दैवी संपदा लेख - १५

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2018
Total Views |


 


समर्थ रामदास स्वामी व शिवराय या दोघांनाही माणसाच्या अंगच्या दैवी संपदेची चांगली जाण होती. शिवराय व रामदासस्वामी यांची कार्यक्षेत्रे भिन्न असली तरी बलवान, सुखी, समाधानी प्रजा असलेले हिंदवी स्वराज्य याबाबत दोघांचीही विचारधारा सारखी होती आणि ती एकमेकांच्या कार्याला पूरक अशीच होती. दोघांनीही दैवी संपदेचे संवर्धन आपापल्या परीने केले.


समर्थ रामदास स्वामींनी केलेले धार्मिक, सामाजिक आणि राजकीय तत्त्वचिंतन तसेच त्यांचे प्रपंचविज्ञानासंबंधी विचार सविस्तरपणे पाहण्याअगोदर आजच्या सामाजिक जाणिवा आणि उणिवा कशा प्रकारच्या आहेत, हे पाहणे उचित ठरेल. त्या पार्श्वभूमीवर रामदासस्वामींनी केलेल्या चारित्र्य संपन्नेच्या व बलसंवर्धनाच्या उपदेशाची उपयुक्‍तता समजू शकेल. त्यांचे महत्त्व पटेल. कोणत्या तरी कारणाने रामदास स्वामींच्या परिवर्तनशील चिंतनाकडे, त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष करणे, हे हतभागीपणाचे लक्षण आहे.

 

आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर आम्ही लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला. त्यालाही सत्तर वर्षांचा काळ उलटून गेला आहे. तरी आम्ही सुखी-समाधानी नाही. घटनेनुसार निवडणुका झाल्या. मताधिक्याने लोकप्रतिनिधी निवडले गेले. त्यांना संसदेत गेल्यावर देशाची सत्ता, संपत्ती मिळाली. कायदे बनविण्याचे अधिकार मिळाले. तरीही एकंदरीत जनता असमाधानी, अस्वस्थ व निराश दिसते. असे का व्हावे? यावर विचारपूर्वक चिंतन झाले तर त्यातून मार्ग काढता येईल. याचा अर्थ लोकशाही पद्धत समाधानकारकरित्या राबविण्यासाठी जे गुण आवश्यक असतात, त्या गुणांची जोपासना नीट झाली नाही. लोकशाही यशस्वी होण्यासाठी विवेक, प्रामाणिकपणा, समाजहित, बुद्धिप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा, धर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम इत्यादी अनेक गुणांची जोपासना केली पाहिजे. निर्भय, लोकहिताला प्राधान्य देणारे निःस्पृह राजकारणी तयार झाले पाहिजेत. तसेच आपल्या हक्कांबरोबर कर्तव्याची जाणीव असणारा समाज निर्माण झाला पाहिजे. यासाठी सर्व समाजाची घडी नव्याने बसवावी लागते. एखादी नवी पद्धत आणताना जुने संकेत टाकून देऊन त्याजागी नवे संकेत निर्माण करावे लागतात. नुसती आर्थिक सुबत्ता आल्याने समाजातील अस्वस्थता, नैराश्य, असमाधान जाईल, असे वाटत असले तरी तसे होत नाही. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी थोर विचारवंत डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे यांनी या संदर्भात लिहिले आहे की, “समाजाची काही नवी अवस्था करताना मनुष्याच्या अंगच्या दैवी संपदेची वाढ करणे आवश्यक असते. या दैवी संपदेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आणि आतापर्यंत संवर्धिलेली संपदा नाश पावत आहे, याची दखल न घेतल्याने आजचे अनर्थ ओढवत आहेत.” (संदर्भः ’समृद्धीचा शाप’ या निबंधातून) भगवद्‍गीतेच्या १६व्या अध्यायात एकूण २६ दैवी गुणांचा उल्लेख आहे. त्या सार्‍यांचे सार विवेकाधिष्ठित सत्वगुणयुक्त विचार आणि तेजस्विता, चारित्र्यसंपन्नता यात सामावलेले आहे. समर्थ रामदास स्वामींनी याच तेजस्विता व चारित्र्यसंपन्नतेवर भर दिला. समर्थ रामदास स्वामी व शिवराय या दोघांनाही माणसाच्या अंगच्या दैवी संपदेची चांगली जाण होती. शिवराय व रामदासस्वामी यांची कार्यक्षेत्रे भिन्न असली तरी बलवान, सुखी, समाधानी प्रजा असलेले हिंदवी स्वराज्य याबाबत दोघांचीही विचारधारा सारखी होती आणि ती एकमेकांच्या कार्याला पूरक अशीच होती. दोघांनीही दैवी संपदेचे संवर्धन आपापल्या परीने केले.

