पाखंड आवडे पुरोगाम्यांना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2018
Total Views |


 

हिंदूंच्या धर्मश्रद्धांना लाथाडायचे आणि अहिंदूंच्या धर्मश्रद्धांचा विषय आला की, पाय धरायचे, हीच देशातल्या पुरोगाम्यांची रीत. स्वामी अग्निवेश आणि फराह फैज यांना झालेली मारहाण व त्यावरील पुरोगाम्यांचा दुटप्पीपणा यातून पुरोगाम्यांची हीच रीत चव्हाट्यावर आली. यालाच पाखंड म्हणतात आणि पुरोगाम्यांना ते चांगलेच आवडत असल्याचे सिद्ध होते.

 

सातत्याने हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू धर्माविरोधात गरळ ओकणार्‍या स्वामी अग्निवेश या भोंदूबाबाला नुकताच झारखंडमध्ये संतप्त जमावाने चोप दिला. आपल्या आगलाव्या विधानामुळे नेहमीच प्रकाशझोतात राहणार्‍या स्वामी अग्निवेश यांना केलेल्या मारहाणीचे कोणीही समर्थन करू शकत नाही हे खरेच, पण त्यांच्यावर ही अशी मार खाण्याची वेळ नेमकी कशामुळे आली, याची तपासणी तर नक्कीच होऊ शकते. गेल्या काही वर्षांत आपला प्रसिद्धीकंडू शमवण्यासाठी हिंदू धर्माविरोधात बरळणार्‍यांची जणू काही रांगच रांग लागल्याचे आपण पाहिले. शशी थरूरांच्या दोन-तीन दिवसांपूर्वीच्या ‘हिंदू पाकिस्तान’ या विधानावरून त्याची खात्रीही पटते. स्वामी अग्निवेश यांनीही तसेच केले. हिंदू धर्माविरोधात नाही नाही ती विधाने, आरोप केले की, आपल्याला पुरोगामी गोतावळ्यात जागा मिळेल आणि त्यातूनच आपली प्रसिद्धीची हौसही भागेल, हा अशी विधाने करण्यामागचा या लोकांचा विचार (की कुविचार?). अशाच स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणार्‍या टोळक्यातला टोळीवाला म्हणजे स्वामी अग्निवेश. अंगात हिंदू धर्माने वैराग्याचे निदर्शक मानलेली भगवी वस्त्रे, डोक्यावर भगवी पगडी आणि चेहर्‍यावर हलकेसे स्मित ही त्यांची वरवरची ओळख पण या व्यक्तीच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या कारवाया पाहिल्या की, त्यांच्या भगव्या कफनीमागे दडलेला हिडीस चेहराच ठसठशीतपणे समोर येतो. पुरोगाम्यांच्या टोळक्यात जागा मिळावी म्हणून स्वामी अग्निवेश यांनी नेहमीच हिंदूंंच्या श्रद्धा, प्रतिके, अभिमानावर घाला घालण्याचे काम केले. हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र जगन्नाथपुरीत अहिंदूंना प्रवेश द्यावा, हे त्यांचे म्हणणे असो वा अमरनाथ गुंफेतले शिवलिंग हे फक्त बर्फाचा गोळा असल्याचे त्यांचे मत असो, वा मुस्लिमांनी वंदे मातरम म्हणणे आवश्यक नसल्याची भूमिका असो, स्वामी अग्निवेश यांनी कायमच हिंदू मान्यतांविरोधात, देशविरोधी कुप्रवृत्तींना खतपाणी घालणारीच विधाने केली. मूलतःच सहिष्णू असलेल्या हिंदू समाजाने एखाद-दुसरा अपवाद वगळता त्यांच्याविरोधात कुठलेही पाऊल उचलले नाही. आता मात्र भगव्या कपड्यात वावरणार्‍या स्वामी अग्निवेश यांच्या मुखातून जणू काही धर्मांध मुल्ला-मौलवी, पाद्री-बिशपच बोलल्याचे दिसते. स्वामी अग्निवेश यांनी साधुत्वाचा, हिंदुत्वाचा (भगवे कपडे घातल्याने हिंदू दिसत असलेला) बळी देत थेट गोमांस खाण्याचीच चिथावणी दिली. गाय ही मुळातच देशातल्या बहुसंख्य हिंदूंसाठी पूजनीय. हिंदूंच्या आस्थेचा, श्रद्धेचा, प्रार्थनेचा, जिव्हाळ्याचा, भावनेचा विषय, पण भगव्या कपड्यातल्या या ढोंग्याने हिंदूंचा जराही विचार न करता गायीचे मांस खाल्ले पाहिजे, असे सांगितले. देशात एका बाजूला गोमांसाच्या मुद्द्यावरून कोलाहल माजलेला असताना, कथित गोरक्षकांकडून हत्या होत असताना स्वामी अग्निवेश यांनी गोमांस खाण्याचे समर्थन करून देशातले वातावरण पेटविण्याचा, चिघळविण्याचा प्रताप केला. पण का? कशासाठी? ब्रेकिंग इंडिया फोर्सेसच्या इशार्‍यावरून स्वतःचे पुरोगामीपण उजळविण्यासाठी?

