पदवी ते उद्योग यातील एका दुभाजकाचं अंतर- दत्तात्रय आदाटे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2018
Total Views |


 

साडेसात हजारांचा धनादेश घेऊन दत्ताने रस्ता दुभाजक पार केला आणि आपल्या डिप्लोमाचं प्रमाणपत्रंदेखील मिळवलं. शिक्षण ते स्वकमाई यातील अंतर अवघ्या एका रस्ता दुभाजकांत त्याने पार केलं. यानंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही.

 

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामधील बलगवडे गावातील नामदेव आदाटे मुंबईत आले. ते कारागीर होते. उत्तम प्रतीच्या चपला ते तयार करत. आत्माराम आदाटे त्यांचा मुलगा. ते मंत्रालयात कारकून म्हणून कामाला लागले. बायको, मुलगी आणि ३ मुलगे असा स्वत:चा प्रपंच सांभाळतानाच भावाचं कुटुंबदेखील ते सांभाळत होते. म्हणजेच जवळपास २५ -२६ जणांचं कुटुंब ते सांभाळू लागले. मंत्रालयाच्या पगारात काही भागत नव्हतं. मग त्यांनी नोकरीतून मिळालेल्या वेळेचा सदुपयोग उद्योगासाठी करण्याचे ठरविले. चर्मकार समाजातून असल्याने चर्माची चांगली जाण होती. कोल्हापूरच्या कोल्हापुरी चपला जगभर प्रसिद्ध आहेत. मात्र सगळीकडेच त्या ओरिजनल मिळत नाहीत. ही त्रुटी लक्षात घेऊन थेट कोल्हापूरवरून चपला आणून त्या मुंबईच्या चपलांच्या दुकानांत विकण्याचे त्यांनी ठरविले. त्याप्रमाणे सुट्टी असेल त्या दिवशी ते हा व्यवसाय करू लागले. त्यांना या कामी त्यांचा मोठा मुलगा दत्तात्रय मदत करू लागला. दत्ता वांद्य्राच्या शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा करत होता. कॉलेज करता करता वडिलांसोबत तो उद्योगाचे धडेदेखील घेत होता. त्याचं विपणन कौशल्य त्यामुळे वाढलं. या व्यवसायामुळे त्याला उमजलं की नोकरीपेक्षा उद्योगात जास्त पैसा आहे. चांगली जीवनशैली अनुभवायची असेल तर उद्योगाला पर्याय नाही.

 

१९९० साली दत्ताच्या कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं. शेवटच्या सत्राची परीक्षा होऊन नुकत्याच सुट्ट्या पडल्या होत्या. दत्ताची काकी वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात लिपिक म्हणून नोकरीला होती. सहज म्हणून दत्ता काकीला भेटण्यास म्हाडा कार्यालयात गेला. तिथे गेल्यानंतर त्याची ओळख कारखानीस या म्हाडा अधिकार्‍यांशी झाली. त्यांना दत्ताशी बोलताना त्याच्यामध्ये व्यावसायिक होण्याची क्षमता आहे, हे दिसले. त्यांनी दत्ताला बांधकामक्षेत्रात व्यवसाय करण्याविषयी प्रोत्साहन दिले. इतकंच नव्हे तर खात्यांतर्गत दत्ताला एक छोटंसं प्लास्टर करण्याचं काम दिलं. कामाचं मूल्य होतं फक्त ७ ,५०० रुपये. सिव्हिल इंजिनियर असल्याने दत्ताने एका गवंड्याला हाताशी धरून दिलेल्या मुदतीच्या आधीच ते काम पूर्ण केलं. ज्यांनी काम दिलं ते गृहस्थ खुश झाले. आपला शब्द पठ्ठ्याने खरा करून दाखविला म्हणून कारखानीससाहेब पण आनंदित होते. ज्या दिवशी दत्ता आपल्या पहिल्या कमाईचा पहिला धनादेश घ्यायला गेला त्याच दिवशी त्याच्या डिप्लोमाचा निकाल देखील होता.

