भाजपाचा भर मायक्रो प्लॅनिंगवर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2018
Total Views |
 
जळगाव महापालिका निवडणुकीत अनेक वर्षांनी अटीतटीचा सामना रंगणार आहे, तो भाजपा आणि शिवसेना या दोनच पक्षांमध्ये. गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या ताब्यात असलेली महापालिकेत सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपाने चंग बांधला आहे. मतदानपूर्व सर्वेक्षणात जळगावकरांचा कल १०० टक्के भाजपाच्या बाजूने असल्याचे बोलले जाते, तर गुप्तचरांचा अहवाल ५० ते ५२ पेक्षा अधिक जागा ‘कमळ’लाच मिळतील, असे सांगतो. नेत्यांपासून दुरावलेला ‘वजीर’, फुटून निघालेले कार्यकर्ते यामुळे शिवसेनाही फार काही चमत्कार दाखवण्याच्या स्थितीत नाही. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस तर गलितगात्र आहे. चहूबाजूने सकारात्मक वातावरण असले, तरी जराही गाफिल न राहता १९ प्रभागांतील सर्वच्या सर्व ७५ जागा पदरात पाडून घेण्यासाठी पक्षाच्या चाणक्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’वर भर दिला आहे. प्रत्येक उमेदवाराची प्रचाराची रणनीती ते प्रचाराचे साहित्य उपलब्ध करून देणारी केंद्रीभूत व्यवस्था, मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी ते निवडणूक खर्चाचा हिशेब अशा अत्यंत बारीकसारीक मुद्यांचा किती खोलवर विचार करण्यात आला आहे, त्याचा प्रत्यय रविवारी झालेल्या पक्षाच्या ‘विजय संकल्प’ मेळाव्यात आला.
 
 
केंद्रात आणि राज्यात भाजपा सत्तेवर आहे. या सरकारने गेल्या साडेतीन वर्षात केलेली विकासकामे अनेकांच्या भुवया उंचावणारी असून, जनतेचा कल आजही भाजपाकडे कायम आहे, किंबहुना यापुढे भाजपाच सत्तेत हवी, असे म्हणणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. महाराष्ट्रातील ८० टक्के जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि महापालिका ताब्यात असलेल्या भाजपाकडून जळगाव महापालिकेची निवडणूक लढवण्यास पावणेतीनशेवर इच्छुक होते. त्यातून ७५ भाग्यवंतांना संधी मिळाली आहे. कुणाला संधी द्यायची, याचे रितसर सर्वेक्षण करत पक्षाने पूर्वअंदाज घेतला होता. त्यानुसार पक्षाच्या जागा वाढवण्यासाठी काय-काय करावे लागेल, कुणाचा प्रवेश पक्षात करून घ्यायचा हेही ठरले होते. तो टप्पा पार पडल्यानंतर खरी कसोटी उमेदवारांच्या अर्ज छाननीत होती. सदोष एबी फॉर्ममुळे शिवसेनेच्या चार उमेदवारांना पक्षाच्या अधिकृत चिन्हाऐवजी शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी लागणार असताना भाजपाच्या मात्र, सर्वच ७५ उमेदवारांचे अर्ज निर्दोष ठरले आहेत. त्याचे श्रेय निवड समितीच्या नियोजनबद्ध कामाला द्यावे लागेल. तिकीट मिळाले, अर्ज छाननी झाली. आता प्रचाराला लागू, असे विचार कुणा उमेदवाराच्या मनात असतील तर तेही शिस्तबद्ध नियोजनाच्या चौकटीत बसवण्याचे काम पक्षाचे जळगावमधील चाणक्य अर्थात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व ना. गिरीश महाजन यांनी केले. त्यांना आ. सुरेश भोळे व आ. चंदूभाई पटेल आणि कार्यकर्त्यांची उत्तम साथ लाभत आहे. उमेदवार व पक्ष पदाधिकार्‍यांच्या ‘विजय संकल्प’ मेळाव्याच्या निमित्ताने उमेदवारांनी प्रचार कसा करावा? जनतेला कसे आपलेसे करावे? जनसंपर्कात केवळ आताचा नव्हे, तर पुढील पाच वर्षांचाही कसा विचार झाला पाहिजे? याचा कानमंत्र चंद्रकांतदादांनी दिला.
 
 
उमेदवाराविषयी जनमत तयार करणारे किंवा आपल्यासह इतर मतदारांची मते पक्षाला मिळवून देणार्‍या ‘की व्होटर’ या संकल्पनेवर काम करीत असल्याचे ऍड. शुचिता हाडा यांनी सांगताच त्यांचे कौतुक चंद्रकांतदादांनी केले. माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासारख्या अनुभवींचे मार्गदर्शन अन्य उमेदवारांनाही मिळायला हवे, असे सांगत त्यांनी प्रचारात नव्या संकल्पना राबवल्या जात असल्याची वाखाणणी केली.
 