 

कोणी काय खावे, काय घालावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, हे खरेच. पण गेल्या काही काळापासून फक्त हिंदूंना, त्यांच्या धर्मस्थानांना, धर्मश्रद्धांना कमी लेखण्यासाठी काही लोक कामाला लागल्याचे दिसते. ही मंडळी कोणाच्या इशार्‍यावर काम करतात, हेही जगजाहीर आहे. वाद निर्माण होईल, अशी विधाने करायची आणि नंतर त्यावरून काहूर माजले की, हिंदूंनाच शिव्या घालायच्या, हिंदूंचीच लायकी काढायची, हेच या लोकांचे धोरण. याच धोरणाबरहुकूम ही मंडळी सतत काही ना काही वाद उकरून काढत स्वतःचा स्वार्थ साधत असतात. स्वामी अग्निवेश यांच्या आजच्या आणि याआधीच्या विधानांवरूनही हेच स्पष्ट होते. आपले पुरोगामीपण मिरवण्यासाठी सर्वच पुरोगामी धर्मचिकित्सेची भलामण करतात. स्वामी अग्निवेशही स्वतःला पुरोगामी म्हणतात. पण पुरोगामी खरेच एखाद्याच धर्माचा असतो का? पुरोगामी सर्वच धर्मांची चिकित्सा का करत नाहीत? पुरोगाम्यांच्या निशाण्यावर फक्त हिंदू धर्मच का असतो? हे प्रश्न निर्माण होतातच. कारण आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी धर्मचिकित्सा करत असल्याच्या फुशारक्या मारल्या त्या त्या लोकांनी कधी हिंदूंव्यतिरिक्त अन्य धर्मीयांची चिकित्सा केल्याचे दिसले नाही. बिग बॉससारख्या तद्दन फालतू कार्यक्रमात कोंडून घेण्यासाठी वेळ असलेल्या स्वामी अग्निवेश यांनीही कधी आपल्या पुरोगामीपणाला तावून सुलाखून घेण्यासाठी इस्लाम वा ख्रिश्चन धर्माविरोधात एक शब्दही काढला नाही. असे का? जर तुम्ही खरोखरच पुरोगामी असाल तर मग दाखवा ना हिंमत सर्वच धर्मांची चिकित्सा करण्याची. बोला ना तिहेरी तलाक, हलाला, बहुपत्नीत्व, मुस्लिमांत केल्या जाणार्‍या स्त्रियांच्या सुंता, मोहरममध्ये स्वतःला ब्लेड वगैरेसारख्या तीक्ष्ण हत्यारांनी जखमा करून घेण्याविरोधात, बोला ना हालेलुया की काय बोलून उपचार करणार्‍या पाद्य्राविरोधात, बोला ना मदर तेरेसांच्या संस्थेतून चालणार्‍या नवजात बालकांच्या तस्करीविरोधात, बोला ना व्हॅटिकनच्या दोन चमत्कारांआधारे एखाद्याला संतपद देण्याच्या बिनडोकपणाविरोधात पण नाही, तिथे इथल्या पुरोगाम्यांची दातखीळ बसते. तोंडातून शब्दही फुटत नाही. भीतीमुळेच ना? धर्मांधांना घाबरणारे आणि सहिष्णू हिंदूंविरोधात वळवळ करणारे असले कसले तुमचे शेपूटघाले पुरोगामित्व? सांगा सांगा. दुसरीकडे पुरोगाम्यांच्या घाबरगुंडी भूमिकेचा उल्लेख करण्यालाही काही कारणे आहेत.

