भाजपाचे ‘व्हिजन’ सुंदर, स्वच्छ, आरोग्यपूर्ण, उद्यमशील जळगाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2018
Total Views |

महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ‘तरुण भारत’शी बातचीत

 
 
जळगाव, १५ जुलै :
जळगाव महापालिकेत गेल्या ५ वर्षात खान्देश विकास आघाडीने कुठलेही भरीव काम न केल्याने शहराची वाताहत झाली असून विकासाचा बोजवारा उडाला आहे.शहरवासीयांना चांगले रस्ते, स्वच्छता आणि आरोग्य सेवा पुरविण्यात सत्ताधारी खाविआ अपयशी ठरले आहे. हे शहर सुंदर, स्वच्छ, आरोग्यपूर्ण, उद्यमशील आणि समृद्ध बनविणे हेच भाजपाचे ‘व्हिजन’ असून त्यासाठी या निवडणुकीत सत्तेची सूत्रे भाजपाच्या हाती द्या, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शहरवासीयांना रविवारी ‘तरुण भारत’च्या माध्यमातून केले.
 
 
रविवारी जळगाव दौर्‍यावर आलेल्या चंद्रकांतदादांशी संपर्क साधून या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युती न होण्याचे कारण काय, असे विचारता ते म्हणाले, जागांचे ऍडजस्टमेंट जमले नाही. महापालिकेत खाविआ सत्तेवर होती मात्र त्यांनी सतत लोकविरोधी निर्णय घेतले. आ. सुरेश (राजू मामा) भोळे आणि आ. चंदूभाई पटेल यांनी लोकांच्या दारात आणि चौकाचौकात एलईडी दिले. त्यामुळे बिल कमी येते, मात्र महापालिकेने जनतेला ही सुविधा नाकारली. सतत विरोध केला. हा लोकविरोधी निर्णय होता. अशा जनविरोधी लोकांसमवेत आम्ही कशी काय युती करू शकतो ? सरकारने दिलेले २५ कोटी रु. खर्ची पडले नाही, असा काहींचा आरोप आहे. मात्र याबाबत त्यांनी आमदारांशी जुळवून घेऊन सर्वंकष विकास करून घ्यायला हवा होता. पण तसे झाले नाही. उलट भाजपावर दोषारोप केला जातो. मात्र भाजपचा आरोप आहे की, हुडको आणि गाळ्यांचा प्रश्न खाविआच्या काळातच निर्माण झाला. तथापि, त्यावर तोडगा काढण्यात खाविआचे नेते अपयशी ठरले. महापालिकेत आम्हाला पूर्ण सत्ता दिल्यास हा प्रश्न आम्ही सोडवू, असा ठाम आशावादही त्यांनी व्यक्त केला.
 
 
भाजपचे व्हिजन
भाजपचे शहर विकासाचे व्हिजन काय आहे? असे विचारता ते म्हणाले, जळगाव शहरात चांगले रस्ते करायचे आहेत, स्वच्छता आणि पाण्याचा प्रश्न निकाली काढायचा आहे, सरकारने दिलेल्या योजनांची अंमलबजावणी करायची आहे, इंडस्ट्रीला आश्वस्त करायचे आहे, इंडस्ट्री आणि उद्योग वाढवायचे आहेत, येथे ‘वर्क कल्चर’ आणायचे आहे. त्यामुळे अनेक हातांना काम मिळून बेरोजगारी दूर होईल, लोंबणार्‍या वीजतारांना अंडरग्राऊंड करायचे आहे, सरकारने दिलेल्या अंडरग्राऊंड गटारींची योजना पूर्णत्वास न्यायची आहे. भाजपा सरकारने पाण्याची अमृत योजना आणली आहे. मलनिस्सारण योजना मार्गी लागते आहे, समांतर रस्त्यांचा डीपीआर काढला असून कामकाज सुरु होतेय. भाजप २०० कोटी रुपये आणून विकासाचा अनुशेष भरून काढेल. त्यासाठी महापालिकेत चांगल्या प्रशासनाची गरज असून ते आम्ही देऊ. त्याकरिता ना. गिरीश महाजन, आ.एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न सुरु आहेत. मात्र त्याला जळगावकर जनतेनेही साथ द्यावी आणि महापालिकेत भाजपाला सत्तास्थानी बसवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
 
 
प्रश्‍न नेतृत्वाचा...
भाजपला सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाबद्दल पूर्ण आदर आहे. पण आगामी काळात ते शिवसेनेच्या चिन्हावर जर निवडणूक लढणार असतील तर याचा अर्थ असा होतो की, नेतृत्वाची सूत्रे आता सुरेशदादा किंवा रमेशदादा यांच्या हातात राहणार नसून ती उद्धव ठाकरे यांच्या हातात राहील. याचाच दुसरा अर्थ असा की, दादा नेतेच राहणार नाही. त्यामुळे भाजपने युती नाकारली. कारण पक्ष प्रमुखांनी व्हीप काढला तर सुरेशदादांना त्यापुढे जाता येणार नाही. निवडणुकीनंतर युतीची शक्यता आहे का, या प्रश्नावर निवडणुकीचा निकाल लागल्यावर काय तो निर्णय होईल, असेही ते म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@