ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर साहस पुरस्कार प्रदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2018
Total Views |
 

 

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना यावर्षीचा स्वातंत्र्यवीर सावरकर साहस पुरस्कार निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मार्सेलिसच्या समुद्रात उडी मारली त्या दिवसाचे स्मरण म्हणून पुणे नगर हिंदूसभेतर्फे हिंदूहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. पुण्यात नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रभुणे यांना प्रदान करण्यात आला. संस्कृत भाषेत लिहिलेले सन्मानपत्र आणि ५१,००० रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
गिरीश प्रभुणे यांचा अल्प परिचय :

गिरीश प्रभुणे ‘भटके-विमुक्त विकास परिषदे’च्या माध्यमातून भटक्या-विमुक्त समाजासाठी गेली अनेक वर्षे कार्य करत आहेत. त्यांनी तुळजापूर जवळच्या यमगरवाडी वैदू, कैकाडी, पारधी इत्यादी समाजातील मुलांसाठी खूप मोठे सामाजिक कार्य केले आहे. सध्या चिंचवड येथील ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’मध्ये भटक्या समाजातल्या साडेतीनशे मुलामुलींचे शिक्षण व कौशल्यविकास यासाठी ते विशेष प्रयत्न करत आहेत. अशा प्रयत्नांमुळे या समाजात होत असलेल्या धर्मांतरणासारख्या समस्या रोखण्यासही मदत झाली आहे. गिरीश प्रभुणे यांनी आपल्या प्रभावी लिखाणातूनही भटक्या-विमुक्तांच्या अपरिचित जगाचे वास्तव सातत्याने मांडलं आहे आणि त्यामुळे त्या समाजाच्या समस्या सर्वत्र पोचण्यास मदत झाली आहे. 
 
सावरकरांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा आपल्या कामामागे असल्याचे पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केलेल्या मनोगतात प्रभुणे यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले. “स्वा. सावरकरांनी रत्नागिरी पर्वात केलेले कार्य अतुलनीय होते. पूर्वास्पृश्य समाजातल्या माणसांचे उत्थान व्हावे यासाठी त्यांनी रत्नागिरी येथे केलेले प्रयत्न बाळाराव सावरकरांच्या ‘रत्नागिरी पर्व’ या पुस्तकात वाचलेले असल्यामुळे पुढे सामाजिक कार्याला सुरुवात केली तेव्हा स्वा. सावरकरांचे विचार कायम डोळ्यासमोर होते” असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांच्या नावाचा साहस पुरस्कार आपल्याला मिळत असला तरीही त्यांच्या तोडीचे साहस आपण केलेले नाही, पण या पुरस्कारामुळे यापुढे असे साहस करण्याची प्रेरणा निश्चितच मिळाली आहे. या प्रसंगी लव्ह-जिहाद, शहरी नक्षलवाद यांच्या विरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांचाही सत्कार केला गेला गेला.
 
 
यानंतर स्वा. सावरकरांचा आस्थाविषय असणाऱ्या ‘भारताची सुरक्षा’ याविषयावर प्रसिद्ध सुरक्षातज्ज्ञ ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे व्याख्यान झाले. भारताच्या सुरक्षेला चीन, पाकिस्तान, बांगलादेशी घुसखोर आणि नक्षलवादी यांच्याकडून असणाऱ्या धोक्याबद्दल त्यांनी विस्तृत विवेचन केले. चीनचे भारताला असणारे आव्हान भारताची युद्धसज्जता यांची माहिती देतानाच चिनी धोरणांना प्रत्युत्तर देण्यासाठी सामान्य जनतेकडून चिनी मालावर बहिष्कार घालण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी आग्रहाने सांगितले. अशा कार्यक्रमांमुळे राष्ट्रीय महत्वाच्या प्रश्नांवर मंथन घडून येणे हे निश्चितच महत्वाचे आहे असे महाजन यावेळी म्हणाले.


 
@@AUTHORINFO_V1@@