समाजमाध्यमं जबाबदार की संवेदनाहीन समाज?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2018
Total Views |



समाजमाध्यमांवर समाजाचं नियंत्रण आता राहिलेलं नाही किंवा ते खूप कमी झालं आहे, असं म्हणावं लागेल. खरं तर वेगवेगळ्या ठिकाणी ज्या काही घटना घडत आहेत, त्यासाठी समाज कारणीभूत आहे, समाजमाध्यमं नाही हे समजून घेणं कुठे तरी आवश्यक आहे.
 
गेल्या आठवड्यात सोशल मीडियासंबंधीच्या तीन महत्त्वपूर्ण बातम्यांनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. पहिली बातमी म्हणजे ट्विटरने खूप मोठी कारवाई करून ६० कोटींपेक्षा अधिक बनावट अकाऊंट बंद केले. दुसरी, म्हणजे, फेसबुकला इंग्लंडच्या माहिती नियंत्रकाने दंड ठोठावला आणि तिसरी बातमी, व्हॉट्सअ‍ॅपच्या अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार आता हळूहळू का होईना पावलं उचलत आहे. आता मुळातच या सगळ्या बातम्या वेगवेगळ्या पद्धतीने आपापलं स्थान राखून आहेत. मात्र, त्यांचा एकूण गोषवारा लक्षात घेता
 

माजमाध्यमांची उपलब्धता आणि आवश्यकता ही इतर माध्यमांपेक्षा अधिक असून त्यामुळेच या माध्यमांची ताकदही खूप जास्त आहे आणि ही ताकदच त्यांची सध्या दुर्बलता ठरलेली दिसते किंवा समाजाची दुर्बलता ठरत आहे, हे मोठं दुर्दैव आहे. समाजमाध्यमांनी समाजहिताचं काम करावं असं अपेक्षित आहे किंवा ते त्याच्या नावाला सार्थक असं आहे. सामाजिक जाणिवेची जाण ठेऊन, सकारात्मकता जोपासून हे कार्य व्हायला हवं. मात्र, प्रत्यक्षात असं होताना दिसत नाही. दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित यांना खूप मोठा आधार समाजमाध्यमांमुळे मिळाला होता की, जेणेकरून माध्यमांवरचं विशिष्ट वर्गाचं वर्चस्व हे संपुष्टात आलं होतं आणि अशी माध्यमे ही सशक्त लोकशाहीसाठी खूप महत्त्वाचं काम करू शकतात. परंतु, या लोकशाहीची इमारतच आता या समाजमाध्यमांमुळे ढासळत चालली आहे, असं आपण म्हणू शकतो आणि माणसाच्या मूलभूत हक्कांवर गदा निर्माण होते आहे, असं चित्र या समाजमाध्यमांच्या सद्यस्थितीमुळे निर्माण झाले आहे. थोडक्यात, या तिन्ही घटनांचा आढावा आपण घेऊया.

 

ट्विटरचे क्‍लीनअप

ट्विटरवर किती फोलोअर्स आहेत, यावरून ट्विटरवर अकाऊंट असणार्‍या व्यक्तीचं महत्त्व कळतं. ट्विटरने ‘वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकाला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी दोनदा ही कारवाई गेल्यावर्षी ऑक्टोबर व यावर्षी मे आणि जूनमध्ये केली. ऑक्टोबरपेक्षा मे आणि जूनमधील कारवाई दुप्पट होती. कारण, लाखोंच्या संख्येमध्ये बनावट अकाऊंट बंद करण्यात आले. काही दिवसांआधी ट्विटरने हे स्वीकारलं होतं की, त्यांच्या डेटा स्टोरेजमध्ये ‘बग आहे आणि त्यामुळे लोकांनी पासवर्ड बदलून घेणं कधीही चांगलं. डेटा लीक होईल, या भीतीने ट्विटरने असे घोषित केलं. खरं तरं असे करताना माध्यमांची बदनामी होऊ शकते किंवा त्यांची ब्रॅण्ड व्ह्यॅल्यू कमी होऊ शकते. तरी देखील ट्विटरने अधिकृतपणे याची घोषणा केली व तशी माफीदेखील मागितली.

