सहा महिन्यांत २ लाख उंदरांवर नियंत्रण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2018
Total Views |



 

मुंबई : मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यांमध्ये ५ जणांचा लेप्टोमुळे मृत्यू झाला आहे. आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना हा सार्वजनिक आरोग्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. महापालिकेच्या कीटकनाशक विभागाद्वारे प्लेग, लेप्टोस्पायरोसिस यासारख्या रोगांच्या प्रसारास कारणीभूत उंदीर व घुशींवरही नियंत्रण केले जाते. जानेवारी ते जून २०१८ या ६ महिन्यांच्या कालावधीत २ लाख ११ हजार ७०५ उंदरांचे नियंत्रण करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या कीटकनाशक खात्याचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी दिली आहे.

 

उंदीर वा घुशींमुळे उद्भवणार्‍या रोगांमध्ये लेप्टोस्पायरोसिस व प्लेग या रोगांचा प्रामुख्याने समावेश आहे. ‘लेप्टोस्पायरोसिस’ हा रोग ‘लेप्टोस्पायरा’ (स्पायराकिटस) या सूक्ष्मजंतुमुळे होतो. हे सूक्ष्मजंतू उंदरासह अनेक प्रकारच्या चतुष्पाद प्राण्यांच्या मूत्राद्वारे जमिनीवर, अन्नपदार्थांवर अथवा पाण्यात मिसळले जाऊ शकतात. लेप्टोस्पायरोसिसने बाधित असलेल्या प्राण्याचे मलमूत्र माती, पाणी, अन्न, पेयजले इत्यादींच्या संपर्कात माणूस आल्यास जखमेद्वारे अथवा तोंडाद्वारे लेप्टोस्पायरोसिसचे जिवाणू मनुष्याच्या शरीरात प्रवेश करू शकतात तर ‘झिनॉपसिला चिओपिस’ या पिसवा उंदीर - घुशींच्या केसात आढळतात. या पिसवांमार्फत प्लेगची लागण होते.

 

वेगाने वाढणार्‍या उंदरांच्या व घुशींच्या संख्येस शहरीकरणातील अनेक घटकदेखील कारणीभूत असतात. शहरी परिसरातील अनेक ठिकाणी असणारा स्वच्छतेचा अभाव, उघड्यावर अन्नपदार्थ विकणारे विक्रेते व कुठेही कचरा फेकण्याची अनेकांची सवय आणि त्यातून उंदरांना सहजपणे मिळणारे अन्न यामुळे उंदरांची संख्या वाढण्यास हातभारच लागतो. अतिशय स्वच्छ ठेवलेल्या एखाद्या गृहनिर्माण सोसायटीतदेखील आजूबाजूचा परिसर अस्वच्छ असल्यामुळे तेथे उंदराचा उपद्रव आढळून येतो. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘मूषक नियंत्रण चतुःसूत्री’ (४ ऊ ) चा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा ठिकाणी विषारी गोळ्या टाकून तसेच रात्रपाळी संहारणाद्वारे उंदीर नियंत्रणाचे काम नियमितपणे करण्यात येते. त्याव्यतिरिक्त दैनंदिन तक्रारीच्या अनुषंगाने तसेच विभागात उंदरांचा प्रादुर्भाव असलेल्या मार्केटच्या सभोवतालचा परिसर, गलिच्छ वस्त्या इत्यादी ठिकाणी विषारी गोळ्या टाकणे इत्यादी प्रकारे उंदीर नियंत्रणाचे काम व उंदीरनाशक मोहीम सुरू ठेवलेली आहे. यासाठी नागरिकांनी त्यांच्या स्तरावर मूषक नियंत्रणाची चतुःसूत्री अमलात आणावी, असे आवाहनही राजन नारिंग्रेकर यांनी केले आहे.

 

महापालिका कर्मचार्‍यांमार्फत मूषक नियंत्रणाचे काम प्रामुख्याने ४ पद्धतीने केले जाते. ज्यामध्ये उंदीर पकडण्यासाठी सापळे लावणे, विषारी गोळ्या टाकणे, बिळांची विषारी गोळ्यांनी वाफारणी करणे तसेच रात्रीच्यावेळी काठीने उंदिर मारणे, या चार पद्धतींचा समावेश होतो. या पद्धतींद्वारे जानेवारी ते जून २०१८ या एक वर्षाच्या कालावधीदरम्यान एकूण २ लाख ११ हजार ७०५ उंदरांचे नियंत्रण करण्यात आले आहे, असेही कीटकनाशक खात्याचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी कळविले आहे.

 

जानेवारी ते जून २०१८ या कालावधी दरम्यान बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील ’एम पूर्व’ विभागामध्ये सर्वाधिक म्हणजे ३२ हजार ९३५ उंदरांचे नियंत्रण करण्यात आले तर त्या खालोखाल ’ई’ विभागात २३ हजार ७६२ आणि ’एन’ विभागात २३ हजार ६८५ उंदरांवर नियंत्रण करण्यात आले.

@@AUTHORINFO_V1@@