स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला राज्यभर सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2018
Total Views |

लाखो लिटर दुध रस्त्यावर, वाहनांची देखील केली तोडफोड



मुंबई : दुधासाठी अनुदान मिळावे, यामागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी पुकारलेल्या आंदोलनाला आज राज्यभर सुरुवात झाली आहे. दरम्यान या आंदोलनला अत्यंत हिंसक वळण प्राप्त झाले असून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत दुधाचे अनेक टँकर अडवून त्यांची तोडफोड केली आहे. तसेच टँकरमधील लाखो लिटर दुध रस्त्यावर ओतून दिले आहे. त्यामुळे राज्यात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले असून दुध व्यापाऱ्यांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी काल मध्यरात्री पंढरपूरच्या विठ्ठलाला दुधाने अभिषेक घालून आंदोलनाला सुरुवात केली आहे. काल संध्याकाळपासूनच सांगली, जालना, सोलापूर, अमरावती, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि नागपूरमध्ये कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी शहरांकडे दुध घेऊन जाणारी वाहने अडवून स्वभिमानीच्या कार्यकर्त्यांनी वाहनांची तोडफोड केली. तसेच दुध रस्त्यावर टाकून दिले. काही ठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आल्यामुळे हे आंदोलन हिंसक दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर खासदार राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना संयम पाळण्याचे आवाहन केले असून आंदोलन शांततेच्या मार्गाने करावे, असे आवाहन केले आहे.


दरम्यान स्वाभिमानीच्या या आंदोलनावर सरकारने देखील रोकठोक भूमिका घेतली आहे. स्वाभिमानीने जरी दुध पुरवठा रोखण्याचा इशारा दिला असला तरी पण मुंबईला होणाऱ्या दुधाच्या पुरवठ्यामध्ये कसल्याही प्रकारची कमतरता पडणार नाही, असे राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी म्हटले आहे. तसेच आंदोलकांपासून संरक्षणासाठी दुध व्यावसायिकांना पोलीस संरक्षण देखील पुरवण्यात येईल, असे जानकर यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण ?

राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकारने दुध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी संघटनेकडून करण्यात आली आहे. गाईच्या दुधासाठी म्हणून सरकारने ही मदत करावी, तसेच राज्यामध्ये दररोज अतिरिक्त उरून राहणारे गाईचे दुध सरकारने २७ रुपये लिटर दराने विकत घ्यावे, असे स्वाभिमानीने म्हटले आहे. तसेच सरकारने आपली मागणी मान्य न केल्यास मुंबईसह सर्व प्रमुख शहरांना होणारा दुधाचा पुरवठा रोखण्याचा इशारा दिला होता.

@@AUTHORINFO_V1@@