भीष्मांची शिकस्त !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2018
Total Views |




भीष्मांच्या ध्वजाचे तुकडे केले. त्यांचे धनुष्यही तोडले. हे पाहून भीष्म खुश झाले. अर्जुन भीष्मांकडे बाण सोडत होता खरा, पण त्यांना इजा होईल असे करत नव्हता.
 

पितामह भीष्म यांनी दुर्योधनाला वचन दिले होते की, ते शर्थीने लढतील. म्हणून दुर्योधन खुशीत होता. तो दु:शासनाला म्हणाला, “आज आपणच जिंकू आणि माझी कैक दिवसांची इच्छा आज पूर्ण होईल, असे वाटते. आज आपलं मुख्य काम भीष्मांचे रक्षण करणे हेच राहील. तू भीष्मांना संरक्षण दे. ते म्हणाले होते की, ते शिखंडीशी लढणार नाही. तर तू शिखंडीस त्यांच्यासमोर येऊच देऊ नकोस.” इकडे पांडव सैन्यात अर्जुन शिखंडीचे रक्षण करत होता. भीष्मांनी सर्वातीभद्र व्यूह रचला होता. म्हणजे सर्व बाजूंनी सुरक्षित. पांडवांकडून अभिमन्यूने हल्ल्यास सुरुवात केली. त्याच्याशी लढायला भीष्मांनी अलाम्बुश याला पाठविले. त्याने मायातंत्र वापरून रणांगणावर एकदम अंधार केला. अभिमन्यूने उत्तर म्हणून सूर्यास्त्र सोडले आणि सर्वत्र उजेड झाला.

 
अभिमन्यूचे सर्वांनी कौतुक केले. शेवटी अलाम्बुश मागे हटला. मग भीष्म अभिमन्यूसमोर आले. अर्जुन आपल्या पुत्राची मदत करायला पुढे आला. दुर्योधनाचे भाऊ भीष्मांच्या मदतीस आले. कृप आणि सात्यकी यांची जुंपली. कृप सात्यकीचा बाण लागून खाली पडले. त्यांना अश्वत्थाम्याने वाचविले. त्याच्या बाणाने सात्यकी बेशुद्ध झाला, पण तो लगेच सावरला. द्रोण आपल्या मुलाची मदत करायला पुढे आले. द्रोण व सात्यकी यांचे घनघोर युद्ध झाले. मग अर्जुन सात्यकीच्या मदतीस धावून आला. अर्जुन व द्रोण यांचे युद्ध सुरू झाले. अर्जुन तर द्रोणांचा आवडता शिष्य! त्याचे कौशल्य पाहून त्यांचे डोळे ओले झाले. अर्जुनाने त्यांच्यावर वायव्यास्त्र सोडले. त्या प्रचंड वादळाला तोंड देण्यासाठी द्रोण यांनी शैल अस्त्र सोडले, म्हणजे पर्वतास्त्र. त्यामुळे ते वादळ शमले. इकडे भीष्मांशी युधिष्ठिर लढू लागला. भीष्म खूप ताकदीने लढत होते. पांडव सैन्याचा ते अक्षरश: धुव्वा उडवत होते. प्रेतांची रास वाढत होती. दुर्योधनाचे बरेचसे सैन्य युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव यांनी कापून काढले म्हणून त्याने शल्य यांना पुढे धाडले. शल्य हा नकुल-सहदेव यांचा मामा. सर्व पांडव त्यांना पुत्रवत होते. तरी त्यांना लढणे भाग पडत आहे, हे पाहून युधिष्ठिर खूप दु:खी झाला. भीष्मांचा तर जोर आणि राग वाढतच होता. कृष्ण अर्जुनाला म्हणाला, “पितामहांनी तर आज पाच पांडव सोडून सर्वांनाच मारायचे ठरविलेले दिसते आहे.
 
तुला आपले सैन्य आता वाचविले पाहिजे. मी रथ पुढे भीष्मांसमोर नेतो. तू त्यांना ठार कर.” अर्जुन निराशेच्या सुरात बोलला, “सर्व नातेवाईकांना मारून या नरकावत पृथ्वीचे राज्य मला करायचे नाही. तरीही तू म्हणशील तसे मी करतो.” म्हणून अर्जुन पुढे आला. ही त्याची मृदुता पाहून कृष्ण चिडला. त्याने रथातून उडी मारली आणि हातात सुदर्शन चक्र धरले. त्याचे हे उग्र रूप पाहून सर्व भयभीत होऊन ओरडू लागले, आता भीष्म मरणार! पण भीष्म शांत होते. ते म्हणाले, ”हे परमेश्वरा, तुला पाहून मला आनंद होत आहे. तुझ्या हाती मृत्यू आला तर मला आनंदच होईल. ये, मी तुझी उत्सुकतेने वाटच पाहातो आहे.” क्षणात एवढे सर्व घडले आणि अर्जुन घाबरून गेला. तोही खाली उतरला. कृष्णाच्या पायी पडून अश्रूपूर्ण डोळ्यांनी तो म्हणाला, ”मी तुला प्रार्थना करतो की, तू असे करू नकोस. तुला तुझे वचन मी मोडायला लावले म्हणून मला लाज वाटते आहे. हे पाप माझ्या हातून घडले म्हणून मला क्षमा कर. तू हाती शस्त्र धरणार नाहीस, अशी शपथ घेतली होतीस आणि ती मोडली तर जग तुला खोटी शपथ घेतली म्हणून दोष देतील. तुझ्या कीर्तीला कलंक लागेल, असे मी तुला करू देणार नाही. मी तुला शब्द देतो की ज्यांना ठार करायचे आहे, त्यांना मी ठार करीन.” त्याचे हे शब्द ऐकून कृष्ण प्रसन्न झाला आणि पुन्हा रथावर आरूढ झाला. पण, त्याचा चेहरा मात्र त्याने गंभीर ठेवला. अर्जुन आता अधिक भयंकर दिसत होता. त्याने कौरवसेनेचे संहार सत्र चालू केले. इतक्यात संध्याकाळ झाली आणि युद्ध थांबले.

-सुरेश कुळकर्णी

@@AUTHORINFO_V1@@