न. पा .मालमत्ताचा बुडविलेला कर भरा, अन्यथा आंदोलन सुरूच !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2018
Total Views |
 
नंदुरबार, १६ जुलै :
आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या बगलबच्यांच्या अधिपत्याखालील सीबी लॉन, इंदिरा सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर आदी नगरपरिषदेच्या मालमत्तांचा बुडवलेला कोट्यावधी रुपयांचा मालमत्ता कर भरला जात नाही, तोपर्यंत आम्ही सनदशीर मार्गाने आंदोलन चालू ठेवू व जनतेचा मालमत्ता कर अजून कसा कमी होईल, त्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही चारूदत्त कळवणकर भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा विरोधी गटनेते, न.पा नंदुरबार यांनी प्रसिद्धीकान्वये  दिली आहे.
 
 
 महिलांना राजकारणात, समाजकारणात सक्षम करण्याचे जे सरकारी धोरण आहे, त्याला छेद देण्याचे काम नंदुरबार नगरपरिषदेच्या महिला नगराध्यक्षांचे पती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी चालवले आहे.  बहुमताचा गैरवापर करून नगरपरिषदेच्या कारभारात उघडपणे ते हस्तक्षेप करीत आहेत, याविषयीची मुख्यमंत्री व राज्यपालांकडे आम्ही रितसर तक्रार करणार आहोत, असेही त्यांनी जाहीर केले .
 
 
नगरपालिकेच्या शनिवारी झालेल्या सभेत विषय क्रमांक १ व २ नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी सर्वसंमतीने स्थगित केला असताना आणि पत्रकारांच्या समक्ष व्हिडिओ चित्रीकरण झालेले असतानाही आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी हा विषय मंजूर झाला असल्याचे पत्रकार परिषदेत वक्तव्य केले. वास्तविक मुख्याधिकारी हे शासनाचे प्रतिनिधी असून त्यांना कायद्याने  अधिकार दिले आहेत. पण बहुमताचा गैरवापर करून मुख्याधिकार्‍यांना स्थगितीऐवजी ठराव मंजूर झाल्याचे सांगण्यासाठी त्यांनी दबाव आणला, हे स्पष्ट झाले. नगरपालिकेच्या कारभारात ते हस्तक्षेप करत असल्याचा पुरावाच पुन्हा समोर आला असून महिला सक्षमीकरणाचे सरकारचे धोरण असताना व कायद्याने बंधन असताना आमदार चंद्रकांत रघुवंशी हे पत्नीचे अधिकार स्वत:कडे घेतात, हे स्पष्ट झाले आहे.
 
घरपट्टी ४५% टक्क्यांनी कमी होणार, न्यायासाठी आंदोलन सुरुच ठेवणार
वास्तविक मालमत्ता कराच्या संदर्भात दिलेली सूट ही आम्ही सातत्याने घरपट्टीबाबत घेतलेल्या भूमिकेमुळेच त्यांना द्यावी लागली आहे. जर सूट द्यावयाची होती तर इतके वर्ष का म्हणून नंदुरबारच्या नागरिकांचा अंत पाहिला? नियमानुसार चतुर्थ वर्षे कर आकारणीबाबत मार्गदर्शक तक्ता आम्ही नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना सादर केला व त्याबाबत चर्चाही झाली. मुख्याधिकारी यांनी कराचा दर २२% ऐवजी २३% चे पत्र परत सादर करण्याची सूचना केली, तसे पत्रही आम्ही सादर केले व तशी चर्चाही सभागृहात झाली. त्यानुषंगाने तक्त्याला मंजुरी मिळाली असून यामुळेच घरपट्टी ४५% टक्क्यांनी कमी होणार आहे. तथापि, सत्ताधारी तशी भूमिका घ्यायला अनुकूल नाहीत. परंतु, जनतेला न्याय दिल्याशिवाय याविषयीचे आंदोलन थांबणार नाही.
 
   लोकनेते बटेसिंग भैया रघुवंशी संकुलाच्या बाहेर दुर्लक्षित ठेवलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सन्मानाने बसवावा, हा आमचा आग्रह आहे. वास्तविक या पुतळ्यासंदर्भात आंदोलन करणार्‍या अनेक तरुणांवर कार्यवाही झाली असून त्यांचे करिअर पणाला लागले. या वेळी पुतळ्यासाठी आंदोलन करणारी शिवसेना आज मात्र सत्तेत सहभाग मिळाल्याने मूग गिळून गप्प बसली आहे.  निवडणुकीपूर्वी सत्ताधार्‍यांनीच हा पुतळा बसवण्याचा ठराव केला होता.  पुतळ्यासाठी केलेला तत्कालीन ठराव नगराध्यक्ष यांनी रद्द केला आहे. शिव पुतळ्याचे असे गलिच्छ राजकारण करणार्‍यांचा आम्ही तीव्र निषेध करतो. याबाबत शिवसेनेने भूमिका जाहीर करावी, छत्रपतींचा पुतळा याच संकुलात स्थापन करावा आणि छत्रपतींच्या जीवनावरील शिल्प रिकाम्या गाळ्यात करण्यात यावे, या मागण्या आम्ही लावून धरणार आहोत, असेही चारूदत्त कळवणकर यांनी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@