उचलली जीभ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2018   
Total Views |



 

नोटाबंदीसारखा विषय तातडीने घेऊन त्यावर कारवाई केली गेली. तीही अगदी काटेकारेपणे. नोटाबंदीमध्ये थोडाफार त्रास सहन करून जनताही सरकारच्याच पाठीशी उभी राहिली.

‘महाराष्ट्राज मोस्ट वॉन्टेड म्हण’, असा किताब बहाल करायला हरकत नाही. कारण आज कुणीही उठते आणि तोंडाला येईल ते बरळते. उचलली जीभ लावली टाळ्याला, या अंगभूत सवयीलाही अजिबात पर्याय नाही. त्यामुळे महाराष्ट्रात तरी आज या म्हणीची कार्यवाही तडाखेबंदपणे होताना दिसते. तसे जीभ उचलून टाळ्याला लावल्यावर बोलण्याचे विषयही ठरलेले. सध्याचे मेगाहिटचे विषय आहेत, खड्डे, नोटाबंदी आणि हो, राम मंदिरही. गंमत म्हणजे हे विषय जुन्या लोणच्यासारखे मुरवून मुरवून पुरवून पुरवून वापरताही येतात. विषय कोणताही असो, या विषयाचे तोंडी लावणे आग लावण्यासारखे वापरले जातातच. आता हेच पाहा, “नोटाबंदी क्षणात होते, मग राम मंदिर का नाही?” उद्धव ठाकरे यांनी सवाल केला. नोटाबंदी या भौतिकतावादी विषयाचा आणि राम मंदिर या श्रद्धाशील भावनिक विषयांचा स्तर एकच आहे का? नाहीच. पण आले उद्धवजींच्या मना...

 

यावर उद्धव यांचे म्हणणे आहे की, नोटाबंदीसारखे राम मंदिरही लगेच बांधा. असो, ‘कसम राम की खाते है,’ म्हणत अनेकांचे श्रद्धाशील स्वप्न आहेच की, रामलल्‍लांचे मंदिर प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मस्थळी निर्माण व्हावे, तेही कोणताही विवाद न होता. कोणताही प्रश्‍न मग तो रामजन्मभूमीचा का असेना तो आततायी निर्णय घेऊन तोंडावर आपटण्यापेक्षा धोरणात्मक आणि समजूतदारपणे, समन्वयाने सोडवणे गरजेचे आहे असेही प्रत्येक समजूतदार आणि खर्‍या भारतीयांचे मत आहे. कारण नोटाबंदी तरी यशस्वी झाली पण प्लास्टिकबंदीही महाराष्ट्राने पाहिली आहे. आम्ही अभ्यास करून प्लास्टिकबंदी केली आहे, नोटाबंदीसारखी अभ्यास न करता केली नाही, असे शिवसेनेचे नेते छातीठोकपणे सांगत होते त्यानंतर त्याच नेत्यांनी थातूरमातूर कारणे सांगून प्लास्टिकबंदी मागे घेतली. तो तसा प्लास्टिकबंदीसारखा फज्जा राम मंदिर बांधण्याबाबत होऊ नये, असे कुणालाही वाटते. बाकी काय उचलली जीभ, लावली टाळ्याला आहेच.

 

बंदची गणगौळण

माशा फक्‍त कनातीतच रंगतो असे नाही तर कुठेही रंगतो. विषय काय फक्‍त गणगौळण, राधाकृष्ण, पेंद्या आणि मथुरेचा बाजारच असतो का? आता मथुरा राहिली दूर.. आता दुधदुभत्याचा बाजार मुंबई आहे बरं का? गायीच्या दूध खरेदी दरात सरकारने प्रतीलीटर पाच रुपये अनुदान द्यावे नाही तर मग सोमवारपासून दुधाचे संकलन, दूध वाहतूक बंद आंदोलन पुकारू, अशी गणगौळण स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केली आहे. त्यात मुंबईचे दुध तोडू, असेही राजू शेट्टी म्हणाले आहेत. दिवसभर मर मर कष्ट करून रात्रभर झोपूही न शकणार्‍या भुकेल्यांनाही जगण्याचं बळ देणारी मुंबई. या मुंबईला दुधपूरवठा होऊच देणार नाही, असे शेट्टींचे म्हणणे म्हणजे अतिच वाटते. मुंबई काय शत्रूराष्ट्र आहे? तरी बरे, चंद्रकांतदादा पाटलांनी शेट्टींना सुनावलेही होते की, “मुंबईचा दुधपुरवठा तोडायची धमकी द्यायला मुंबई काही पाकिस्तान नाही.” पुढे शेट्टी म्हणाले की, ते दूध आम्ही वारकर्‍यांना फुकटात वाटू. तसे केले तर चांगलेच. कारण मुंबईकरांनापण वाटेल की आमचे दूध तोडले पण ते वारकर्‍यांना तरी लाभले. नाहीतर अन्नाला परब्रह्म मानण्याच्या संस्कृतीला डावलून अमृततुल्य अन्नधान्य, दुधाची नासाडी करत ते रस्त्यावर सांडवणे, फेकणे ही विकृती महाराष्ट्र काही वर्षांपासून पाहत आहेच. अन्नाची, दुधदुभत्याची अशी कृतघ्नपणे नासाडी करणार्‍यांबद्दल सामान्य लोक काय विचार करतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे.

 

असो, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या संभावित आंदोलनाचा फटका मुंबई आणि तत्सम शहरांना बसू नये याची तजवीज दूध संघांनी केली आहे. त्यांनी दोन दिवस आधीच मुंबईला होणारी दुधाची वाहतूक वाढवली आहे. त्यामुळे मुंबईला काही दिवस तरी दुधाचा तुटवडा पडणार नाही. पण समजा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मनसुबा फळास आला तर त्याचा फायदा काय होणार आहे? कुणाचे नुकसान होणार आहे? या कालावधीत बंद आंदोलनात सहभागी झालेल्या छोट्या मोठ्या प्रमाणात दुधपुरवठा करणार्‍यांचे काय चांगभले होणार आहे? यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे उत्तर नाही. आंदोलन बंद हे प्रस्थापित प्रशासनाला कोंडीत पकडण्याचे मार्ग असू शकतात, पण या मार्गाला किती ताणावे याला काही अंत आहे की नाही? नाही तर बंद आंदोलनाची गणगौळण कनात लावण्यापूर्वीच संपते.

 
@@AUTHORINFO_V1@@