न पेटणारे दूध!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2018
Total Views |



आज ९० रु. लिटर दराने विकले जाणारे दूधही राज्याच्या बाजारात उपलब्ध आहे आणि लोक ते घेतातही. राजू शेट्टींना हे ठाऊक आहे का? राज्यातल्या शेतकरी आणि दूध उत्पादकांना अशी काहीतरी नवीन दिशा दाखविण्याचे काम राजू शेट्टी कधी करतील का, त्यासाठी कधी सरकारदरबारी भांडतील का?

 

दुधाच्या दरावरून राज्यातले राजकारण पेटविण्याचा प्रकार सध्या महाराष्ट्राच्या मातीत सुरू आहे. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याकामी पुढाकार घेत मुंबई, पुणे, नाशिक आणि राज्यातल्या महत्त्वाच्या शहरांचा दूध पुरवठा रोखण्याची आरोळी ठोकली. शेतकरी आणि दूधउत्पादकांचे आम्हीच एकमेव तारणहार असल्याचा आव आणत राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या आंदोलनांतर्गत बहुमोल असे दूध रस्त्यावर ओतून देण्याचाही प्रताप केला. पण, शेतकर्‍यांविषयी सहानुभूती दाखविणार्‍या या लोकांचे उद्देश खरेच तसेच आहेत का, की त्यामागे काहीतरी वेगळेच आहे? हा प्रश्न इथे नक्कीच विचारावासा वाटतो. कारण, राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दूध दरावरून शेतकर्‍यांच्या नावाने कळवळा दाखवत आंदोलने जरूर केली, पण शेतकरी आणि दूध उत्पादकांना आपल्यावर ही आंदोलने करण्याची परिस्थिती कशा आणि कोणामुळे आली, हे सांगण्याचा, त्यावर नेमका काय उपाय करता येईल, हे शोधण्याचा प्रामाणिकपणा कधीच दाखवला नाही. केवळ दुधाच्या दरावरून शेतकरी-दूध उत्पादकांच्या भावना भडकवायच्या आणि मनाला येईल तेव्हा दुधाचे दर वाढवून द्यायची मागणी करायची, दोन-तीन दिवस स्वतःची प्रसिद्धीची हौस भागवायची एवढाच खेळ त्यांनी खेळला.

 

आताही राज्य सरकारने दुधाचा दर वाढवून न दिल्यास मुंबई, पुण्याचा दूधपुरवठा रोखू म्हणणार्‍या राजू शेट्टींना आपण यातून शेतकरी आणि दूध उत्पादकांचेच नुकसान करतोय, हेही समजण्याची कुवत नाही. कारण राजू शेट्टींनी दूधपुरवठा रोखण्याची नौटंकी सुरू केलेली असतानाच गुजरातहून रेल्वेद्वारे मुंबईला दुधाचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली. म्हणजेच यातून इथल्या शेतकरी आणि दूध उत्पादकांनी संकलित केलेले दूध आपल्या आंदोलन हौसेपायी रस्त्यावर फेकून द्यायचे आणि परराज्यातल्या दुधाला इथे हातपाय पसरायला आवताण द्यायचे, हीच राजू शेट्टींची उफराटी चाल असल्याचे दिसते. अशावेळी निदान शेतकरी आणि दूधउत्पादकांनी तरी या माणसाच्या नादाला न लागता, त्यांच्या राजकारणाला बळी न पडता आपले हित कशात सामावलेले आहे, त्याचा विचार करायला हवा. कारण राजकारणी मंडळी ही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना वापरून घेण्यात पटाईत असतात, त्यासाठीच त्यांचे अमुक बंद कर-तमुक बंद कर असले उद्योग सुरू असतात. त्यामागे जनहिताची गोष्ट वगैरे नव्हे, तर लबाड लांडग्यांचाच कावा असतो. उद्या परराज्यातल्या दुधाने इथे जम बसवला तर इथल्या शेतकर्‍यांनी आणि दूध उत्पादकांनी कोणाकडे पाहायचे, कोणाकडे जायचे, याचे उत्तर राजू शेट्टी देतील का? तर नाही, तेव्हाही ते दूध विक्री होत नाही म्हणून सरकारच्याच नावाने बोंब मारणार! त्यामुळे शेतकरी आणि दूध उत्पादकांनीच त्यांचा योग्य मार्ग निवडणे गरजेचे ठरते.

 

शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या दर वाढवून देण्याच्या मागण्या रास्त आहेत, हे मान्य. पण, त्यासाठी दूध रस्त्यावर फेकून देणे वा पुरवठा रोखून धरणे हे उपाय असू शकत नाहीत. कारण, आता जगाची अवस्था एखाद्या खेड्यासारखी झाली असून इथे कुठलीही गोष्ट तंत्रज्ञान आणि वाहतुकीच्या साधनांनी कुठेही पोहोचविता येते. जसे गुजरातहून दूध पोहोचविण्याचा निर्णय झाला, तसे अन्य राज्यांतूनही होऊ शकतो. शिवाय दूध दरवाढीसाठी प्रत्येकवेळी सरकारपुढेच गार्‍हाणे मांडले जाते. त्यापुढे जात नवीन काहीतरी करण्याची इच्छा ना नेतेमंडळी दाखवतात ना सहकारी दूध संघ. सगळे काही सरकारनेच करावे, ही मानसिकता या गोष्टीला कारणीभूत आहे. विशेष म्हणजे ही मानसिकताही याच राजकारण्यांमुळे पैदा झालेली. आज दुधाच्या दरवाढीवरून आंदोलनाचे रान पेटवणारे सरकारकडे कधी आम्हाला दररोज ६०-७० लिटर दूध देणार्‍या गायी उपलब्ध करून देण्याची मागणी का करत नाहीत? या लोकांना पशुपालन, दूध उत्पादन, त्याची पॅकिंग, साठवणूक, त्यावरील प्रक्रिया उद्योगांसाठी कधी आंदालने करण्याची बुद्धी का होत नाही? सुरुवातीला सरकारी दूध डेअरीत आणि त्यांच्या मृत्यूनंतर सहकारी दूध संघांच्या डेअरीत दूध घालण्याव्यतिरिक्तही आपण काहीतरी करू शकतो, ही दिशा शेतकर्‍यांना दाखविण्याचे काम का कधी राजू शेट्टींनी केले नाही? दुधावर प्रक्रिया करून त्यापासून चीजसारखे पदार्थ तयार करण्याची क्षमता आपल्यातही निर्माण व्हावी, यासाठी का राजू शेट्टी रस्त्यावर उतरत नाहीत? सध्याच्या डेअरीत दूध घालण्याच्या एका पर्यायाव्यतिरिक्त दुसरा पर्याय राजू शेट्टी का शोधत नाही, त्याचा अभ्यास का करत नाहीत? आज मुंबईतल्या कुठल्याही दुकान, मॉलमध्ये गेलात तर तुम्हाला अमूलया देशी ब्रँडव्यतिरिक्त सर्वच परदेशी ब्रॅण्डची चीजची पाकिटे दिसतात, असे का? याचाच अर्थ महाराष्ट्रात असा काही पदार्थ तयार करणारी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही, असेच ना? मग अशी यंत्रणा उभी करण्यासाठी राजू शेट्टींनी का कधी प्रयत्न केले नाहीत? साधी गोष्ट आहे, कोणत्याही नैसर्गिक उत्पादित मालावर, वस्तूवर प्रक्रिया केली की त्याचे मूल्य वाढते. दूध आणि दुधापासून तूप, पनीर, चीजसारखे पदार्थ तयार केले की, ते आपोआपच अधिक दरानेच विकले जातात. आज ९० रु. लिटर दराने विकले जाणारे दूधही राज्याच्या बाजारात उपलब्ध आहे आणि लोक ते घेतातही. राजू शेट्टींना हे ठाऊक आहे का? राज्यातल्या शेतकरी आणि दूध उत्पादकांना अशी काहीतरी नवीन दिशा दाखविण्याचे काम राजू शेट्टी कधी करतील का, त्यासाठी कधी सरकारदरबारी भांडतील का?

 

आज राजू शेट्टी आणि त्यांच्यामागे धावणार्‍या बगलबच्च्यांचे कामच मुळी कसेही करून लक्ष वेधून घेण्याचे, माध्यमात चमकण्याचे झाले आहे. त्यामुळे त्यांना जिथे अभ्यासाची, संशोधनाची, परिश्रमाची गरज आहे, असे मार्ग सुचण्याची शक्यताच नाही. यावरून व्यवसाय सुधारण्यापेक्षा, त्यात नवतंत्रज्ञानाचा वापर करण्यापेक्षा जे मिळतेय ते दूध रस्त्यावर टाकून देण्यातच या लोकांना विशेष रस असल्याचे स्पष्ट होते. म्हणजेच आपल्या प्रसिद्धीचा कंडू शमवण्यासाठी असले उद्योग करायचे आणि दुधावरची मलई आपल्या पदरात पडली की पुन्हा माघारी फिरायचे, शेतकरी, दूध उत्पादकांसाठी चिंरतन असे कोणतेेही कार्य करायचे नाही, अशाच मानसिकतेतून हे चालू आहे.

 

खरे म्हणजे राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ब्राझील, इस्रायल या दुग्धउत्पादनात आघाडीवर असलेल्या देशांचा नक्कीच अभ्यास करावा. दूध काढल्यानंतरचे तीन सेकंद ते तीन तास या वेळेतल्या दुधावर प्रक्रिया करून वेगवेगळ्या दर्जाचा पदार्थ तयार करण्याची क्षमता आणि तंत्रज्ञान या देशांनी विकसित केले आहे. म्हणून आज या देशातल्या बहुराष्ट्रीय कंपन्याही इथल्या मातीत, इथल्या स्पर्धेत उतरल्याचे दिसते. कमी खर्चात अधिकाधिक दूध देणार्‍या गायींची पैदास या देशांनी केली. आज भारतातल्या सर्वाधिक दूध देणार्‍या गायीची क्षमता ही फक्त २७-२८ लिटर आहे, पण अन्य देशातल्या गायींची दूध देण्याची क्षमता पार ११० लिटरपर्यंत असल्याचेही समोर आले. राजू शेट्टी याकडे कधी लक्ष देणार? राज्यातल्या शेतकर्‍यांना एकतर साखर कारखानदारांच्या नाहीतर दूध संघाच्या दावणीला बांधण्याचे पाप कित्येकांनी केले. त्यातूनच कितीतरी सामान्य वकूबाचे लोक पुढारी, नेते म्हणून मिरवू लागले. पण, या लोकांनी शेतकरी आणि दूध उत्पादकांसाठी काय केले, याचा विचार करता, शून्य असेच उत्तर मिळते. राजू शेट्टींचाही तसाच विचार आहे का? असेल तर त्यांनी विचार बदलावा, आज दूध दरांवरून आंदोलन पेटविण्याचा प्रयत्न करणार्‍या राजू शेट्टींनी नवतंत्रज्ञान, नवसंशोधनाची आग इथे पेटवावी, त्यातून नक्कीच काहीतरी उदात्त, उत्तम जन्मास येईल, ज्याने शेतकरी-दूध उत्पादकांचे भले होईल.

@@AUTHORINFO_V1@@