बाळासाहेब अहिरे : संघचालकपद जगलेला स्वयंसेवक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2018
Total Views |


 

आदरणीय तुळशीराम नथूजी तथा बाळासाहेब (बापू) अहिरे यांच्या दि. १६ जुलै रोजी झालेल्या निधनाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नाशिक जिल्ह्यातील गेल्या ३५ वर्षांच्या कालखंडातील एका महान व्यक्तिमत्त्वाचा अंत झाला आहे. या कालखंडात कार्यरत असणारे शेकडो कार्यकर्ते त्यांना विसरू शकणार नाहीत. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख...


नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आराई हे बाळासाहेब अहिरे यांचे जन्मगाव. पुढे सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन काहीकाळ त्यांनी कराड येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले. त्यानंतर त्यांनी नाशिक येथे कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर म्हणून स्वतंत्र व्यवसाय सुरू केला.

 

संघसंपर्क व जबाबदारी

 

संघाच्या कामात प्रारंभी नाशिक ग्रामीण तालुक्याचे संघचालक म्हणून त्यांनी काम केले. अल्पावधीतच संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे ‘जिल्हा संघचालक’ म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जिल्हा संघचालक म्हणून त्यांनी स्वतःच्या कामाचा वेगळा ठसा उमटवला. जिल्ह्यातील ग्रामीण भागात त्यांनी भरपूर प्रवास केला. स्वतःच्या ग्रामीण पार्श्वभूमीमुळे तसेच नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी त्यांचे सगेसोयरे व मित्रपरिवार असल्यामुळे त्यांचा ग्रामीण भागात प्रभावी संपर्क उपयोगास येई. नाशिकमध्ये प्रथितयश व्यावसायिक असल्याने शहरातदेखील त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठ्याप्रमाणात उपयोग होई. संघकामासाठी स्वतःच्या वाहनासह सारथ्य करण्यासाठी ते सदैव तयार असत. एकदा तत्कालीन प्रांत संघचालक कै. प्रल्हादजी अभ्यंकर हे नाशिकमध्ये आलेले असताना, त्यावेळचे शहर संघचालक मा. नानासाहेब गर्गे यांच्या घरी घडलेला एक मजेदार प्रसंग आठवतो. प्रल्हादजींना पुढील प्रवासास जाताना त्यांच्या वाहनावर ड्रायव्हर पाहिजे आहे, अशी चर्चा सुरू होती. तिथे उपस्थित बाळासाहेबांनी तात्काळ स्वतः ड्रायव्हिंग करायची तयारी दाखवली. त्यावर मूळ मिश्किल स्वभावाच्या प्रल्हादजींनी “नको, नाकापेक्षा मोती जड नको!” असे म्हटले. बाळासाहेबांचे जिल्हा संघचालकपदाचे दायित्व त्यांनी लक्षात घेऊन सहजगत्या हे मार्मिक उद्गार काढले होते. दोघांचेही मोठेपण या प्रसंगात दिसून आले.

 

संघकामातील संघशिक्षा वर्गाच्या प्रशिक्षणाचे एक वेगळे महत्त्व असते. १९८६च्या के.टी.एच.एम महाविद्यालयात झालेल्या महाराष्ट्र प्रांताच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या संपूर्ण राज्यातून संघ कार्यकर्ते प्रशिक्षणासाठी आले होते. त्या वर्गात त्यांनी स्वतःची पन्नाशी पार केल्यावर संघाच्या द्वितीय वर्ष वर्गाचे प्रशिक्षण घेतले. लगेचच पुढे नागपूर येथील महिनाभराचे तृतीय वर्षाचे प्रशिक्षणदेखील पूर्ण केले. संघचालक या नात्याने त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. संघ कार्यकर्त्यांशी अथवा नवीन संपर्कात आलेल्या स्वयंसेवकांशी त्यांची लगेच जवळीक निर्माण करण्याची विलक्षण हातोटी होती. स्वयंसेवकाच्या घरात सर्वांशी थेट संपर्क व आत्मियतेचे संबंध हे संघकामाचे वैशिष्ट्य असते. बाळासाहेब सहजगत्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप मारून त्याला म्हणत, “मग, तुझ्या शाखेवर कधी येऊ?” अथवा “मग, तुझ्या घरी जेवायला कधी बोलावतो?” अशा शेकडो घरांमध्ये बाळासाहेबांचा सहजगत्या वावर असे. या सहजगत्या वावरण्यामध्ये स्वतःच्या समाजातील व्यावसायिक प्रतिष्ठेचा त्यांना कधी अडसर वाटला नाही.