 

देशात तमाम पुरोगाम्यांनी आपल्या कळपातल्या एकाला मारहाण झाल्याने कालवा केलेला असतानाच अशीच आणखीही एक घटना घडल्याचे त्यांच्या गावीही नाही. आजच ‘झी हिंदुस्थान’ या वृत्तवाहिनीवर तिहेरी तलाक आणि त्याविरोधात न्यायालयात गेलेल्या निदा खान या महिलेला वाळीत टाकण्याबद्दल एका मौलवीने काढलेला फतवा, या विषयावर चर्चा सुरू होती. चर्चेचा विषय अचानक टोकाला पोहोचला आणि कार्यक्रमात सहभागी झालेले ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मुफ्ती एजाज अरशद कासमी संतापले व त्यांनी चर्चेत सहभागी झालेल्या महिला वकील फराह फैज यांना मारहाण केली. चर्चासत्राची सूत्रधार पत्रकार आणि वृत्तवाहिनीच्या कर्मचार्‍यांनी मध्यस्थी करूनही मौलवींचा राग शांत झाला नाही. त्यामुळे नंतर पोलिसांनाच पाचारण करावे लागले व त्यांनी मौलवीला ताब्यात घेतले. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात स्वतःला इस्लामचा ठेकेदार समजणारा मौलवी चक्क सहभागी महिला वकिलाला मारहाण करतो, तर दुसरीकडे बरेलीतील इमाम मुफ्ती खुर्शीद आलम तिहेरी तलाकच्या माध्यमातून होत असलेल्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी न्यायालयात गेलेल्या एका महिलेला वाळीत टाकण्याचा फतवा काढतो, या गोष्टी म्हणजे धर्मांधतेचा कळसच. पण एवढे होऊनही, सगळ्या जगाने मारहाणीचा प्रकार पाहूनही पुरोगामी गोटातले सगळेच धुरंधर एकदम चिडीचूप. जसे काही घडलेच नाही. असे का? आतापर्यंत एकाही पुरोगाम्याने या मारहाणीविरोधात का ब्र देखील काढला नाही? निदा खान या महिलेला वाळीत टाकण्याबाबत काढलेल्या फतव्याविरोधात का एखाद्या पुरोगाम्याला तोंड उघडण्याची बुद्धी झाली नाही? ते जाऊ द्या, स्वामी अग्निवेश यांनी तरी का याबाबत एकही शब्द उच्चारला नाही? इथे समोर सहिष्णू हिंदू समाज नाही म्हणूनच ना? समोर स्वतःच्या धर्मश्रद्धांपायी कोणत्याही थराला जाणारा मुस्लीम समाज आहे, हे माहिती असल्यामुळेच ना? म्हणजे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इतके दिवस कंठशोष करून जपलेल्या पुरोगामित्वाचा मुडदा पडला तरी चालेल, असेच ना? यावरून हिंदूंच्या धर्मश्रद्धांना लाथाडायचे आणि अहिंदूंच्या धर्मश्रद्धांचा विषय आला की, पाय धरायचे हीच देशातल्या पुरोगाम्यांची रीत असल्याचे स्पष्ट होते. स्वामी अग्निवेश आणि फराह फैज यांना झालेली मारहाण व त्यावरील पुरोगाम्यांचा दुटप्पीपणा यातून पुरोगाम्यांची हीच रीत चव्हाट्यावर आली. यालाच पाखंड म्हणतात आणि पुरोगाम्यांना ते चांगलेच आवडत असल्याचे सिद्ध होते. मात्र, हे असे किती दिवस चालेल? कारण पुरोगामित्वाच्या बुरख्याआड लपलेल्या ‘ब्रेकिंग इंडिया फोर्सेस’चे चेहरे आता उघडे पडायला सुरुवात आली आहे. सोशल मीडियावर हास्यास्पद बनलेल्या पुरोगामी शब्दावरून त्याचीच प्रचिती येते. अर्थात स्वतःला हास्यास्पद बनविण्यासाठी जमाते-पुरोगाम्यांनीच जोर लावलाय आणि आपल्या उद्योगांतून जमाते-पुरोगामी स्वतःच स्वतःच्या चळवळीला निस्तेज केल्याशिवाय थांबणार नाहीत, हेही खरेच.

@@AUTHORINFO_V1@@