अन् त्यांचं नाव ‘श्रीमंतांच्या यादी’त आलं...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2018
Total Views |




निरमाने करसनभाईंच्या नेतृत्वात बाजारात जम बसविलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांवर विजय संपादन केला आणि आपल्या अनोख्या विपणन शैलीमुळे ग्राहकांची मनं जिंकून घेतली.

 

घरोघरी टीव्हीचं जाळं पसरण्यापूर्वी चित्रपटगृहांमध्ये आणि रेडिओवर येणारी जाहिरात म्हणजे ‘सबकी पसंद निरमा’. सुमारे पाच दशकांपासून असंख्य लोकांच्या मनात ही जाहिरात घर करून बसली आहे. परंतु, निरमाचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. निरमाच्या यशामागे डॉ. करसनभाई पटेल यांचे कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटी आहे. एका छोट्या भारतीय व्यावसायिकानं डीटर्जंट क्षेत्रातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना आव्हान दिलं आणि व्यवसायाची नवी नियमावली तयार केली.

 

डॉ. करसनभाई पटेल हे प्रख्यात भारतीय उद्योगपती आणि निरमा समूहाचे संस्थापक आहेत. आज निरमा समूह सौंदर्य प्रसाधनं, साबण, डीटर्जंट, मीठ, सोडा, प्रयोगशाळा आणि इतर कामांसाठी वापरली जाणारी इंजेक्टिबल्स इत्यादींची निर्मिती करतो. डॉ. करसनभाई पटेल यांनी १९६९ साली एका लहानशा खोलीत सुरू केलेल्या निरमा डीटर्जंट पावडरच्या व्यवसायाचं एका वटवृक्षात रूपांतर झालं, ते करसनभाईंच्या अथक परिश्रम आणि चिकाटीमुळं आणि म्हणूनच आज त्यांनी भारतातील सर्वाधिक ‘श्रीमंतांच्या यादी’त नाव कमावलं आहे.

 

करसनभाई यांनी सरकारी नोकरी करता करता हा छोटेखानी व्यवसाय सुरू केला होता. कार्यालयात जाण्यापूर्वी ते घरी तयार केलेल्या डीटर्जंटची विक्री करत आणि सायंकाळी घरी परतल्यानंतर पुन्हा डीटर्जंटची निर्मिती व पॅकिंग करत. करसनभाई यांचा जन्म १३ एप्रिल १९४४ रोजी गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण मेहसाणा येथील शाळेत झालं आणि २१ व्या वर्षी त्यांनी बी.एससीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी आधी लालभाई समूहाच्या अहमदाबाद येथील ‘न्यू कॉटन मिल्स’ परिसरातील प्रयोगशाळेत आणि नंतर गुजरात सरकारच्या भूविज्ञान व खनिकर्म विभागात प्रयोगशाळा साहय्यक म्हणून नोकरीला सुरुवात केली.

 

परंतु, गुजराती समुदायामध्ये मुळातच असलेला व्यावसायिकाचा पिंड त्यांना स्वस्थ बसू देईना. डॉ. करसनभाई यांना रसायनांचं चांगलं ज्ञान होतं आणि त्या आधारे १९६९ साली घराच्या मागच्या भागात ‘निरमा’या आपल्या मुलीच्या नावानं डीटर्जंट तयार करण्यास त्यांनी सुरुवात केली. करसनभाई स्वत: सायकलवर घरोघरी जाऊन डीटर्जंट विकत असत. कार्यालयातून परतत असतानाही ते हेच काम करत. सकाळी सायकलने कार्यालयात जाताना १५ -२० पाकिटं ते विकत आणि असं करताना ते ‘मनी बॅक गॅरंटी’ देत असत. त्यांनी आपल्या डीटर्जंट पावडरची किंमत फक्त तीन रुपये ठेवली होती, जी बाजारात असलेल्या इतर डीटर्जंट पावडरच्या तुलनेत केवळ एक चतुर्थांश होती. स्वस्तात मिळणारी पावडर लोकांना खूपच आवडू लागली आणि बघता बघता ’निरमा’ हा एक ‘यशस्वीब्रॅण्ड’झाला. व्यवसायाचा विस्तार होत असल्याचे बघून करसनभाई यांनी तीन वर्षांनंतर नोकरीचा त्याग केला आणि पूर्णपणे स्वत:ला व्यवसायात झोकून दिलं. त्यांनी अहमदाबादजवळ एक छोटा कारखाना सुरू केला.

 

खूप कमी कालावधीत गुजरात आणि महाराष्ट्रात ‘निरमा ब्रॅण्ड’ यशस्वीपणे प्रस्थापित झाला. चांगली गुणवत्ता आणि कमी किंमत यामुळे निरमा डीटर्जंट पावडर प्रत्येक गृहिणीची पहिली पसंती बनली. त्यानंतर करसनभाई यांनी रेडिओ,चित्रपटगृह आणि टीव्हीच्या माध्यमांतून आपल्या ब्रॅण्डला घरोघरी पोहोचविले. ‘सबकी पसंद निरमा’ असे सांगणार्या निरमा डीटर्जंटने बाजारात एकप्रकारे क्रांती आणली आणि यासोबत एका नव्या सेगमेंटची मुहूर्तमेढही रोवली. त्यावेळी डीटर्जंट आणि साबणाच्या बाजारपेठेवर हिंदुस्थान युनिलिव्हर (जी सर्फ पावडर 13 रुपये प्रतिकिलो दराने विकत असे) यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचं वर्चस्व होतं. करसनभाई यांनी आपल्या व्यावसायिक कौशल्याच्या बळावर दशकभरातच निरमाला सर्वांत जास्त विक्री होणारी डीटर्जंट पावडर म्हणून नावलौकिक मिळवून दिला. यामुळे निरमा ब्रॅण्ड कमी किंमतीतील डीटर्जंट आणि टॉयलेट साबणासाठी जवळजवळ एक पर्यायवाची नाव झालं. निरमानं आपलं नाव मोठं करतानाच हजारो लोकांना रोजगारही दिला.

