कर्नानाटकू...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2018
Total Views |



सरकारला धोका नसल्याचे दिल्लीतील काँग्रेस वारंवार सांगत असली तरी राहुल गांधी म्हणजे इंदिरा गांधी नव्हेत, याची कुमारस्वामी यांना पुरेपूर कल्पना आहे. मुख्यमंत्री असूनही कामे होत नसल्याने आणि पाठीराख्यांच्या मागण्या कधीही न संपणार्‍या असल्याने कुमारस्वामींना अधूनमधून असे रडण्याचे नाटक कर्नाटकात करीतच राहावे लागणार, यात शंका नाही.

 

सिनेमाप्रेरित राजकारणासाठी दक्षिणेकडे प्रसिद्ध असलेले राज्य म्हणजे तामिळनाडू. एमजीआर, करुणानिधी, जयललिता असे तामिळ सिनेमातले दिग्गज या राज्याने मुख्यमंत्री म्हणून पाहिले आहेत. मात्र, आता शेजारच्या कर्नाटक राज्यालाही त्याचा वारा लागला की काय अशी स्थिती निर्माण व्हावी, अशा घटना घडत आहेत. कर्नाटकचे ताजे ताजे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आपल्या जाहीर सभेत जी काही नाटकशाळा केली, ती सार्‍या देशात चर्चेचा विषय ठरली आहे. आपल्या जाहीर कार्यक्रमात न दिसणारे अश्रू पुसत कुमारस्वामी यांनी आपल्या समर्थकांना चांगलेच भावनिक घोळात घेतल्याचे चित्र परवा कर्नाटकात पाहायला मिळाले.आपल्या भाषणात कुमारस्वामी म्हणाले की, “तुम्ही माझ्यासाठी हातात पुष्पगुच्छ घेऊन उभे आहात. तुमच्यातला एक असलेला तुमचा भाऊ मुख्यमंत्री झाला, ही तुम्हा सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे. मात्र, मी युतीचे विष पिऊन नीळकंठ झालो आहे.” कुमारस्वामी अत्यंत धूर्त आणि संधीसाधू राजकारणी म्हणून ओळखले जातात. भाजपला कमी पडत असलेला सत्तेचा आकडा लक्षात आल्याबरोबर कुमारस्वामी सेक्युलॅरिझमची बांग देऊन देशभरातल्या मोदीद्वेष्ट्यांना एकत्र करून मोकळे झाले. मग या सगळ्यांनी मिळून कुमारस्वामींच्या मुख्यमंत्रिपदाचा पाळणा कसाबसा हलविला. काँग्रेस हा कर्नाटकातला दुसरा मोठा पक्ष होता, मात्र बिनशर्त पाठिंबा देऊन काँग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे समाधान मिळविले आणि हा ‘कुमारस्वामी’ नावाचा नमुना कर्नाटकी जनतेच्या माथी मारला. आता कर्नाटकात नेमकी कोणाची सत्ता आहे, हेच समजेनासे झाले आहे. नवी दिल्लीची काँग्रेस कुमारस्वामींच्या शपथविधीला हजर राहून निघून गेली. मात्र, नंतरच्या सगळ्या घडामोडी या स्थानिकच आहेत. कुमारस्वामींच्या वाटेतला सगळ्यात मोठा अडसर आहेत सिद्धरामैय्या.

 

