कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारने बांधला शिवरायांचा सर्वांत कमी उंचीचा पुतळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2018
Total Views |



 


विधानभवनातील ८ पुतळ्यांपैकी महाराजांचा पुतळा सर्वांत छोटा


मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारने मुंबईजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक व त्यात अश्वारूढ पुतळा बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र, या स्मारकातील महाराजांच्या प्रस्तावित पुतळ्याच्या उंचीवरून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस गेले काही दिवस भाजप सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे याच कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीची राज्यात सलग १५ वर्षे सत्ता असताना, राजधानी मुंबईतील विधानभवनात याच आघाडी सरकारने छत्रपती शिवरायांचा सर्वांत कमी उंचीचा आणि छोटा पुतळा बांधल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे, आज शिवरायांच्या पुतळ्याच्या उंचीवरून अधिवेशनात भांडणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे शिवरायप्रेम किती प्रामाणिक, असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

 

राज्याचे राजकीय-प्रशासकीय केंद्र म्हणजे राजधानी मुंबईतील विधानभवन. एका अर्थाने राज्याचा मानबिंदूच. या विधानभवन परिसरात राज्याच्या इतिहासातील विविध महापुरुषांचे असे एकूण ८ पुतळे आहेत. यामध्ये महात्मा जोतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी रामानंद तीर्थ, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील व अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील जनतेचे आराध्य दैवत म्हटल्या जाणाऱ्या आणि भारतासह जगभरात आदराचा विषय ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मात्र, विधानभवनात सर्वांत शेवटी, म्हणजे २००९ मध्ये उभारण्यात आला आहे. म्हणजे १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर तब्बल ४९ वर्षांनी. २००९ मध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यात सरकार होते व केंद्रातही कॉंग्रेसप्रणीत संपुआचीच सत्ता होती. त्यातही, विधानभवनातील या सर्व पुतळ्यांमध्ये शिवरायांचा पुतळा मात्र सर्वांत कमी उंचीचा व छोटा बांधण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या साऱ्या वादंगावर बोलताना याबाबत माहिती दिली.

 

विधानभवनातील महाराजांच्या पुतळ्याची उंची आहे केवळ ७.२ फूट तर चबुतऱ्याची उंचीही केवळ १०.६ फूट आहे. दुसरीकडे इतर सर्व पुतळे उंचीने याहून जास्त आहेत. याशिवाय, १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर राज्याच्या विधानभवनात महाराजांचा पुतळा उभारला जाण्यास तब्बल २००९ हे वर्ष उजाडावे लागले. १९९५ ते ९९ हा युती शासनाचा काळ वगळता राज्यात इतकी वर्षे कॉंग्रेसचीच सत्ता होती. या सर्व बाबी पाहता, आज विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात महाराजांच्या पुतळ्याची उंची, तलवारीची उंची, चबुतऱ्याची उंची, यांवरून वाद घालणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीने १५ वर्षे सत्तेत असताना आणि कॉंग्रेसने १९९५ पूर्वी अव्याहतपणे सत्तेत असताना महाराजांचा भव्य पुतळा का बांधला नाही, आणि राजधानीतील विधानभवनात महाराजांचा पुतळा सर्वांत कमी उंचीचा का बांधला, असे अनेक प्रश्न या साऱ्या वादंगाच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

 

विधानभवनातील पुतळे आणि त्यांची माहिती

 

पुतळे उभारल्याचे         वर्ष     उंची     चबुतरा 

महात्मा जोतीबा फुले      १९८२    १६      २१

यशवंतराव चव्हाण        १९९०    ९.५      १३

वसंतराव नाईक          १९९२     १२      १८

डॉ. बाबासाहेब आंबेडकर    १९९४     ९       १३

वसंतदादा पाटील          १९९६    ९.४      २०

स्वामी रामानंद तीर्थ       २००१     १०.९    १७.५

राजर्षी शाहू महाराज        २००३    १०      १३

छत्रपती शिवाजी महाराज    २००९     ७.२     १०.६

@@AUTHORINFO_V1@@