 

डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी समारोह समितीचे उपाध्यक्ष

 

१९८९ साली संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी वर्षात संघाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांच्या संचालनासाठी गठीत केलेल्या महाराष्ट्र स्तरावरील समारोह समितीचे बाळासाहेब हे उपाध्यक्ष होते. त्या वर्षभरात बरेच कार्यक्रम व निधी संकलन झाले. अर्थातच बाळासाहेबांचा यात मोठा सहभाग होता.

 

वर्षभर झालेल्या कार्यक्रमांची नोंद एका स्मरणिकेद्वारे करण्याची कल्पना मांडून त्याचा पाठपुरावा तत्कालीन नाशिक विभाग प्रचारक (वर्तमान मा. सहकार्यवाह) मा. भैय्याजी जोशी यांनी केला. माझ्याकडे या स्मरणिकेचे संपादन करण्याचे काम होते. या स्मरणिकेत बाळासाहेबांनी प्रांत समितीचे उपाध्यक्ष म्हणून केलेल्या कामाची माहिती एका मुलाखतीद्वारे प्रसिद्ध व्हावी, असा विषय आल्यावर मी बाळासाहेबांना “मुलाखतीसाठी कधी भेटू?” असे विचारल्यावर नेहमीप्रमाणे बाळासाहेब म्हणाले, “तुझ्या घरी जेवायला कधी येऊ सांग?” त्याप्रमाणे भोजनासह मुलाखत आमच्या घरी झाली.

 

त्याचवर्षी जनकल्याण रक्तपेढीचा महत्त्वाचा प्रकल्प नाशिक शहरात आकारास आला. या रक्तपेढीच्या निर्माणात जागा शोधणे, त्याची बोलणी करणे व निधीसंकलन यात बाळासाहेबांचा मोठा सहभाग होता. या रक्तपेढीचे उद्घाटन तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या हस्ते झाले.

 

विश्व बौद्ध प्रदर्शनी

 

१९९३ साली तत्कालीन प्रांत प्रचारक कै. मुकुंदराव पणशीकर यांनी ब्रह्मदेशातील संघ प्रचारक रामप्रसादजी धीर यांनी भगवान गौतम बुद्धांनी स्थापन केलेल्या बौद्ध धर्माच्या विश्वव्यापी प्रसारावर आधारित एक भव्य चित्र, छायाचित्र, प्रतिकृतींनी युक्त विश्व बौद्ध प्रदर्शनी तयार केली असून त्यांचे संभाजीनगर, नागपूर व मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते. त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. असे प्रदर्शन नाशिकला करण्यासंबंधी त्यांनी सूचित केल्यावर बाळासाहेबांनी हा विषय लगेच उचलला. सामाजिक समरसता मंचाच्यावतीने झालेल्या या समितीचे भाऊसाहेब जगताप (सिद्धार्थ हॉटेलचे मालक) हे अध्यक्ष, बाळासाहेब अहिरे कार्याध्यक्ष, कै. प्रा. प्रभाकर मुंगी हे कार्यवाह व मी सहकार्यवाह होतो. या प्रदर्शनीच्या भूमिपूजनास कै. तात्यासाहेब शिरवाडकर उपस्थित होते. उद्घाटनासाठी विपश्यना विश्व विद्यालयाचे आचार्य गोयंकाजी हे उपस्थित होते. प्रचंड भव्यता असलेले हे प्रदर्शन बघण्यासाठी नाशिक जिल्हा तसेच धुळे, जळगाव या जिल्ह्यातूनदेखील मोठ्या संख्येने सर्वस्तरावरील समाज घटक आले होते. यात बौद्ध बांधवांचा सहभाग लक्षणीय होता. अर्थातच, बाळासाहेबांचे यातील योगदान महत्त्वपूर्ण होते. म्हणूनच हे सर्व प्रदर्शन पार पडले.