 

म्हाडाच्या माध्यमातून त्याला अनेक कामे मिळू लागली. सिंगापूरच्या धर्तीवर अंधेरीत उभं राहिलेलं संगीत कारंजे हे दत्ता आदाटेंनीच उभारलं. अशा प्रकारचं महाराष्ट्रातील हे पहिलं आणि एकमेव कारंजे आहे. या कारंज्याचे बांधकाम अत्यंत विलोभनीय आहे. संगीत आणि प्रकाशयोजनेने हे कारंजे उजळून निघते. रात्रीच्या काळोखात हे कारंजे पाहणे म्हणजे एक पर्वणीच असते. त्याचप्रमाणे महालक्ष्मी येथील म्हाडाच्या इमारतीचा कायापालट करण्याचे कंत्राट दत्ता आदाटे यांना मिळाले होते. अन्य कंत्राटदारांनी हे बांधकाम होण्यास 3 महिन्यांचा अवधी लागेल, असे सांगितले होते. मात्र आदाटे यांच्या कंपनीने हे काम अवघ्या तीन दिवसांत केले. इतक्या कमी वेळेत बांधकाम करूनसुद्धा त्याचा दर्जा आणि मजबूती आजही टिकून आहे.

 

२०११ साली काही मित्रांच्या सोबतीने दत्ता आदाटेंनी ‘ग्रीनस्काय डेव्हलपर्स’ नावाची बांधकाम व्यावसायिक कंपनी सुरू केली. कॉलेजमध्ये असताना सोबत शिकणारे मित्रच या कंपनीमध्ये भागीदार आहेत. कर्जत येथे भव्य इमारत सध्या कंपनी बांधत आहे. दुसर्‍या घराचं स्वप्न पाहणार्‍या मध्यमवर्गीयांसाठी दत्ता आदाटेंनी उत्तम पर्याय दिलेला आहे. अवघ्या पाच वर्षांत ग्रीनस्कायने २२ कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल केली आहे.

दत्ता आदाटेंचा विवाह अश्विनीशी झाला. अश्विनी या टाटा कर्करोग रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. मात्र आदाटेंनी त्यांना व्यवसायाकडे वळविले. गेल्या ६ वर्षांपासून त्या ’वर्ल्डक्लास हॉलिडेज’ नावाची टूर कंपनी चालवित आहेत. या कंपनीची उलाढाल तब्बल दीड कोटी रुपये आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेऊन दत्ता आदाटे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी द्वारका फाऊंडेशनची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून गरजूंना शैक्षणिक आणि वैद्यकीय मदत पुरवली जाते. ही संस्था वेळोवेळी झोपडपट्टी परिसरात नेत्रचिकित्सा शिबीर भरविते.

शून्यातून सुरुवात करून निव्वळ कल्पकता, विपणन कौशल्य अर्थात मार्केटिंग स्कीलच्या जोरावर दत्ता आदाटेंची कंपनी २८ कोटी रुपयांहून अधिक रुपयांची उलाढाल करत आहे. चर्मकार समाजातील प्रस्थापितांची दुर्बल घटकांशी सांगड घालून चर्मकार समाजाची आणि पर्यायाने एकूणच दलित समाजाची आर्थिक भरभराट करणे, समाजातील तरुण रक्ताला उद्योगात वाव देणे, सामान्यांना त्यांच्या स्वप्नातील घर त्यांच्या बजेटमध्ये मिळवून देणे, हे उद्दिष्ट समोर ठेवून आदाटे सध्या कार्यरत आहेत. मदतीस धावून जाण्याच्या स्वभावामुळे सर्व समाजाच्या सगळ्या घटकांमध्ये दत्ता आदाटेंचे चांगले स्नेहबंध आहेत. हीच खरी आयुष्याची कमाई आहे, असे ते मानतात.

-प्रमोद सावंत

@@AUTHORINFO_V1@@