 

जगभरात ट्विटरचे जवळ जवळ ३५ कोटी वापरकर्ते आहेत आणि इतक्या लोकांनी तातडीने पासवर्ड बदलणं कठीण आहे आणि काही लोकांपर्यंत ही माहिती पोहोचलेली नाही, तरी आता त्यासंदर्भात थोडीफार जागरुकता निर्माण झाली आहे. मात्र, ट्विटरकडून सुद्धा राजकारणी लोकांचा वापर हा केला जातो, हे आता अगदी उघड गुपित. कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी अलेक्झांडर निक्स यांनी ही बाब कबुल केली आणि अर्थातच त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं. त्यामुळे ट्विटरवरील सर्वच माहिती खूप महत्त्वाची आहे आणि म्हणूनच ट्विटर असे बनावट अकाऊंट बंद करण्यासाठी कडक पावलं उचलत आहे.

 

फेसबुकला दंड

दुसरी घटना, फेसबुकला ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाने ठोठावलेल्या दंडाची. मुळात केम्ब्रिज एनालिटीका प्रकरणामुळे फेसबुकच्या ‘डेटा चोरी’चं प्रकरण चांगलचं गाजलं. फेसबुकचा वापर २०१२ साली ज्यावेळी केम्ब्रिज एनालिटीकाने केला होता, त्यावेळी त्याविरोधात कबुली दिल्यानंतर केम्ब्रिज एनालिटीकाला दिवाळखोर कंपनी म्हणून घोषित करण्यात आले. फेसबुकवरती ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाने पाच लाख पौंडांचा दंड ठोठावला आहे. आता खरं म्हणजे पाच लाख पौंड दंड हा फेसबुकच्या कमाईच्या दृष्टिकोनातून तसा कमीच आहे, म्हणजे फेसबुक काही मिनिटांत इतकी कमाई करू शकते. मात्र, ब्रिटनच्या सध्याच्या प्रचलित कायद्यांतर्गत हा दंड ठोठावण्यात आला. त्यामुळे दंडामध्ये रकमेपेक्षा कारवाई हा जास्त महत्त्वाचा भाग आहे आणि या कारवाईमुळे फेसबुकच्या नावलौकिकाला धक्का पोहोचला, हा या पुढील महत्त्वाचा मुद्दा. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनाही यासंबंधित विचारणा करण्यात आली आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतही ड्रोनाल्ड ट्रम्प यांना फेसबुकवरच्या डेटाद्वारे साहाय्य करण्यात आल्याची गोष्ट देखील समोर आली. भारतातदेखील असे अनेक आरोप करण्यात आले. मात्र, इंग्लंडमध्ये ठोठावण्यात आलेला दंड प्रतीकात्मक स्वरूपात समजणं आवश्यक आहे.

 

