येथे सन्मानाने जगतात कुष्ठरुग्ण कुष्ठरुग्ण सेवा संस्था, डोंबिवली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2018
Total Views |


 
कुष्ठरुग्ण हा समाजात नेहमीच उपेक्षित जीवन जगत असतात. मात्र त्यांनाही सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनाबाबत सर्वच स्तरांतून त्यांच्या वाट्याला उपेक्षाच येत असते. मात्र, डोंबिवली शहरानजीकच्या हनुमाननगर वसाहतीतील कुष्ठरुग्ण सेवासंस्थेने कुष्ठरुग्णांसाठी केलेले काम हे आरोग्य सेवाक्षेत्रात आदर्शवत आहे.
 

१९६५ साली डोंबिवलीच्या कचोरी भागात कुष्ठरुग्ण राहायला आले. पूर्वी ही जमीन आनंदजी रामजी प्रजापती यांच्या मालकीची होती. कुष्ठरुग्ण राहायला आल्याकारणाने प्रजापती यांनी ती जमीन त्यांना राहण्यासाठी उपलब्ध करून दिली. या ठिकाणी राहत असताना या रुग्णांना पाण्याची सोय उपलब्ध नव्हती तेव्हा तत्कालीन खासदार व भाजपचे मंत्री जगन्नाथ पाटील यांनी ती सुरू करून दिली. हनुमान नगर कुष्ठरुग्ण वसाहतीची सुरुवात १९८७ साली झाली. पूर्वीच्या काळात हे रुग्ण भिक्षा मागणे, दारू गाळणे, दारू पोहोचविणे, चोर्‍या करणे अशा प्रकारचे जीवन जगत होते. मात्र नौदलातील माजी सैनिक गजानन माने यांनी सैन्यात भरती होताना शपथेची जाण देऊन आपलं देशसेवेचे कर्तव्य पार पाडण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वतःला कुष्ठरुग्ण पुनर्वसन कार्यासाठी झोकून दिले, तेव्हा या कुष्ठरूग्णांच्या जगण्याला सकारात्मकता प्राप्‍त झाली. प्रारंभीच्या काळात माने यांना कुष्ठरुग्णांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. रुग्णांचा माने यांच्यावर विश्वास बसत नव्हता. चांगल्या धडधाकट माणसाने कुष्ठरुग्णांसाठी का काम करावे, असे त्यांना वाटे. १९९० पूर्वीच्या काळात समाजसेवक म्हणवणार्‍या व्यक्तींनी कुष्ठरुग्णांच्या संस्थेच्या नावाचा फायदा घेत पैसे उकळण्याची कामे केली होती. त्यामुळेही रुग्णांचा मानेंवर विश्‍वास बसत नव्हता. त्यात माने एकला जीव सदाशिव. त्यांच्यामागे कोणताही पक्ष, मंडळ व संस्था नसल्याने त्यांच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले गेले. सुरुवातीला या वसाहतीत एकूण १९५ कृष्ठरोगबाधित व्यक्ती आणि त्यांचा परिवार अशी एकूण ४०० लोकसंख्या होती. समाजापासून आणि शासकीय योजनांपासून कायमस्वरूपी दुरावलेल्या या लोकांनी आपल्या व्यथा मानेंसमोर मांडल्या. रुग्णांनी प्राधान्याने दवाखाना सुरू करण्याची मागणी केली. त्याकाळी त्यांना अंधेरी वर्सोवा येथे औषधोपचार घेण्यासाठी जावे लागे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त यु.पी. एस. मदान यांनी सर्व अडचणी बाजूला ठेवून त्वरित वसाहतीतच रुग्णांसाठी दवाखाना सुरू करून दिला. मोफत औषधे व डॉक्टर्स भेटीची सोय करून दिली. त्याचा फायदा असा झाला की, 195 पॉझिटिव्ह केस असणार्‍या या वसाहतीत सद्यस्थितीला हातावर मोजण्याइतके रुग्ण आहेत. या दवाखान्यामुळे या परिसरातील इतर नागरिकांच्या मनातूनही या रोगाबाबतची भीती नाहीशी झाली आहे.

 

उत्तम जीवनासाठी गरज असते, ती रोजगाराची.सुरुवातीच्या काळात या रुग्णांच्या रोजगाराचा प्रश्न अधिकच जटिल होता. १९९२ पासून आज २०१८ पर्यंत हनुमाननगर कुष्ठरुग्ण वसाहतीमधील एकूण ३० रुग्णांच्या मुलांना महापालिकेने सेवेत घेतले तर महिलांना स्वतंत्र रोजगार करता यावा म्हणून शिवणकामाचे शिक्षण दिले. यासठी त्यांना शिलाई मशीन मिळवून दिल्या आहेत. माने यांच्या सुरू असलेल्या कार्याची जपानच्या सासाकावा लेप्रसी फाऊंडेशनने दखल घेतली. त्यांनी केलेल्या अर्थसाहाय्यातून वसाहतीमध्ये दुग्धव्यवसाय सुरू करण्यात आला आणि त्याला उत्कृष्ट उपक्रमाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले. या प्रकल्पाला जोडून बायोगॅस प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. यातून कुष्ठरुग्णांना स्वावलंबनाचे धडे देण्यात आले. माने हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 30 वर्षांपासून डोंबिवली शाखेचे स्वयंसेवक आहेत. त्यांनी २०१४ साली संघाकरिता ४४ हजार राख्या येथील महिलांकडून बनवून घेतल्या व त्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. दिवाळी कंदील, नाताळ कंदील या माध्यमातून आर्थिक स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला. कुष्ठरुग्णांना त्यांना असलेल्या व्याधीमुळे कधीही सर्वसामान्यांच्या मंदिरात प्रवेश दिला जात नाही म्हणून रुग्णांच्या ईश्वर भक्तीपोटी वसाहतीच्या आवारातच राधाकृष्णाचे मंदिर बांधण्यात आले. या मंदिराच्या माध्यमातून या संस्थेच्या आर्थिक जडणघडणीला हातभार लागतो. या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणच्या रहिवाशांसाठी स्वतंत्र रेशन दुकानही उभारण्यात आले आहे. त्याचाही फायदा येथील रहिवाशांना होतो.

