कॉंग्रेसजनहो, निश्चिंत व्हा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2018
Total Views |
 

 
 
जळगावातील सगळ्या पक्षांची कार्यालये फिरून झाल्यावर पत्रकार मंडळी कॉंग्रेसच्या कार्यालयावर येऊन धडकली. पाहता तर काय? सगळीकडे सन्नाटा! महापालिकेसारखी निवडणूक पण, ना कुठल्या नेत्यांची वर्दळ ना कार्यकर्त्यांची धामधूम. पत्रकार मंडळी आवाकच झाली. बोटावर मोजण्या इतके कार्यकर्ते. पण त्यांच्याही चेहर्‍यावर ना कसला उत्साह ना कसला हुरूप. एक कार्यकर्ता छान ऐटित पेपर वाचतोय, कुणी गप्पा मारतंय, कुणी मोबाईलवर व्यस्त. पत्रकार मंडळी हा सगळा प्रकार पाहून अचंबितच झाली. तेवढ्यात काही कार्यकर्ते लगेचच पत्रकारांना आत घेऊन गेले. त्यांच्याकडून पत्रकारांना कळलं, की सगळी जण मा. आ. अब्दुलशेठ सत्तार यांची वाट पाहुन आहेत. साहेब बर्‍याच दिवसांपासून फिरकले नाहीत म्हणे. नेतृत्व स्वीकारताना एवढा उत्साह दाखवला, पण प्रचाराला सुरुवात होत आली तरीही सत्तार साहेबांचं अजून जळगावात आगमन नाही. निदान प्रचारासाठी तरी येता की नाही म्हणुन सगळे चिंतामय, नाराजमय, संतापमय दिसत होते.
 
 
ह्या कार्यकर्त्यांना ना, जरा कसला दम धीर नाही बघा. आता, सत्तार साहेब म्हणजे काही साधीसुधी आसामी आहे होय? जळगाव मनपा निवडणुकीचे कॉंग्रेसचे नेतृत्व त्यांच्याकडे आले आहे हे खरे. पण शेवटी साहेब पडले कर्तव्यनिष्ठ लोकप्रतिनिधी. ‘पक्ष खड्ड्यात गेला तरी चालेल, पण जनतेची सेवा आधी झाली पाहिजे’ अशा उच्च विचारांचे साहेब. मग ते जनसेवा पूर्ण झाल्याखेरीज कसे येतील जळगावी? त्यातल्या त्यात नागपुरात ‘पावसाळी अधिवेशन’ चालू. आणि अधिवेशन म्हणजे सर्व आमदारांसाठी जसा आषाढी-कार्तिकी सोहळाच. मग ते तरी कसे मुकतील एवढ्या पुण्य पवित्र सोहळ्यास? मग शेटजी-भटजीच्या सरकारवर हल्लाबोल करताना मजा येते ती निराळीच. त्यात साहेब म्हणजे कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक. भावी खासदार. सद्य:स्थितीत सेनापतीच म्हणा ना. मग या मनुवादी जातीवादी विद्यमान सरकारनं जनतेवर जो अन्याय लावला आहे, त्याचा हिशेब नको का घ्यायला? अधिवेशनात सरकारला जाब कोण विचारणार? साहेबांशिवाय आहे कोणाची छाती? जनतेचा आणि राज्याच्या विकासाचा प्रश्न आला की, साहेबांजवळ तडजोड नसतेच. साहेबांच्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात विकासगंगेला कसा पूर आलाय ते पाहा, म्हणजे कळेल. फक्त सोयगाव जाताना बनोटीमार्गे जा. स्वत:स परम भाग्यवान समजाल तुम्ही. अधिवेशनातही समोर मुख्यमंत्री असोत किंवा राज्यपाल, साहेब हयगय करत नाही कोणाची. क्रोधित होऊन सरळ धावूनच जातात. अशा वागण्यामुळे साहेबांचं दोन वर्ष निलंबन झालं, तो भाग वेगळा. पण, साहेब जनतेसाठी काहीही सोसायला तयार आहेत की नाही, ते सांगा?
 
 
असा हा करारी व लोकप्रिय नेता. स्वत:च्या मतदारसंघाचा विकास सोडून जळगावला कशाला वेळ वाया घालवील बरे. पक्षासाठी जरूर वेळ काढतील, पण साहेबांचं बाकी पक्षांच्या नेत्यांसारखं नसतं. महिना महिनाभर आधीपासून ठाण मांडून बसायला साहेबांना पटत नाही. किंबहुना त्यांनी ते सोडून दिलं असावं. कारण, सोयगाव नगरपंचायत निवडणुकीच्या वेळी साहेब एक महिना आधीपासून तळ ठोकून होते म्हणे. पण निवडून आले मात्र ‘तीनच’ नगरसेवक. तेव्हापासून साहेबांनी रणनीती बदलली असावी. साहेब आता गनिमी काव्यावर जास्त भर देतात. जळगावलाही असाच काहीतरी प्रयोग करतील साहेब, बघाच तुम्ही. बाकीच्या पक्षावाल्यांना काय उड्या मारायच्या त्या मारून घेऊ देत. साहेब जेव्हा आपला फासा टाकतील, तेव्हा वाघही धूम ठोकतील आणि मोदी लाटही लुप्त होऊन जाईल. मग जळगाव कॉंग्रेसमय झाल्याशिवाय राहायचं नाही. म्हणूनच, ‘कॉंग्रेसजनहो, जरा निश्चिंत व्हा... विजय आपलाच समजा’.
- कल्पेश गजानन जोशी
Kavesh37yahoo.com 
 
@@AUTHORINFO_V1@@