नागपूर : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी पुकारलेल्या आंदोलनामध्ये आत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने देखील उडी घेतली आहे. दूध दरवाढ हा सामान्य शेतकऱ्यांचा अधिकार असून यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे, अशी प्रतिक्रिया पक्षाचे आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. तसेच सरकारने या प्रश्नावर तत्काळ चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी देखील राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या कामकाजामध्ये शेतकऱ्यांच्या दूध दरवाढीचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. यामध्ये राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडत, सरकार दूध भुकटीचे अनुदान हे दूध संघांना देत असून त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांच्या हाती मात्र काहीही लागत नाही. त्यामुळे सरकारने याविषयी तात्काळ चर्चा करून यावर तोडगा काढावा, अशी मागणी पवार यांनी केली.
दरम्यान सभागृहाच्या कामकाजानंतर मुश्रीफ यांनी पत्रकारांसह पक्षाची बाजू मांडत, राष्ट्रवादीने या अगोदर देखील दूध दरवाढीसंबंधी सभागृहात एक लक्षवेधी मांडली होती, असे सांगितले. त्यावेळी सरकारला या प्रश्नांची जाणीव करून दूध दरवाढ लवकरात लवकर करावी, असे देखील सांगितले होते. परंतु सरकारने मात्र याकडे लक्ष न दिल्यामुळे आज शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा असल्याचे मुश्रीफ यांनी जाहीर केले.