व्हॉट्सअ‍ॅपवरील अफवांचे अनियंत्रित पीक

धुळ्यातील राईनपाडा प्रकरणात व्हॉट्सअ‍ॅपवरील अफवेमुळे जमावाने पाचजणांचा बळी घेतला होता. एकतर व्हॉट्सअ‍ॅपवर जी काही माहिती येते त्याची पूर्णतः पडताळणी न करता, त्याचा कोणताही पाठपुरवठा न करता ती माहिती तशीच पुढे पाठविली जाते, हा यातला खूप मोठा घातक मुद्दा. यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर कुठेतरी लोकांनी स्वतः नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे हे लक्षात येतं. व्हॉट्सअ‍ॅप हे लोकांच्या दररोज एकमेकांच्या संपर्कात राहण्याचं एक मोठं माध्यम असल्याने लोकांकडून त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो, हे आपण जाणतोच. मात्र, यामुळेच जेव्हा गैरवापर होतो तेव्हा अशा माध्यमांवर कुठेतरी नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे, हे लक्षात येतं. राईनपाडाच्या घटनेत व्हॉट्सअ‍ॅपवर जो संदेश पाठविण्यात आला, तो संदेश कोणीतरी खोडसाळपणे, अर्धवट माहितीनुसार जोडून पुढे पाठविला आणि त्याच्या परिणामी पाचजणांना आपला जीव गमवावा लागला. जीव गमावणं याशिवाय कोणतीही मोठी गोष्ट असू शकत नाही आणि त्यामुळे कुठेतरी व्हॉट्सअ‍ॅपने स्वतःच्या माहितीवर नियंत्रण ठेवावं, असं सरकारकडून सुद्धा सूचित करण्यात आलं. त्यानुसार व्हॉट्सअ‍ॅपने तातडीने काही पावलं उचलली, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. आता ज्यावेळी या सगळ्या घटनांचा मतितार्थ बघतो, त्यावेळी आपल्याला समाजमाध्यमांची जबाबदारी कळते. मात्र, समाजमाध्यमांचा विचार करताना खरचं ती समाजमाध्यमं जबाबदार आहेत की समाज जबाबदार आहे, हा प्रश्न पडतो. समाज माध्यमं चालविणारे कोण? तर समाजमाध्यमं ही तुम्हा-आम्हा सर्वसामान्य माणसांकडून चालविली जातात किंवा त्यांच्या आधारे लोकांपर्यंत पोहोचवली जातात. ज्या कोणत्या प्रकाराने, अर्थाने ही माध्यमे चालविली जातात, त्यावेळी लोकांनी आपली जबाबदारी ओळखणं आवश्यक आहे आणि लोकांना त्यांच्या जबाबदारीचे भान करून देण्याचं काम समाजाचं आहे.

 
मात्र, सध्याच्या काळामध्ये अशा कोणत्याच प्रकारचं जबाबदारीचं भान हे या सोशल मीडियाला आणि समाजाला राहिलं नाही असं आपण म्हणतो. गेल्या एका दशकापासून सोशल मीडिया हे एक प्रमुख अंग म्हणून काम करत आहे आणि ज्यामध्ये नवीन पिढीमधले राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळे व्यापार करणारे, मार्केटिंग करणारे हे सोशल मीडियाचा प्रवास करतात हे आपण जाणतो. मात्र, सोशल मीडियावरती व्यक्तीची ओळख ही खरी असते का? इथून सुरुवात होते. यावरती असं कोणत्याच प्रकारचं सरकारचं नियंत्रण नाही, ज्यामुळे व्यक्तीची ओळख पटू शकते. त्याचप्रमाणे या माध्यमातून अशा प्रकारचा शब्द प्रयोग, वाक्यप्रयोग किंवा माहितीचा प्रयोग केला जातो की, ज्याच्यामुळे विशिष्ट वर्ग, धर्म, व्यक्ती, पक्ष यांची बदनामी होऊ शकते. किंबहुना, त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि त्याच्यापुढे जाऊन कदाचित समाजामध्ये एक वेगळी वातावरणनिर्मिती होऊन आणि कोणाचा जीवदेखील धोक्यात येऊ शकतो, हा इतका महत्त्वाचा भाग आहे. वेगवेगळ्या माध्यमांनी वेळोवेळी आपल्या जबाबदारीच्या बाहेर जाऊन कार्य केलेलं आहे हे आपण जाणतो. मात्र, त्यात ज्या वेळेला सद्यकाळात सोशल मीडियाचं आपण चित्र बघतो, त्या सोशल मीडियाची जबाबदारी घेण्यास कोणी पुढे येत नाही, हे एक खूप मोठं दुर्दैव! या सोशल मीडियाने खूप मोठी विविधता अशी लोकांना प्रदान केली आणि सिटिजन जर्नालिझम अर्थात नागरी पत्रकारिता हे त्याच एक उत्तम उदाहरण.
 