 
दिवसभरातील जनसंपर्काशिवाय सकाळी फिरताना (मॉर्निंग वॉक) मतदारांची भेट घेण्याची सूचनाही उमेदवारांना फायदेशीर ठरणारी आहे. स्वतःहून पुढाकार घेत लोकांची कामे (विशेषतः आरोग्यविषयक) करणार्‍या उमेदवारांवरही चंद्रकांतदादांचा भर दिसून आला. त्यांचे सूत्र एकदम स्पष्ट होते की, लोकांच्या उपयोगी पडाल तर ते भरभरून तुमचे (पक्षाचे) कौतुक करतील आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा निवडणुकीत होत राहील. या चाणक्य नीतीला ‘यशाचा मंत्र’, असे म्हणणे वावगे ठरू नये.
 
 
यंदापासून चार उमेदवारांचा एक प्रभाग अशी नवीन रचना लागू झाली आहे. प्रभागांचा आकार मोठा झाला आहे. प्रत्येक उमेदवार एकट्याने फिरल्यास त्याचा पक्षाला तोटा होईल. त्यामुळे ‘मला मत द्या’ असे सांगण्यापेक्षा ‘आम्हाला मते द्या’ हे सांगणे अधिक हितकर आहे, असा हितोपदेशही त्यांनी केला. चारही उमेदवारांनी सोबत फिरावे, जनतेच्या मनात उमेदवारांच्या वैयक्तिक प्रतिमेऐवजी ‘कमळ’ चिन्ह ठसले पाहिजे, म्हणजे त्याचा लाभ भाजपाला होईल. ही नेत्यांची रणनीती उमेदवारांसाठी विजयाचा मार्ग सुकर करत आहे. शिवाय प्रत्येक प्रभागासाठी एक प्रमुख आणि त्याला मदतीला ग्रामीण भागातील दोन प्रभारी, मतदार यादीतील प्रत्येक पानासाठी एक कार्यकर्ता अशी कार्यकर्त्यांची रचना विजयाचा आत्मविश्‍वास उमेदवारांना मिळवून देत आहे.
 
 
निवडणुकीत मर्यादेपेक्षा अधिक खर्च हा पक्ष आणि उमेदवार या दोघांसाठी डोकेदुखी ठरत असतो. तो कशा प्रकारे नियंत्रित राहील? याचे काटेकोर नियोजनही पक्षाच्या पातळीवर आवर्जून करण्यात आले आहे. कोणतेही प्रचारसाहित्य पक्षाच्या केंद्रीभूत व्यवस्थेतूनच मिळेल. त्यासाठी उमेदवारांना वैयक्तिक पातळीवर खर्च करण्यास मनाई करण्यात आली आहे. उमेदवारांना खर्चाची मर्यादा ३ लाख रुपयांपर्यंत असली, तरी नेत्यांच्या सभा व त्या अनुषंगिक खर्च हे उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट होणार असल्याने उमेदवारांनी आपला खर्च २ लाखांपर्यंत आटोक्यात ठेवावा हा विचार हिशेबाच्या मर्यादेची पूर्वसूचनाही देऊन गेला. उमेदवार व कार्यकर्ते विजयासाठी कठोर परिश्रम घेत असताना नेतेमंडळीही रात्रीचा दिवस करीत आहेत. विरोधकांच्या चुका हेरत भाजपाच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर करणारे नियोजन प्रत्येक दिवशी ठरत आहे. पडद्याआड अनेक घडामोडी घडताहेत. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने पालकमंत्री चंद्रकांतदादा व ना. गिरीश महाजन यांचा एक पाय जळगावात तर दुसरा नागपुरात अशी स्थिती आहे. जळगाव महापालिकेतील संभाव्य विजयाचा ‘जळगाव पॅटर्न’ येत्या निवडणुकीत पक्षाला नवीन दिशा देणारा ठरू शकतो.
 
यशाचे नियोजन
दिवसाला २५ घरी भेट देणारे, चार हजार घरांपैकी एक हजार घरांमधील मोबाईल नंबर्सचा डाटा असणारे, निवडणूक खर्च दुसर्‍या दिवशी सकाळी ११ वाजेपूर्वी शासन दप्तरी दाखल करणारे उमेदवार किती? या चंद्रकांतदादांनी विचारलेल्या प्रश्‍नांची जंत्री उमेदवारांनी किती बारकाईने नियोजन केले पाहिजे, हे सांगून गेली.
 
@@AUTHORINFO_V1@@