 

शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्यावेळी त्यांच्या मनात अनेक सुधारणावादी विचार होते. शिवछत्रपती हे शूरवीर, पराक्रमी, राजकीय मुत्सद्दी होते. हिंदवी स्वराज्य हे त्यांचे ध्येय होते, हे तर खरेच. परंतु, ते खर्‍या अर्थाने तत्त्ववेत्ते होते, राजर्षी होते. राजकारणाबरोबर धर्म, अर्थ, समाजसुधारणा या बाबतीतही विशेष लक्ष घालून एकंदर समाजाची चारित्र्यपूर्ण सुसंघटित पुनर्रचना करण्याकडे त्यांनी लक्ष दिले. नव्या आकांक्षांना विरोध करणारी माणसे ही सुद्धा शत्रूच समजली पाहिजेत. शिवरायांनी राजकीय शत्रूंप्रमाणे या माणसांशीही सामना केला आहे. अविवेकीपणे जुन्या तत्त्वविचारांना कवटाळून बसणे, हा नवसमाज निर्मितीच्या मार्गातील अडथळा आहे, हे रामदास स्वामी आणि शिवराय या दोघांनीही ओळखले होते.

 

शिवराय जसे धर्मरक्षक होते तसे ते क्रांतिकारी विचारांचे होते. स्वराज्याचा सरसेनापती नेताजी पालकरला औरंगजेबाने कैद करून दिल्लीला नेले, त्यावेळी मृत्युदंड किंवा धर्मांतर हे दोनच पर्याय त्यांच्यासमोर ठेवले गेले. मनाशी काहीतरी विचार करून त्याने मुसलमान व्हायचा पर्याय निवडला. कुलीखान महंमद या नावाने नऊ वर्षे तो मुसलमान म्हणून राहिला. औरंगजेबाने त्याला अफगाणिस्तानकडे झुंजवत ठेवले. नंतर युद्धाच्या निमित्ताने बहलोलखानाबरोबर दक्षिणेकडे आला असताना संधी साधून तो पळाला व जून १९७६ ला रायगडावर येउन शिवाजी महाराजांच्या चरणी लागला. नऊ वर्षे मुसलमान झालेल्या नेताजीला महाराजांनी परत हिंदू करून घेऊन आपल्या माणसांत आणले. महाराज त्यावेळी जास्त चिकित्सा करीत बसले नाहीत. “हा आपला माणूस आहे. याला प्रायश्‍चित्त देऊन परत हिंदू करून घ्या,” हे त्यांनी तत्कालीन शास्त्रीपंडितांना ऐकवले असणार. हे कृत्य क्रांतिकारक होते. शिवाजी महाराजांच्या ठिकाणी चारित्र्य व सौजन्य होते. प्रजेला दैवी संपदेचे धडे ते आचरणातून देत. कल्याणच्या सुभेदाराची तरुण रूपवान सून चुकून लुटीबरोबर आली. त्यावेळी ती शत्रूची स्त्री हा विचार न करता साडीचोळी देऊन महाराजांनी सन्मानपूर्वक तिला परत पाठवले होते. महाराजांच्या या सौजन्याची तारीफ त्यांच्या शत्रूंनीही केली आहे.

 

रामदासांच्या बाबतीत बोलायचे तर निवृत्तीवादाचा पगडा हिंदू मनावर अनेक शतके होता. त्याला छेद देऊन स्वतंत्र विचार मांडण्याचे धारिष्ट्य रामदासांनी दाखवले, तेही या अर्थाने क्रांतिकारक होते. चारित्र्य, विवेक, बलसंवर्धन यासंबंधी विचार मांडून ‘आधी प्रपंच करावा नेटका,’ ‘प्रपंच सांडून परमार्थ कराल। तरी तुम्ही कष्टी व्हाल,’ असे सांगितले. प्रपंच अशाश्‍वत हे खरे असले तरी तो शूरवीरप्रमाणे केला पाहिजे, प्रपंच सुखाचा वाटला तर ‘हा योग सुकृताचा’ असे म्हणून त्याचा उपभोग घ्या, फक्‍त त्याची आसक्ती ठेवू नका, ही विचारधारा नवीन आणि समाजाला आधार देणारी होती. श्रीरामाच्या भक्तीतून रामदासांनी चारित्र्यसंपन्नतेचे विचार समाजात दूरवर पसरवले. तसेच हनुमानाची उपासना सांगून पराक्रम व स्वामीनिष्ठा, भक्ती हे विचार समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवले. शिवरायांना हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी मिळालेल्या स्वामीनिष्ठा मावळा घडविण्याचे कार्य रामदास स्वामींनी निरपेक्ष बुद्धीने केले, असे म्हणायला हरकत नाही.

 

-सुरेश जाखडी

@@AUTHORINFO_V1@@