 

देवबांध प्रकल्प

 

रा. स्व. संघाचे मा. संघचालक म्हटल्यावर संघ विचारांच्या सर्व विविध क्षेत्रांत (वनवासी कल्याण आश्रम, विहिंप इ. विविध क्षेत्रे) सहजगत्या पालक म्हणून एक मान्यता व मानदेखील असतो. या विविध क्षेत्रांना वेळोवेळी लागणारी संसाधनांची मदत बाळासाहेब सहजगत्या करत होते. ज्येष्ठ संघप्रचारक कै. मोरोपंत पिंगळे यांच्या प्रेरणेने ठाणे जिल्ह्यातील मोखाड्याजवळील देवबांध गणेश संस्कार केंद्राच्या माध्यमातून जनजातीय बांधवांसाठी काही उपक्रम सुरू केले होते. बाळासाहेबांचा या प्रकल्पात सक्रिय सहभाग होता. तिथे नियमित जाताना नाशिकहून नवनवीन व्यक्तींना ते घेऊन जात.

 

दृष्टिबाधितांसाठी अखंड कार्य

 

‘राष्ट्रीय दृष्टिहीन कल्याण संघ’ हे संघटन दृष्टिबाधितांसाठी काम करणारे संघटन आहे. नाशिकच्या के.टी.एच.एम.महाविद्यालयातील प्रा. रकीबे हे या संघटनेचे काम करीत होते. त्यांच्या संघटनेच्या नियमित बैठकांसाठी जागा नव्हती. त्यांनी बाळासाहेबांना कॅनडा कॉर्नरवरील संघ कार्यालयात बैठकीसाठी जागा देण्याविषयी विनंती केली. बाळासाहेबांनी संघ कार्यकर्त्यांशी बोलून त्यांची व्यवस्था केली. पुढे बाळासाहेब त्यांच्या नियमित कामातच जोडले गेले. दृष्टिबाधितांच्या शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार, त्यांचे विवाह यासाठी ते कायम प्रयत्नशील असत.

 

पुढे रा. स्व. संघाच्या प्रेरणेने ‘अखिल भारतीय दृष्टिहीन कल्याण संघ’ हे नवीन संघटन सुरू झाले. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणीत माझ्याकडे या क्षेत्राशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी होती. तत्कालीन प्रांत प्रचारक मा. सुहासराव हिरेमठ यांच्याबरोबर प्रांतातील या संघटनेच्या संघाची उभारणी करताना बाळासाहेबांच्या या विषयात असलेल्या अनुभवाचा मी उल्लेख केला. स्वाभाविकच बाळासाहेबांकडे प्रांताचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी चालत आली. या संघटनेच्या कोटा (राजस्थान) येथे झालेल्या बैठकीत बाळासाहेबांसह काही कार्यकर्ते व मी उपस्थित होतो. या संघटनेची एकूण कार्यपद्धती व पुढील वाटचाल याविषयी तत्कालीन अ.भा.सेवाप्रमुख मा. भैय्याजी जोशी यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले. प्रांतात या संघटनेचे काम विस्तारण्यासाठी बाळासाहेबांचा भरपूर प्रवास झाला. काही ठिकाणी प्रवासात तसेच त्यांच्या प्रांत कार्यकारिणी बैठकीत बाळासाहेबांसह प्रवास करण्याचा मला योग आला. पुढे सर्व दिव्यांगांसाठी ‘सक्षम’ या संघटनेचा प्रारंभ झाल्यावर त्यातदेखील राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून बाळासाहेबांनी भरपूर काम केले. स्वतःच्या वैवाहिक जीवनाच्या सुवर्णमहोत्सवी समारंभातदेखील काही दिव्यांगांचे विवाह त्यांनी आयोजित केले.