 

कुष्ठरुग्ण व्याधींनी त्रस्त असतात. त्यामुळे त्यांच्या जीवनात नैराश्य ओढवलेले असते. त्यामुळे ते कधीच स्वतःच्या मुलांच्या भवितव्याबद्दल तितकेसे जागरूक नसतात. त्यांच्या मते, ”मी असा हा कुष्ठरुग्ण (महारोगी) माझा मुलगा काय करणार? दारू गाळणार व ती पोहोचविणार. कशाला पाहिजे शिक्षण? पण त्यांच्या या मनातील विचार दूर करण्यात माने यांचे मोलाचे योगदान आहे. रुग्णांच्या मुलांना सर्व शैक्षणिक मदत उपलब्ध करून दिली. त्यामुळे येथील मुले पदवीधर, इंजिनीअर तसेच सैन्यात भरती झाली आहेत. सद्यस्थितीत १२५ विद्यार्थी बालवाडी ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेतात. २०१२ साली महापालिकेकडून रु. ७० लाख खर्च करून अद्ययावत शाळा बनविण्यात आली. आता या शाळांमधून ई-लर्निंग आणि ग्रुप डिस्कशनद्वारा शिक्षणपद्धती अवलंबिणार असल्याचे मत या संस्थेतील पदाधिकारी व्यक्त करतात. याचबरोबर दरवर्षी येथील विद्यार्थ्यांसाठी सहलीचे आयोजन केले जाते. तसेच दहीहंडी, गणपती, नवरात्र, होळी ईद, नाताळसारखे सण एकत्र येऊन साजरे केले जातात.

 

महापालिकेने पालिका क्षेत्रातील कुष्ठरोगाचे पूर्ण उच्चाटन व्हावे, याकरिता माने यांच्या गेल्या २० वर्षांच्या पाठपुराव्यास मान्यता देऊन रुग्णांकरिता अद्ययावत प्रतीचे आरोग्य केंद्र बांधण्यासाठी मंजुरी देऊन त्यासाठी अर्थसंकल्पात ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. देशातील अनेक अपंगांच्या, कुष्ठरोग बाधितांच्या संस्था या शासकीय अनुदान देणग्या या माध्यमातून चालविल्या जातात.परंतु ही संस्था अशी एकमेव संस्था आहे की, जी कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान, राजकीय पक्षाचे आर्थिक साहाय्य स्वीकारत नाही.

 

कल्याण-डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी कुष्ठरुग्णांच्या वसाहती आहेत, त्या सर्व वसाहती, शासकीय कार्यालय या ठिकाणी कुष्ठरुग्णाचा एक सच्चा मित्र म्हणून माने यांना ओळखले जाते. गेली अनेक वर्षे त्यांचे हे काम चालू असून हे माझे घरचे कार्य आहे, माझी जबाबदारी असल्याचे माने ठामपणे सांगतात. तळागाळातला समाजाने वाळीत टाकलेला आणि दुर्बल आणि कलंकित घटक म्हणून संबोधला जाणार्‍या कुष्ठरुग्णाला आपणच हात दिला पाहिजे, असे माने म्हणतात. कुष्ठरुग्णांना रोगमुक्त करणे, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणे, त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे, रुग्णांच्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, त्यासाठी मदत करणे, हे ध्येय समोर ठेवून माने यांचा आजवरचा प्रवास राहिलेला आहे. पालिका क्षेत्रातील नागरिकांच्या मनातील कुष्ठरुग्णांबद्दलची भीती दूर करून या संस्थेस समाजातील सर्व स्तरावरचे लोक आवर्जून भेट देतात. त्यांना त्या रुग्णांबद्दल एक जिव्हाळा निर्माण झाला आहे. त्यामुळे आमचे काम सार्थकी लागल्याचा आम्हाला अभिमान असल्याचेही माने म्हणाले. समाजाचा कुष्ठरुग्णाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे आणि हेच आमचे यश, असेही ते म्हणाले. या संस्थेला जर्मनी, फ्रान्स, जपान या देशाच्या शिष्टमंडळाने भेट देऊन येथील उपक्रमाचे कौतुक केले आहे.

 
-रोशनी खोत
@@AUTHORINFO_V1@@