नाती लाखमोलाची, आनंद आणि सुखाची...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2018
Total Views |


 

खरा आनंद मिळताना एखाद्या अमुक गोष्टीमुळे तो जर मिळत असेल, तर ती गोष्ट खरंच खूप किंमती आहे. आतून येणारा आनंद जो असतो तो आपल्या माणसांमुळे. ज्यांच्यावर आपण प्रेम करतो, ती माणसे व आपल्यावर प्रेम करतात ती माणसे. ही मंडळी आपली नातलग असतात.
 

आयुष्यात प्रत्येकाला आनंद हवा असतो. आनंदात मनमुराद जगायची इच्छा प्रत्येकाच्या मनी वसत असते. कारण, आनंद ही भावनाच अशी आहे की, जिच्यामुळे रात्र कधी होतच नाही. सदैव सूर्यप्रकाश भासतो. पण, ती खुशी अशी सहजासहजी मनात येत नाही. त्यासाठी आपल्याला एक सुंदर मन लागते की, ज्याची आनंद घ्यायची क्षमता आहे. एखाद्या भिंतीवरच्या रंगाकडे, आकाशातल्या ढगांच्या चित्रांकडे, लहान मुलांच्या खोडकरपणात, एखाद्याच्या दयाळू कृतीकडे पाहताना मनात येणारा एक सकारात्मक अनुभवच आपल्या मनात आनंद निर्माण करु शकतो. समुद्र किनार्‍यावर उभे राहून उंचबळणार्‍या सागरी लाटांबरोबर आपले मनही उचंबळायला लागते तेव्हा आनंद काय असतो, हेही समजायला लागते. समुद्राकडे पाहताना आपण शुन्यात पाहतोय, अशा पद्धतीने पाहिले तर त्या लाटा आपल्या मनात उठणे शक्यच नाही. पण, काही गोष्टी आपल्या आयुष्यात कॅनव्हासवर रंगवाव्या तशाच रंगलेल्या असतात. त्यांच्या त्या अमुक ठिकाणच्या अमुक रंगांनीच ते चित्र जसे असावे तसे राहते. ते रंग बदलले किंवा त्याची चित्रातली ती जागा बदलली, तर ते चित्र तसे दिसणार नाही. जीवनातसुद्धा असेच काही रंग आहेत. आपल्या माणसांचे, आपल्या स्वप्नांचे, आपल्या कर्तृत्वाचे, आपल्या इच्छांचे... या रंगात आपल्याला मिसळता आले, त्यांचे रंग आपल्या जीवनात भरता आले तरच आपल्याला आनंद मिळतो.

 

आपले शेजारीपाजारी असतात. आपली मित्रमंडळी असतात. सगळे कसे जीवाभावाचे असतात. आईच्या मायेत आनंद असतो. बाबांच्या कर्तृत्वात आनंद दिसतो. भावाच्या खोडसाळपणात, तर बहिणीच्या लटक्या रागात आनंद असतो. पण, ‘हाय रे’ म्हणायची पाळी येते. कारण, आपण इतके दुर्दैवी असतो की, आपल्याला या सर्व प्रियजनांचे महत्त्व कधी कळत नाही. त्यांना टाळून आपण भरकटत फिरत असतो. त्याच्या रोजच्या अस्तित्वामुळे आपण खरेच कळत- नकळत विसरून जातो की, आपल्या आनंदाचा खरा स्रोत तर इथेच आहे. खरे तर, या लोकांचे आपल्या जगण्यासाठी आवश्यक असलेले मूल्य आपण समजून घेतले, तर आपल्या आयुष्यात खरीखुरी निर्भेळ व निरामय आनंदाची शिदोरी आपल्याबरोबर सदैव राहील. आपल्या दुःखात आपल्याला साथ देईल. म्हणूनच या नात्यांना आपण आपला थोडा वेळ दिला, थोड्या गुजगोष्टी केल्या, तर कधी आधार तर कधी आनंद-दुःख या सार्‍यांना समजून घेण्यासाठी आपल्याला कायमसाठी भागीदार मिळतील. पण, आजच्या जगण्याच्या ऐहिक रहाटगाड्यात आपल्याला वेळ कुठे असतो, आनंदाची देवघेव करायला? खरेतर प्रियजनांबरोबर वेचलेले हे क्षण अनमोल असतात. कुठल्या एकाकी क्षणी किंवा दुर्दैवाच्या वेळी ते आपली कवचकुंडलांसारखे रक्षण करतील हे सांगता येत नाही. आपण सगळ्यांनीच अनुभवलेले आहे की, एखाद्या बिकट क्षणी आपल्याला सहज पहिली आठवण येते, ती आईने आपल्या डोक्यावर मायेने हात फिरविलेल्या स्पर्शाची. तितक्याच प्रकर्षाने अतीव दुःखाच्या क्षणी आईला सर्वप्रथम दिसतो तो आपल्या लेकराचा चेहरा. मग, कितीही कष्ट पडोत की घालमेलीचे क्षण येवोत प्रेमाचा दिवा मात्र प्रकाशात राहतो. कुठूनतरी आनंदाची आशा जागवत राहतो.

 

अशावेळी या नात्यांना दुर्लक्षित करण्यासारखी लाजिरवाणी आणि दुर्दैवी गोष्ट तरी आपण का करतो? का गृहित धरतो आपण आपल्या नात्यांना? का विदीर्ण करतो आपण नात्याची ही वीण?खरेतर कधी नाती केवळ रक्ताची नसतात, तर कधी मैत्रीची व नुसत्या परिचयांनी झालेले बंध खूप चिवट व लवचिक असतात. याही नात्यांवर लक्ष केंद्रित केले की कळते, आतून कुठूनतरी एक तृप्ती जाणवते. खुशीची झलक दिसते. म्हणूनच नात्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. आत्मकेंद्रीत न होता आपल्या या नात्यांना जोपासून आपण सर्वांनी आपले आयुष्य सुखद बनवूया व आनंदी होऊया.

-डॉ. शुभांगी पारकर

@@AUTHORINFO_V1@@