अमेरिकेसारख्या देशात सुद्धा नागरिक भांडवली माध्यमांवर चिडलेले, संतापले प्रेक्षक आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या मोठमोठ्या माध्यमांच्या विरोधात आवाज उठवायला आता तिथेही सुरुवात झाली आहे. समाजाला विचारशून्यतेकडे माध्यमं नेत आहेत, असे आपण जे म्हणतो ते आता सोशल मीडियाच्या बाबतीतही लागू होतचं की... अगदी लोकांचा स्वार्थ पूर्ण करणे किंवा व्यक्तिगत हल्ले करणे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून बिनबोभाटपणे केलं जातं. खरं तर सोशल मीडियाचं मुख्य कार्य हे ’सोशल अर्थात एक समाजशील वातावरण निर्माण करण्याचं... लोकांना एकमेकांशी जगाच्या कानाकोपर्‍यात जोडण्याचं... पण, सध्या सोशल मीडियाचा समाजविधायक उपयोग कमी आणि समाजविघातक उपयोग जास्त होताना दिसतो. या माध्यमांना नियंत्रित करण्यासासाठी दोन गोष्टी असतात. एक म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था किंवा दुसरे म्हणजे स्वनियंत्रण.

 

वस्तुस्थिती पाहता अशा समाजमाध्यमांचा वापर कोट्यवधी लोकांकडून केला जातो आणि त्यामुळे त्यावर सरकारी नियंत्रण ठेवणं शक्य नाही. व्हॉट्सअ‍ॅपच्या ग्रुपमध्ये पोलीस पण असावा, अशी बातमी मध्यंतरी चर्चेत आली होती. गेल्या आठवड्यात त्याविषयी चर्चा झाली. मात्र, प्रत्यक्ष इतक्या मोठ्या प्रमाणावर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत की, त्याप्रमाणात आपल्याकडे पोलीसबळच नाही आहे. त्यामुळे ते प्रत्यक्षात येऊ शकत नाही. माहिती कोणाकडून प्रसारित केली जाते, याचा पूर्ण छडा लावणं हेसुद्धा तपास यंत्रणेला अवघड जातं. त्यामुळे यावर कोणत्याच प्रकारचं सरकारी नियंत्रण आजच्या तारखेला तरी शक्य वाटत नाही किंवा तशा प्रकारचं सरकारी नियंत्रण आल्यास ती एक प्रकारची आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण होईल किंवा लोकांच्या व्यक्तिगत आणि खाजगी जीवनावर तो हल्ला असेल असेसुद्धा चित्र रंगवले जाईल. राहिली गोष्ट स्वनियंत्रणाची तर समाज माध्यमांवरती स्वनियंत्रण लावण्यासाठी ती माध्यम कोणाला तरी जबाबदार असावी लागतात. सोशल मीडियाची जबाबदारी मुळातच कोणी घेत नाही, हा इतका खूप महत्त्वाचा चर्चेचा मुद्दा आहे. या समाजमाध्यमांचे मालक हे फक्त लोकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देतात आणि ते स्वतःची जबाबदारी झटकटतात. लोक मग अशाच माध्यमांतून अफवा, चुकीची माहिती पसरवणं, लोकांवर व्यक्तिगत हल्ले करणं, स्वतःच्या मार्केटिंगसाठी बनावट अकाऊंटची निर्मिती करणं, असले गैरप्रकार करतात. त्यामुळे स्वनियंत्रण प्रचंड अवघड आहे. त्यामुळे पर्यायाने या माध्यमांचा वापर करणार्‍या प्रत्येक घटकाने स्वतःवरती नियंत्रण ठेवणं, माहितीचा काटेकोरपणे आणि डोळे उघडे ठेवून वापर करणं, चुकीची माहिती प्रसारित न करणं हे आवश्यक आहे; नाहीतर तो दिवस दूर नाही, जेव्हा या माध्यमांमुळे खूप मोठ्या प्रमाणावर एकतर समाजात अराजक माजेल किंवा यावर सरकारी नियंत्रण लादायची वेळ येईल. त्यामुळे समाजमाध्यमांचा वापर आपण जबाबदारीने आणि सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून करणं हाच यावरचा उपाय.

-प्रा. गजेंद्र देवडा

@@AUTHORINFO_V1@@