महापालिका निवडणुकीत इतिहास घडणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2018
Total Views |

राजकीय निरीक्षक तोंडात बोटे घालतील; ना. गिरीश महाजन यांचा दावा

 
जळगाव, १५ जुलै :
जळगाव महापालिका निवडणुकीत यंदा इतिहास घडणार असून, राजकीय निरीक्षक तोंडात बोटे घालतील एवढ्या जागा भाजपाला मिळणार असल्याचा दावा ना. गिरीश महाजन यांनी केला. भाजपा-रिपाइं युतीचे उमेदवार आणि पक्ष पदाधिकार्‍यांचा ‘विजय संकल्प’ मेळावा रविवारी ब्राह्मण सभेत झाला. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.
 
 
ना. महाजन म्हणाले की, भाजपाला जळगावमध्ये इतिहास रचायचा आहे. कार्यकर्त्यांनी ठरविले तर सर्वच ७५ जागा भाजपाला मिळतील. नाशिकमध्ये मी पालकमंत्री आहे. तेथे महापालिका निवडणुकीत भाजपा नगरसेवकांची संख्या १३ वरून ६७ वर पोहोचली आहे. जामनेरमध्ये सर्वच २५ जागांवर भाजपाचा विजय झाला. राज्यातील ८० टक्के जिल्हा परिषदा, महापालिका आणि नगरपालिका आज भाजपाच्या ताब्यात आहेत. जळगावमध्ये भाजपाने सर्वात जास्त मुस्लीम उमेदवार दिले आहेत. जळगावकरांना गेल्या १५ वर्षात पायाभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांची मानसिकता सत्तांतराची आहे. ते भाजपाला सत्ता देण्याच्या मनस्थितीत आहेत. विकास व सुशासन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यात जळगाव महापालिका अशी एकमेव आहे की, जेथे गेल्या काही वर्षात विकासकामेच झालेली नाहीत.
 
 
महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यास एक वर्षात जळगावचा चेहरा-मोहरा बदलून दाखवू. निधीची कोणतीही अडचण येणार नाही. महापालिका कर्जमुक्त करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले आहे. जनता आश्‍चर्याने पाहातच राहील, असा विकास करून दाखवू. उमेदवारांनी मत मागताना ‘कमळ’ या चिन्हावरच मागावे, असे आवाहन ना. महाजन यांनी केले.
 
 
भाजपा काय करू शकते हे ठासून सांगा
प्रास्ताविकात आ. सुरेश भोळे म्हणाले की, शिवसेनेत ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पवार, कॉंग्रेसमध्ये गांधी कुटुंबाची ‘घराणेशाही’ आहे. भाजपात मात्र, १०० टक्के लोकशाही आहे. त्यामुळेच चहा विकणारी व्यक्तीही देशाचा पंतप्रधान होऊ शकते. पक्षाने गेल्या चार वर्षात देशासाठी काय केले? याची माहिती प्रचाराच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवा. गाळेप्रश्‍नाची सोडवणूक व महापालिकेची कर्जमुक्ती केवळ भाजपाच करू शकते हे जनतेला ठासून सांगा, असे आवाहनही त्यांनी केले.
 
 
खासदार अमर साबळे येणार
ऍड. किशोर काळकर यांनी जिल्ह्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहेत. २० जुलैनंतर समाजनिहाय कॉर्नर मीटिंग सुरू होतील. त्यासाठी खासदार अमर साबळे येणार आहेत, अशी माहिती दिली. निवडणूक खर्चाची मर्यादा ३ लाख रुपये असली तरी मतदारांनी २ लाखांपर्यंतच खर्च करावा, असे आवाहन त्यांनी केले.
 
 
महापालिकेत त्सुनामी येणार
ग्रामीण जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी जळगाव महापालिकेत त्सुनामी येणार आणि भाजपाचे ७५ उमेदवार निवडून येतील, असा दावा केला. जनतेने ठरविले आहे की, कमळ निवडून आणायचे. स्मार्ट जळगावसाठी भाजपाशिवाय पर्याय नाही हे त्यांना कळले आहे. वेगवेगळ्या सर्वेक्षणांचे अहवाल भाजपाचा विजय होणार असल्याचे सांगत आहेत, असेही ते म्हणाले.
 
 
खर्चाच्या तपशिलाबाबत तक्रार करणार
निवडणूक प्रचाराचा आढावा घेतला जात असताना उमेदवारांनी निवडणूक खर्च ऑनलाईन व ऑफलाईन स्वीकारला जात नसल्याची तक्रार केली. मनपातील पक्षाचे गटनेते सुनील माळी यांनी महापालिकेत तक्रार केल्यास ती घेतली जात नसल्याचे सांगितले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे सांगून आ. सुरेश भोळे यांनी मनपा आयुक्तांना भेटून प्रशासनाने खर्चाचा तपशील न स्वीकारल्यास त्याची जबाबदारी आमची नसल्याचे सांगावे, अशी सूचना केली. हा तपशील वेळेत सादर न केल्यामुळे कोल्हापूरमध्ये ४०० ग्रा.पं. सदस्य अपात्र ठरल्याचे त्यांनी सांगितले. ऍड. शुचिता हाडा व कैलास सोनवणे यांनी आपापल्या प्रचार मोहिमेचा आढावा सादर केला.
युती झाली नाही यातच आमचा अर्धा विजय
जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपा व शिवसेना युती झाली नाही यातच भाजपाचा अर्धा विजय झाल्याची भावना पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे यांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांचा युतीला विरोध होता. आम्ही केलेल्या सर्वेक्षणात ८० टक्के मतदारांनी युती नाकारली होती. भाजपाऐवजी इतरांना मतदान करण्याचे मत व्यक्त केले होते. युतीमुळे भाजपाचे अस्तित्त्व संपून जाईल, असे मतदार ठामपणे सांगत होते. जनभावनेची दखल पक्षाने घेतली आहे. यामुळे महापालिकेत सर्वच ७५ जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वासही आ. भोळे यांनी व्यक्त केला.
 
आ. अजित पवारांना चिमटा
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपात सामावून घेतल्याबद्दल अजितदादांनी भाजपा नेतृत्त्वावर टीका केल्याचा व्हिडिओ व्हारयल झाला आहे. त्यांचा समाचार घेताना ना. महाजन म्हणाले की, राजकारणात बेरजेचे गणित करावेच लागते. आ. अजितदादांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची उत्पत्ती कुठून झाली? कॉंग्रेसमधून फुटून निघून त्यांचा पक्ष तयार झाला आहे. आ. छगनराव भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे राष्ट्रवादीत कुठून आले? राष्ट्रवादीचे प्रमुख सगळे नेते बाहेरच आहेत तर मग भाजपाला बोल लावण्याचा अजितदादांना अधिकार आहे का? असा चिमटाही त्यांनी काढला.
 
@@AUTHORINFO_V1@@