सिद्धरामैय्या काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. प्रशासनावरची त्यांची पकड आणि वकूब दोन्हीत ते कुमारस्वामींपेक्षा तरी उजवे आहेत. कुमारस्वामींनाही आपल्या तोंडात जांभूळ टपकावे तशी ही सत्ता मिळाली आहे, असे वाटत होते. गेल्या काही महिन्यांत सिद्धरामैय्यांनी मात्र त्यांची झोप उडविली आहे. यात कुठल्याही प्रकारच्या झटापटीत कधी काय घडेल आणि हे सरकार कधी पडेल, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यात प्रामुख्याने प्रश्‍न जातीचा आहे. कर्नाटकच्या राजकारणात जातीय गणिते अनेकांचे खेळ बिघडवितात किंवा जमवितात. कुमारस्वामींचा सत्तास्थापनेचा दावाच मुळी अनैसर्गिक. तो टिकविण्यासाठी त्यांनी एकाहून एक चमत्कारिक तडजोडी केल्या आहेत. वोक्कलिंग समाज हा देवेगौडा परिवाराच्या पाठीमागे उभा राहिलेला समाज. देवेगौडा पिता-पुत्राच्या मागे हे मतदार ठाम उभे राहिले आहेत. पर्यायाने कुमारस्वामींनी आपल्या जातीच्या लोकांना १० मंत्रिपदे दिली आहेत. या उलट संख्येने अधिक असलेल्या लिंगायतांच्या पदरी केवळ ४ मंत्रिपदे आली आहेत. बाकी सगळे विविध जातीगटांचे म्हणूनच मंत्रिपदावर विराजमान झाले. पर्यायाने ही उतरंड या सत्ताधार्‍यांना परस्परांच्या विरोधातच उभी करणारी आहे. मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यावर कुमारस्वामींनी काँग्रेसच्या आमदारांना खातेवाटपाच्या नावाखाली जसे वागविले, ते पाहाता सिद्धरामैय्या असे काही घडवून आणतील की, कुमारस्वामींचे मुख्यमंत्रिपद एकतर जावे किंवा त्यांना ते सुखाने उपभोगता येऊ नये. या सगळ्या नाटकाची सुरुवात कुमारस्वामींच्या वागण्यातूनच झाली. या देशात भाजप सोडला तर सर्वच लहानमोठे पक्ष एका व्यक्तीचे किंवा त्यांच्या परिवाराच्या मालकीचे झाले आहेत. कुमारस्वामी मुख्यमंत्री होणार, हे लक्षात आल्याबरोबर पक्षातल्या त्यांच्या खुशमस्कर्‍यांनी जी काही विधाने केली, ती आता सिद्धरामैय्या आपल्या वहीत नोंदवित होते. एकाने तर सरळ मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामैय्यांचा हा शेवटचा दिवस असून उद्यापासून कुमारस्वामीच मुख्यमंत्री असतील, असा दावा आधीच करून टाकला होता. राजकारण हा शक्यतांचा खेळ असतो. मात्र, ज्यांना राजकारणातले डाव शांतपणे खेळता येत नाहीत त्यांचा माकड केला जातो. म्हणायला तुमच्याकडे सत्तेची सगळी पदे असतात, मात्र त्यातून साध्य काहीच होत नाही. प्रत्यक्ष प्रशासकीय पकड घेऊन कामेही व्हायला लागतात. कुमारस्वामींचे सध्या तसेच झाले आहेत. काँग्रेसच्या वाट्याला सध्या आलेली मंत्रिपदे काँग्रेस आमदारांना न रुचणारी आहेत. कृष्णा बैरेगौडासारख्या वजनदार नेत्यांना आता गौण वागणूक दिली जात आहे. या सार्‍यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीचे वातावरण आहे. ही वाफ अधिक वाढू लागली की, कुमारस्वामी राहुल गांधींना पुष्पगुच्छ देण्याचे निमित्त शोधून एक फोटो काढून घेतात आणि कर्नाटकातल्या प्रसिद्धीमाध्यमांत तो प्रकाशित होईल, असे पाहतात.

 

सरकारला धोका नसल्याचे दिल्लीतील काँग्रेस वारंवार सांगत असली तरी राहुल गांधी म्हणजे इंदिरा गांधी नव्हेत, याची कुमारस्वामी यांना पुरेपूर कल्पना आहे. पण, कुमारस्वामीच नव्हे तर खुद्द देवेगौडांनाही सत्तेची स्वप्ने आवरता आलेली नाहीत. काँग्रेसला सोडण्याचे धोरण त्यांना परवडणारे नाही. मुख्यमंत्रिपदावरून पंतप्रधानपदावर पोहोचलेल्या मोजक्या नेत्यांमध्ये देवेगौडा येतात. काँग्रेसच्या खांद्यावर डोके ठेवून सत्तेची स्वप्ने पाहायला हा इतका संदर्भही पुरे आहे. कुमारस्वामींचे दुखणे निराळे आहे. मुख्यमंत्री असूनही कामे होत नाहीत आणि पाठीराख्यांच्या मागण्या कधीही संपत नाहीत. त्यामुळे कुमारस्वामींना अधूनमधून असे रडण्याचे नाटक कर्नाटकात करीतच राहावे लागणार, यात शंका नाही.

@@AUTHORINFO_V1@@