उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ११ ऑगस्ट रोजी नामविस्तार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2018
Total Views |

ना.तावडेंच्या विधेयकाला नाथाभाऊंचे अनुमोदन
मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित

 
 
बहिणाबाईंचे नाव देणारे विधेयक एकमताने संमत
बहिणाबाईंनी कविता लिहिल्या नव्हत्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र सोपानदेव यांनी आठवतील तेवढ्या कविता लिहून काढल्या. ते बाडही कुठेतरी पडले होते. कुणीतरी ते आचार्य अत्र्यांकडे पाठवले. ते वाचून अत्र्यांना काहीतरी ठेवा सापडल्याचा आनंद झाला. त्यांनी ते स्वतःच्या प्रस्तावानेसह प्रकाशित केले, अशी आठवणही नाथाभाऊंनी सांगितली.
जळगाव, १६ जुलै :
कवितेतून जीवनाची बाराखडी मांडणार्‍या खान्देशकन्या बहिणाबाई यांचे नाव जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला देणारे विधेयक सोमवारी विधानसभेने एकमताने संमत केले. त्यानुसार येत्या ११ ऑगस्ट रोजी बहिणाबाईंच्या जयंतीदिनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा नामविस्ताराचा कार्यक्रम होईल अशी माहिती शिक्षणमंत्री ना.तावडे यांनी दिली. तावडेंनीच मांडलेल्या या विधेयकाला ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे यांनी अनुमोदन दिले. या विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी किंवा साने गुरूजी यापैकी कुणाचेही नाव देण्यात यावे अशी मागणी बर्‍याच काळापासून संपूर्ण खान्देशभर होत होती. त्या अनुषंगाने काही संस्था आणि संघटनांनी निवेदने देत आंदोलनही केले होते. अखेर राज्य सरकाने त्याची दखल घेत हा निर्णय घेतला. आ.संजय सावकारे म्हणाले की, खान्देशवासीयांची अनेक वर्षांची मागणी आज पूर्ण झाली आहे. ही अशी पहिलीच कवयित्री असावी की, जिने स्वतःच्या कविता लिहून ठेवल्या नाहीत असेही सावकारे म्हणाले.
 
 
आ.हरिभाऊ जावळे यांनी अनुमोदन देताना दोन सूचना केल्या. त्यात ११ ऑगस्ट रोजी बहिणाबाईंच्या जयंतीदिनी हा नामविस्ताराचा कार्यक्रम करावा आणि असोदा येथे बहिणाबाईंच्या जन्मगावी रखडलेले बहिणाबाईंच्या स्मारकाचे काम वेगाने मार्गी लावावे असे ते म्हणाले.
 
 
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, बहिणाबाईंच्या साहित्याचा दर्जा हा मराठीची उंची वाढविणारा आहे. स्त्रीगीतांची ओव्यांची परंपरा त्यांच्या अनुभवांनी समृद्ध केली. त्यांचे नाव विद्यापीठाला देणे हा विद्यापीठाचा आणि राज्य शासनाचाही गौरव आहे.
 
 
छगन भुजबळ आणि अजितदादा पवार यांनीही या विधेयकास पाठिंबा दिला. आमच्या हातून हे काम राहून गेले अशी खंत अजितदादांनी व्यक्त केली. या दोघांसोबतच गणपतराव देशमुख, हर्षवर्धन सपकाळ, किशोरअप्पा पाटील, मंदाताई म्हात्रे, दिलीप वळसे पाटील यांनीही या विधेयकाला अनुमोदन देणारी भाषणे केली.
 
 
बहिणाबाईंच्या नावाने बोलीभाषेचे अध्यासन स्थापण्याचा विचार : तावडे
सदस्यांच्या सूचनांवर उत्तर देताना विनोद तावडे म्हणाले की, बहिणाबाईंच्या नावाने अध्यासन निर्माण करण्याची सूचना स्वागतार्ह आहे. आज बोलीभाषेचा एकही विभाग कुठल्याही विद्यापीठात नाही. यानिमित्ताने बहिणाबाईंच्या नावाने अध्यासन आणि बोलीभाषेचा विभाग सुरू करण्याचा विचार शासन करीत आहे.
 
 
नाथाभाऊंचे भारावलेले अनुमोदन
विधेयकाला अनुमोदन देताना आ.एकनाथराव खडसे भारावून गेले होते. त्यांनी बहिणाबाईंच्या अनेक कविता उद्धृत केल्या. खान्देशातील जनतेची ही मागणी मंजूर होत असल्याचा आनंद व्यक्त करून जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांपुरते असलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव उत्तम शिक्षणामुळे सर्वदूर पोहोचत आहे, त्याच्या जोडीला बहिणाबाईंचे नाव जोडले जाणे हे अत्यंत आनंददायी असल्याचे ते म्हणाले. यानिमित्ताने बहिणाबाईंचे नाव जगभर जाईल याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. लौकिकार्थाने अशिक्षित असलेल्या स्त्रीचे नाव विद्यापीठाला देण्याचा हा कदाचित पहिलाच प्रसंग असावा असे सांगून नाथाभाऊ म्हणाले की, बहिणाबाई या स्वतःच एक विद्यापीठ होत्या.
@@AUTHORINFO_V1@@