स्वस्त डीटर्जंट पावडरच्या बाजारपेठेत आपला जम बसविल्यानंतर उच्च उत्पन्न गटाला ध्यानात ठेवून नवी उत्पादने लॉन्च करण्याची गरज निरमाने ओळखली, जेणेकरून मध्यमवर्गासोबतच सधन वर्गातही आपली ओळख निर्माण करता येईल. यादृष्टीने निरमाने प्रीमियम क्षेत्रात प्रवेश केला; ज्या अंतर्गत निरमाने ‘निरमा बाथ’, ‘निरमा ब्युटी सोप’ आणि ‘सुपर निरमा डीटर्जंट’ ही प्रीमियम पावडर, ही नवीन उत्पादनं बाजारात आणली. निरमाने शॅम्पू आणि टूथपेस्ट क्षेत्रातही हातपाय पसरण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात करसनभाईंना यश आलं नाही. निरमाने ‘शुद्ध’ नावाने खाण्याचं मीठही बाजारात आणलं आणि त्याला चांगलं यश मिळालं.

 

शैक्षणिक क्षेत्रातही प्रवेश

 

डॉ. करसनभाई पटेल यांनी १९९५ मध्ये अहमदाबाद येथे ’निरमा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी‘ची स्थापना केली. शिवाय त्यांनी एक व्यवस्थापन संस्थाही सुरू केली. त्यानंतर या दोन्ही संस्थांचे विलीनीकरण करून ’निरमा युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अॅयण्ड टेक्नॉलॉजी‘ची निर्मिती करण्यात आली. ‘निरमा एज्युकेशन अॅ्ण्ड रिसर्च फाऊंडेशन’द्वारा ही संस्था संचालित केली जाते.

 

१९९० च्या दशकात निरमा हा ग्राहक क्षेत्रात एक असा ब्रॅण्ड बनला होता जो, डीटर्जंट, साबण आणि व्यक्तिगत वस्तूंच्या उत्पादन बाजारपेठेत चांगलाच नावाजलेला होता. कमी किंमतीत चांगल्या दर्जाची उत्पादनं, हेच निरमाच्या यशाचं गमक होतं. साबण आणि डीटर्जंटच्या बाजारपेठेत इतरही मोठे व प्रतिस्पर्धी ब्रॅण्ड असताना निरमाच्या यशाचं श्रेय उत्तम वितरण व्यवस्था व बाजारातील पत यालाच जातं. आज निरमाच्या नेटवर्कमध्ये शेकडो वितरक आणि लाखो किरकोळ दुकानदारांचा समावेश आहे. या विशाल नेटवर्कच्या जोरावरच निरमाला आपली उत्पादनं अगदी छोट्याछोट्या गावांपर्यंत पोहोचविणं शक्य झालं.

 

देशांतर्गत बाजारपेठेत आपले पाय घट्ट रोवल्यानंतर करसनभाई पटेल यांनी आंतरराष्ट्रीय बाजाराकडे पावलं टाकली आणि बांगलादेशात एक संयुक्त उपक्रम सुरू केला. त्यानंतर त्यांनी हळूहळू चीन, आफ्रिका आणि इतर आशियाई देशांमध्येही प्रवेश केला. २००७ साली पटेल यांनी सिर्लेस व्हॅली मिनरल्स इंक ही कच्च्या मालाची अमेरिकन कंपनी विकत घेतली आणि जगातील अव्वल ‘सोडा अॅ्श’ निर्मात्यांमध्ये त्यांचा समावेश झाला.

 

आज निरमा हा देशातील काही निवडक ब्रॅण्ड्सपैकी एक आहे. निरमाने करसनभाईंच्या नेतृत्वात बाजारात जम बसविलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांवर विजय संपादन केला आणि आपल्या अनोख्या विपणन शैलीमुळे ग्राहकांची मनं जिंकून घेतली. स्वत:च्या भरभराटीसह हजारो लोकांना रोजगार देऊन भारतीय अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देणार्या डॉ. करसनभाईंना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

 

प्रारंभीच्या टप्प्यात स्वत: घरोघरी जाऊन डीटर्जंट विकण्यास सुरुवात करणार्या करसनभाईंनी निरमाचा एवढा मोठा वटवृक्ष निर्माण केला, तो फक्त आपल्या व्यावसायिक कौशल्य, जिद्द, चिकाटी आणि काहीतरी वेगळं करण्याच्या इच्छाशक्तीच्या बळावरचं. त्यामुळं जीवनात काहीतरी वेगळं साध्य करण्याची इच्छा असलेल्यांसाठी डॉ. करसनभाई पटेल यांचा यशोशिखरापर्यंतचा प्रवास खरोखरच मार्गदर्शक आणि तेवढाच प्रेरणादायी आहे! जे लोक छोट्याशा संकटाला घाबरून पळ काढतात, त्यांच्यासाठी करसनभाई पटेल, हे आदर्श ठरू शकतात.

 
डॉ. वाय. मोहितकुमार राव
 
 
@@AUTHORINFO_V1@@