38 खासदारांना दिले प्रत्येकी 1 लाखाचे आयफोन ‘गिफ्ट’ !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2018
Total Views |



 


बंगळुरू : कर्नाटक राज्यात सत्तेत असलेल्या जनता दल-सेक्युलर आणि काँग्रेस आघाडी सरकारचे एकामागोमाग एक प्रताप रोज उघडकीस येत आहेत. परवा खुद्द मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेस आणि प्रशासनाविरुद्ध जाहीरपणे रडारड केल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळातील जलसंपदामंत्री डी. शिवकुमार यांनी तर सरकारची पुरती बेअब्रूच करायचे ठरवले आहे. नुकतेच या महाशयांनी कर्नाटकमधील ३८ खासदारांना प्रत्येकी तब्बल १ लाख रुपये किमतीचे आयफोन भेट म्हणून दिले आहेत.

 

मंगळवारी नवी दिल्ली येथे कावेरी नदीप्रश्नी झालेल्या एका बैठकीला उपस्थित राहिलेल्या राज्यातील २६ लोकसभा तर १२ राज्यसभा खासदारांना या शिवकुमार यांनी महागडे आयफोन्स भेट दिले. तब्बल २५६ जीबी क्षमता असलेल्या या एका ‘आयफोन एक्स’ची किंमत एक लाख रुपये इतकी आहे. हे शिवकुमार एवढ्यावरच थांबले नाहीत तर प्रत्येकाला सुमारे ५ हजार रुपये किमतीची चामड्याची बॅगदेखील त्यांनी भेट दिली. विशेष म्हणजे, राज्यातील भाजपच्या १८ लोकसभा खासदारांनी जलसंपदा मंत्र्यांनी दिलेली ही भेटवस्तू घेण्यास नम्रपणे नकार दिला.

 

हा सर्व प्रकार लोकशाहीसाठी लज्जास्पद असल्याची टीका भाजप खासदारांनी केली. “जनतेच्या पैशांमधून तुम्ही अशा भेटवस्तू का दिल्या?,” असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणतात की, “शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी, विद्यार्थ्यांना बसेसचे पासेस देण्यासाठी, किनारी आणि उत्तर कर्नाटकच्या विकासासाठी सरकारकडे पैसे नाहीत. मग, अशी महागडी भेटवस्तू द्यायला सरकारकडे पैसे कसे काय आले?,” असा टोला कर्नाटक भाजपने लगावला. आश्चर्य म्हणजे, मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आपल्याला हा सारा प्रकार माहीतच नसल्याचे सांगितले. तर, डी. के. शिवकुमार यांनी भाजपचे आरोप फेटाळून लावत, “आपण स्वतः या आयफोन्सचा खर्च केला आहे, तो माझाच निर्णय होता आणि यामध्ये सरकारने खर्च केलेला नाही,” असे स्पष्ट करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, या सार्‍या प्रकारामुळे आधीच टीकेचे धनी ठरलेले कुमारस्वामी सरकार आणखीनच संकटांच्या गर्तेत सापडले आहे. या सर्व प्रकारावर सोशल मीडियामधूनही सर्वसामान्य नागरिकांनी शेलक्या शब्दांत टीका केली.

@@AUTHORINFO_V1@@