कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2018
Total Views |



पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये येत्या ४८ तासांमध्ये अतिवृष्टी होण्याच्या इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकणासह संपूर्ण राज्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला असून नागरिक आणि प्रशासनाला सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे मुंबई-पुण्यातील सर्व धरणे काठोकाठ भरली आहे. तसेच नदी-नाले देखील दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान विदर्भात मात्र पाऊसाचा जोर थोडा ओसरल्यामुळे नागरिकांचे जनजीवन पुन्हा एकदा सुरळीत झाले आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात पाऊसाने थोडी विश्रांती घेतली आहे. परंतु येत्या ४८ तासांमध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रीय होणार आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

यंदाच्या मौसमामध्ये राज्यात पावसाने अत्यंत दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे यंदा राज्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. राज्यातील अनेक धरणे यामुळे काठोकाठ भरली आहेत. यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. परंतु कोकणासह काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांवर मात्र मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@