देव देव्हार्‍यात आहे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2018
Total Views |


 

देवघर-देव्हारे घडविणारे हातही खरं तर देवाचेच म्हणावे. कारण, ही कलाही तितकीच कौशल्याची आणि कल्पकतेला पुजणारी... तेव्हा परंपरागत व्यवसाय म्हणून देव्हारे घडविणाऱ्या प्रशांत ठाकूर यांच्याविषयी...

 

‘देव देव्हार्‍यात नाही... देव नाही देव्हार्‍यात’ हे गाजलेले गीताचे बोल... तसेच ’देव्हारे माजविणे‘ असाही एक प्रचलित वाक्प्रचार. या सर्वांतून ‘देव’ आणि ‘देव्हारा’ याबाबत नापसंतीचा भाव व्यक्त होतो. मात्र, असे असले तरी प्रत्येक कुटुंबातील घराच्या एका शांत, स्वच्छ कोपर्‍यात देव्हार्‍यात देव विराजमान असतातच. त्यामुळे हा देव्हारा म्हणजे आपल्या घरातील देवांचे साक्षात घरच. देवदेवतांची पूजा करताना मनात प्रसन्नतेचा भाव दरवळतो. त्याचप्रमाणे देव्हारेही मनात एक घर करुन जातात. देवांच्या मूर्ती बनवणार्‍यांइतकेच हे देव्हारे घडवणारे हातही तितकेच कुशल आणि कल्पक... त्यापैकीच एक म्हणजे नाशिकमधील प्रशांत ठाकूर.

 

नाशिकमधील रविवार पेठेतील गायधनी गल्लीत उमेश भवन या इमारतीत प्रशांत ठाकूर यांचे देव्हारे, पाट, चौरंग आदी वस्तू बनविण्याचे दुकान. त्यांनी हा पारंपरिक व्यवसाय मोठ्या जिद्दीने सांभाळला आणि पुढे नेला. वयाच्या पंचेचाळीशीत असलेले त्यांचे बंधू विजय सुधाकर ठाकूर हेदेखील प्रशांत यांच्या बरोबरीने सातत्याने या कामात कार्यरत दिसतात. हा व्यवसाय दिसतो तितका सोपा नाही. यामध्ये शारीरिक मेहनतही खूप असल्याचे प्रशांत सांगतात. सध्या ते पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांचे शिक्षण बी. कॉमपर्यंत. मात्र, अन्य नोकरी अथवा व्यवसाय करण्याऐवजी त्यांनी आजोबांपासून सुरू असलेला पाट, चौरंग, खेळणी बनविण्याचा परंपरागत व्यवसाय सांभाळण्याचे ठरविले. त्यांच्या आजोबांचे पंचवटीतील गोपाल मंगल कार्यालयाजवळ खेळण्यांचे दुकान होते. त्याकाळी लाकडी खेळणी जास्त प्रचलित होती. बसगाडी, बैलगाडी, चक्री असे अनेक प्रकार होते. देवदर्शनाला आलेले भाविक लहान मुलांना घेऊन येत. साहजिकच, खेळणी घेण्याचा हट्ट मुले करीत आणि आई-वडिलांना तो पुरवावा लागे. त्यामुळे हा व्यवसाय तेजीत होता. प्रशांत यांचे वडील सुधाकर ठाकूर यांनीदेखील आपली एमएसईबीतील नोकरी सांभाळून हा व्यवसाय केला. त्यात नंतर पाट आणि चौरंग बनविण्याची मागणी वाढली. लाकडी खेळण्यांकडे हळूहळू लोकांचा कल कमी होत गेला.

 

या दोघा भावांनी पाट, चौरंग बनविण्याच्या कामावर भर दिला. लग्नकार्यात चौरंग किंवा पाट वधूकडून वरास देण्याची पद्धत आहे. त्यामुळे लग्नाच्या हंगामात त्याला चांगली मागणी असते. त्यामुळे त्यांचे त्यात १९८८ पासून बस्तान बसले. त्यानंतर मात्र ते देव्हारे बनविण्याच्या कार्यास लागले. सध्या रविवार पेठेतील जागेत त्यांनी १९९४ पासून हा व्यवसाय सुरु केला. आता या व्यवसायास २५ वर्षे पूर्ण होतील.

 

“देव्हारे बनविण्यासाठी चांगले सागवानी किंवा शिश्याचे लाकूड वापरले जाते. पूर्वी साधे देव्हारे पसंत केले जायचे. पण, आता त्यामध्ये अनेक डिझाईन्सही उपलब्ध आहेत,” असे प्रशांत सांगतात. त्यांनी बनविलेल्या देव्हार्‍यांची किंमत ६०० रुपयांपासून पुढे सुरु होते. अनेक मोठे देव्हारेदेखील त्यांनी बनविले आहेत. शिरपूर येथील ग्राहकांच्या बंगल्यात ठेवण्यासाठी त्यांनी ६ फूट उंचीचा आणि ५ बाय ३ फूट अशी लांबी-रुंदी असलेला देव्हारा बनविला होता. तो सर्वात मोठा देव्हारा होता. लाकडी देव्हार्‍यांप्रमाणे पितळी देव्हारे आणि मार्बलचे देव्हारे घरात ठेवण्याची ‘फॅशन‘ निर्माण झाली होती. मात्र, आता पुन्हा लाकडी देव्हारे जास्त वापरले जातात. त्यामुळे वर्षभर त्याला चांगली मागणी असते. मागणी असली, तरी नाशिकसारख्या धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या नगरीत या व्यवसायातदेखील मोठी स्पर्धा दिसून येते. सुमारे दोनशेच्या आसपास व्यावसायिक या व्यवसायात असावेत. मात्र, टिकावू वस्तू बनविली, तर ग्राहक आपोआप आपल्याकडे येतात असा अनुभव ठाकूर सांगतात. सर्व कामे दोघे ठाकूर बंधू करीत असले तरी अनेकदा बाहेरील कारागिरांची मदत देखील घेतली जाते. “नाशिकमध्ये या व्यवसायावर उपजीविका करणारे एक ते दोन हजार कारागीर असावेत,” असा अंदाज प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.

 

मोठ्या कष्टाचे हे काम असल्याने सकाळी दहा ते रात्री आठ ते साडे आठ वाजेपर्यंत काम करावे लागते. पूर्वी तर सकाळी आठ ते रात्री दोनवाजेपर्यंत काम केल्याची आठवणही ते सांगतात. दोघे भाऊ स्वतंत्र जरी राहत असले तरी काम एकत्र करतात. त्यांचे कुटुंबदेखील आनंदात आहे. मात्र, त्यांची पुढील पिढी या व्यवसायात उतरेल की नाही, ते सांगता येत नाही. कारण, या व्यवसायात गुंतलेले प्रचंड कष्ट. तितके परिश्रम सध्याची पिढी करेल की नाही, ते मात्र सांगता येत नाही. प्रत्येक घरात देव्हार्‍यांचे स्थान अबाधित आहेच. तेव्हा, ते बनविणारे हातदेखील तयार होत राहतील आणि म्हणतील, ‘देव आहे देव्हार्‍यात...’

-पद्माकर देशपांडे

@@AUTHORINFO_V1@@