दुष्काळामुळे साधली गाव आणि गावकीची एकी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2018
Total Views |



ही कहाणी आहे, महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्याच्या ‘किराकसळ’ गावाची. किराकसळ हे गाव सातारा जिल्ह्यातील ‘मात’या दुष्काळी परिसरातील आहे. या दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी किराकसळ गावचे गावकरी दररोज श्रमदान करत असल्याचे दृष्य या परिसरात दिसते.

 

किराकसळ गावच्या गावकर्‍यांचा रोजचा दिनक्रम म्हणजे गावचे सुमारे ४०० रहिवासी दररोज भल्या सकाळी श्रमदान करतात. या उपक्रमासाठी पुढाकार व प्रोत्साहन देणारे गावचे २८ वर्षीय युवा सरपंच अमोल काटकर. यांच्या मतानुसार, त्यांच्या गावामध्ये आणि पंचक्रोशीत पाऊस तसाच मापक पडतो व त्या पावसाचे पाणी पण नदी वहाळांद्वारे वाहून जाते. या वाहत्या पावसाळी पाण्यामुळे जमिनीची धूप होऊन त्यामुळे गावकर्‍यांचे दरवर्षी दुहेरी स्वरुपात नुकसान होत असे.

 

यावर एक कायमस्वरुपी तोडगा म्हणून, गावच्या सहभागातून किराकसळच्या रहिवाशांनी पावसाळी पाणी साठवून, त्या पाण्याचा बहुविध स्वरुपात पुनर्वापर करण्याचा निर्धार केला. त्यासाठी अर्थातच, पुढाकार होता गावचे सरपंच अमोल काटकार यांचा. या सामाजिक कामाचे आणि उपक्रमाचे महत्त्व गावकर्‍यांना समजावून देण्यासाठी किराकसळच्या सरपंचानी पावसाळी पाण्याची साठवणूक करण्याची आवश्यकता व त्याद्वारे गावातील पाणी समस्या व जमिनीची धूप कमी करणे आणि त्याद्वारे शेतीची सुपीकता वाढवणे यासारखे होणारे फायदे प्रयत्नपूर्वक समजावून सांगितले. याचा अपेक्षित फायदा पण दिसून आला. याकामी गावचे ज्येष्ठ नागरिक व वरिष्ठ शेतकर्‍यांचे पण सहकार्य घेण्यात आले. गावकीची तयारी तर झाली, मात्र त्याचवेळी सार्‍या गावाला आणि गावकर्‍यांना उपयुक्‍त ठरणार्‍या या सामाजिक उपक्रमासाठी समाजाचे सामूहिक प्रयत्न घ्यावेत व शक्यतो सरकारी चाकोरीपासून दूर राहण्याचा सामूहिक निर्णय घेऊन सार्‍या गावकर्‍यांनी प्रयत्न सुरु केले व या प्रयत्नांना मूर्त स्वरुप देण्यासाठी किरासकळच्या ग्रामस्थांनी मार्ग चोखाळला, तो ‘श्रमदान’ या अनोख्या सामाजिक प्रयत्नांचा.

 

त्यानुसार जानेवारी २०१६ च्या किरासकळच्या ग्रामसभेत श्रमदानाद्वारे गावात पावसाळी पाण्याचे जलसंवर्धन व पुनर्वापराचा ठराव सवार्ंनुमते पारीत करण्यात आला. त्यानुसार, मार्च २०१६ मध्ये सरपंच अमोल काटकर यांनी दोन महिला सदस्य व किरासळगावच्या चार ग्रामपंचायत सदस्यांना जलसंवर्धन नियोजन व वापर या विषयातील विशेष प्रशिक्षणासाठी पाठविले.. या प्रशिक्षणा दरम्यान, या मंडळींना पाणी फाऊंडेशन, वॉटरशेट ऑर्गनायझेशन ट्रस्ट, स्पर्ध सेंटर व पार्टीसिपेटरी लर्गिंग या संस्था आणि त्यांच्या तज्ज्ञांकरवी सखोल प्रशिक्षण मार्गदर्शन प्राप्त झाले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाचे काम रितसर व प्रयत्नपूर्वक सुरु झाले. प्रयत्नांना सुरूवातीपासूनच पद्धतशीर स्वरुप देण्यासाठी अमोल काटकर व त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केले. गावकीच्या आवाहनाला घटटी सर्वांनी म्हणजेच गावातील सुमारे ४०० जणांनी तयारी दर्शविली होती. या सार्‍यांची विभागणी १० ते १५ जणांचा एक अशा २५ कृतीगटात करण्यात आली. त्यानुसार, त्यांना काम दिले जाऊ लागले. याचा फायदा असा झाला की, गावकर्‍यांच्या संमिश्र स्वरुपातील गट विभागणीमुळे प्रत्येक घरी कुणाला श्रमदानाची संधी मिळतानाच प्रत्येक घरी घरची शेतीची कामे पण होऊ लागली व त्याचा फायदा सार्‍यानाच झाला

 

गेल्या वर्षभरातील या उपक्रमाला त्यांच्या पहिल्याच वर्षी उत्साहवर्धक प्रतिसाद लाभला आहे. किरासकळगावच्या ग्रामस्थांनी या दरम्यान पावसाळी पाण्याच्या नियोजन संवर्धनासाठी जे काम श्रमदानाद्वारे केले, त्याचे मूल्य शासकीय अंदाजानुसार सुमारे ३० लाख रुपये असून त्यामुळे वार्षिक अंदाजे ९० लाख रुपयांचे पाणी बारमाही वाचणार आहे. मात्र, किरासकळचे सरपंच अमोल काटकर यांच्या मते, पाण्याच्या या दुष्काळी प्रश्‍नावर श्रमदानाच्या सामूहिक प्रयत्नांमुळे होणार्‍या आर्थिक फायद्यांपेक्षा याप्रकरणी झालेला सर्वात मोठा लाभ म्हणजे श्रमदानामुळे गावकीत एकी साधली गेली.

 

दत्तात्रेय आंबुलकर

@@AUTHORINFO_V1@@