढील स्टेशन ‘प्रभादेवी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2018
Total Views |



देवीदेवता, श्रद्धा, परंपरा आणि त्यानुसार जगणारा-घडणारा आपला समाज. समाजाला त्या त्या काळात ‘समाज’ म्हणून बांधून ठेवणाऱ्या या अलौकिक श्रद्धांचा वारसा पुढे चालवणे गरजेचे आहे. कधी जगण्यातून तर कधी स्मरणांतून. ते स्मरण प्रत्येकवेळी मूर्तीतच असावे, असे नाही तर प्रत्येक स्तरावर या स्मरणाला आपण जागवू शकतो. प्रभादेवी स्थानकातून हे असे स्मरण आपण जागवले आहे. इतिहासाची पाने चाळली तर प्रभादेवीच्या नामस्मरणाचे स्थानक अस्तित्वात आले म्हणून मनात अभिमान, आनंद अशा संमिश्र भावना दाटून येतात.

 

बाराव्या शतकात मुंबईवर राजा बिंबदेवचे राज्य होते. राजाने महिकावती म्हणजे आताचे माहिम येथे राजधानी वसवली. राजाची कुलदेवता शाकंभरी देवी. तिचे मंदिर आताच्या प्रभादेवी परिसरामध्ये होते. कालांतराने मुघलांचे आक्रमण झाले. एत्तदेशीयांच्या श्रद्धा आणि धर्म बुडवणे यामध्ये अग्रेसर असलेल्या मुघलांनी देवीदेवतांच्या मूर्ती, मंदिरे क्रूरपणे तोडण्याफोडण्याचे काम केले. शाकंभरी देवीच्या मूर्तीचे पावित्र्य अबाधित राखणे गरजेचे होते. देवीची मूर्ती तिथून हलवली गेली आणि सतराव्या शतकात देवी शाम नाईक या पाठारे प्रभू समाजाच्या स्वप्नात आली. देवीने स्वप्नात दृष्टांत दिला की, एका विहिरीमध्ये देवीची मूर्ती आहे. दृष्टांताप्रमाणे देवीची मूर्ती विहिरीत आढळली. देवीच्या मूर्तीची पुन्हा स्थापना झाली आणि पाठारेप्रभूंच्या कुलदेवतेचे श्रद्धेने मंदिर उभारले गेले, हेच ते प्रभादेवीचे मंदिर. पाठारे प्रभूंची प्रभादेवी माता. १२-१३ शतकांच्या श्रद्धेचा प्रवास असा सतराव्या शतकापर्यंत आला. त्यानंतर पुन्हा ३०० वर्षांनंतर प्रभादेवीची प्रभामाया पुन्हा अवतीर्ण झाली आहे, प्रभादेवी स्थानकाच्या रूपात. एलफिन्स्टन स्थानकाचे नाव ज्या एलफिन्स्टन महाशयांवरून पडले, त्या एलफिन्स्टननेही मुंबईच्या शैक्षणिक आणि पाणीव्यवस्थेमध्ये पायाभूत कार्य केले. त्यामुळे त्यांचे नाव या रेल्वेस्थानकाला दिले होते. अर्थात, एलफिन्स्टन यांनी मुंबई नगरीसाठी केलेले योगदान हे काही प्रमाणात निःस्वार्थीही असेलही, मात्र त्यात मुंबईत आपली इंग्रजी राजवट सुलभ असावी, हा भावही असणारच. असो, काहीही झाले तरी, एलफिन्स्टन स्थानकाचे नाव बदलून प्रभादेवी स्थानक झाले, याचा इतिहासाची आणि संस्कृतीची जाण असणाऱ्यांना आनंदच झाला असेल. त्यामुळे चर्चगेटच्या दिशेने जाताना-येताना आता ऐकू येणार, ‘पुढील स्टेशन प्रभादेवी!’

 

शबरीमला ते निदा अंतर किती?

 

मी विवेकानंद म्हणाले होते की, “माझ्यात तोच ईश्वराचा अंश आहे, जो तुझ्यात आहे.” आपले माणूस म्हणून असे एक असणे, हे आपल्या संस्कृतीतच नव्हे, तर धर्मश्रद्धेतही प्रमाणभूत होते. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या समाजात माणुसकी आणि ईश्वरी वगैरे सर्व विचार फक्त आपल्या धार्मिक ग्रंथांत आणि श्रद्धेत. प्रत्यक्षात मात्र आपण फार वेगळे वागतो. हे असे वेगळे वागणे समाजजीवनात आजही जाणवते. पण, काळाच्या कसोटीत बदल होत जातो, बदल करावाच लागतो. कारण, परिवर्तन ही संसार का नियम है. जर हे परिवर्तन मानवी शाश्वत मूल्यांचा उद्घोष करत होत असेल तर त्याला तोड नाही.

 

हिंदू समाजाचे मोठेपण हेच की, असे मानवी शाश्वत मूल्यांचा उद्घोष करत अनेक परिवर्तन नव्हे, तर परिवर्तनाच्या लाटा समाजाने स्वीकारल्या. नुकताच शबरीमला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश देण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिले. आजपर्यंत शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश नव्हता. ती एक परंपरा होती आणि परंपरा हिंदू असलेल्या एका समाजगटाची होती. या मंदिरात महिलांना प्रवेश का नाही, म्हणून विचारणा करणाऱ्या महिलांना/पुरुषांना वाळीत टाका किंवा हा असा आदेश देणारे न्यायालय कोण?, म्हणून हिंदू समाजात विचारणा होणार नाही. कारण, या देशाची लोकशाही, या देशाची राज्यघटना आणि तिच्याद्वारे प्रस्थापित होणारी यंत्रणा समाजाने मनापासून स्वीकारली आहे. या पार्श्वभूमीवर निदा खानला वाळीत टाका, बहिष्कृत करा, असा फतवा काढणारा उत्तर प्रदेशच्या बरेली येथील इमाम मुफ्ती खुर्शीद आलम यांचा संदर्भ तात्काळ मनात येतो. निदावर बहिष्कार का तर ती तिहेरी तलाक आणि बहुपत्नीत्व या प्रथांना बळी पडलेल्या महिलांना मदत करते, इस्लामविरोधी आहे म्हणून. निदावर बहिष्कार टाका सांगणारा तथाकथित धर्मगुरूंचा फतवा आणि शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश द्या, सांगणारा न्यायालयाचा आदेश यामध्ये बरीच दरी आहे. या दरीमधले धगधगते वास्तव समजून घेणे गरजेचे आहे. कारण, स्त्री कोणत्याही धर्माची असू दे, शेवटी ती असते माणूसच, तिला माणूस म्हणून सर्व मानवी हक्क आणि अधिकार मिळायलाच हवेत.

 

9594969638
@@AUTHORINFO_V1@@