 

शिवाम्बूचा प्रसार

 

बाळासाहेब एखाद्या विषयाशी जोडले गेले की, ते त्यात पूर्णपणे समरस होत असत. शिवाम्बूचे (स्वमूत्र) अभ्यासक होऊन पुढे ते त्याचे पक्के पुरस्कर्ते झाले. ते स्वतः प्रयोग करीत व इतरांनाही आग्रह करीत. जेथे जाऊ तेथे व जो भेटेल त्याला ते याविषयी भरभरून सांगत. अर्थात, यामागे सर्वसामान्य मनुष्य निरोगी राहावा व महागड्या औषधांमधून त्याची सुटका व्हावी, असा अत्यंत प्रामाणिक हेतू व तळमळ असे. याविषयी एक स्मरणात राहणारी घटना मला आठवते. आम्ही कोटा (राजस्थान)येथील बैठकीला मुंबईहून निघणाऱ्या रेल्वेसाठी नाशिकहून बसने निघालो. बस साधारणत: नाशिकच्या पुढे गेल्यावर बाळासाहेब एखाद्या बसमध्ये ओरडून विक्री करणाऱ्या विक्रेत्याप्रमाणे उभे राहिले. सर्वांचे लक्ष वेधून त्यांनी चालत्या बसमध्ये शिवाम्बूसंबंधी ओरडून माहिती सांगितली. त्याचे पत्रक सर्वांना वितरीत करून ज्यांना पाहिजे असेल त्यांना एक-एक रुपयाला त्यांनी ते पत्रक दिले. बाळासाहेबांचा हा निराळाच पैलू आम्हाला दिसला. स्वतःचे स्थान-प्रतिष्ठा विसरून भावलेल्या कामातील अगदी छोटेसे वाटणारे कामदेखील किती तन्मयतेने करता येते, ते आम्हाला प्रभावित करून गेले. अशा छोट्याशा कृतीतून मोठ्या माणसाचे मोठेपण उठून दिसते.

 

नाशिकमधील ‘दी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी’ , ‘लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ’, ‘चित्रकला महाविद्यालय’ या शिक्षणसंस्थांच्या व्यवस्थापनात त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या घेऊन त्या पार पाडल्या.

 

संघचालक-पालक

 

बाळासाहेबांचे स्वयंसेवकत्व हे असे सर्वव्यापी होते. जेथे जाऊ तेथे स्वयंसेवकांच्या भूमिकेतून त्यांनी तळमळीने काम केले. तसेच संघचालक या नात्याने पालक म्हणून त्यांनी पेललेली जबाबदारी सच्च्या वडीलधाऱ्या पितृतुल्य व्यक्तिमत्त्वाची होती. संघातील संघचालक या नात्याने सहजपणे सामान्य स्वयंसेवकांच्या सुखदुःखाशी समरस होण्याबरोबरच समाजातील मान्यवरांना संघाशी जोडण्याचे काम करावे लागते. या दोन्ही कामांमध्ये खूपच लवचिकता ठेवावी लागते. बाळासाहेबांनी ही दोन्ही कामे तन्मयतेने केली. अशा महान व्यक्तिमत्त्वास विनम्र अभिवादन!

 

दिलीप क्षीरसागर

 

(लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचारप्रमुख आहेत.)

 
9422245582
@@AUTHORINFO_V1@@