भाग 1 - पृथ्वीबद्दल जाणून घेताना..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2018
Total Views |




या लेखमालिकेत आपण पृथ्वी व पृथ्वीवरील अनेक नैसर्गिक घडामोडी(Natural phenomena) तसेच विविध शोध आणि कामाच्या पद्धती (various discoveries and methods of work) यांसंबंधी माहिती घेणार आहोत. आज आपण या विश्वातील आपल्या पृथ्वीचा शोध घेऊ व त्याबद्दल माहिती घेऊ.

 

विश्व हे अफाट, अनंत व अमर्याद आहे. विश्वात असंख्य दीर्घिका, तारे, ग्रह, धूमकेतू, अश्‍नी इ. आहेत. आपली ‘आकाशगंगा’ म्हणजेच ‘द मिल्की वे’ (the milky way ) ही दीर्घिका या पसार्‍यात एखाद्या बिंदूसारखी आहे. सुमारे २५ ,००० ते ४० ,००० कोटी तारे असणारी ही दीर्घिका तबकडीच्या आकाराची आहे. तिचा व्यास सुमारे १ लाख प्रकाशवर्ष असून, केंद्रभागाची रुंदी सुमारे १००० प्रकाशवर्ष आहे. या दीर्घिकेच्या केंद्रापासून सुमारे २६ ,००० प्रकाशवर्ष अंतरावर असलेला आपल्या सूर्यमालेचा केंद्रबिंदू सूर्य आहे. यामध्ये अजून लहानशा ठिपक्यासारखी व या सूर्याच्या अनेक पिल्लांमध्ये अगदी लहानशी अशी आपली पृथ्वी आहे. पृथ्वी सूर्यापासून सुमारे १४ कोटी किलोमीटर अंतरावर आहे. या अंतराला ‘एक खगोलशास्त्रीय एकक (one stronomical unit )’असे म्हटले जाते. पृथ्वीला चंद्र नावाचा उपग्रहही आहे.

 

पृथ्वीचा जन्म सुमारे ४५० कोटी वर्षांपूर्वी झाला आहे. तिचा व्यास सुमारे १२ ,७४० कि.मी. आहे. पृथ्वीचा आकार हा चेंडूसारखा संपूर्ण गोल नसून मध्ये फुगीर व दोन्ही ध्रुवांवर किंचीत चपटा आहे. या आकाराला Spheroid असे म्हणतात. पृथ्वी ही सूर्याकडे २३ .५ कललेली आहे. त्यामुळे उत्तर व दक्षिण या दोन्ही ध्रुवांवर सहा-सहा महिन्यांनी आलटून पालटून उन्हाळा व हिवाळा असतो. पृथ्वी सुमारे २४ तासांत स्वत:भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. याला ‘परिवलन’ म्हणतात, तर सुमारे ३६५ दिवसांत सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते यास ‘परिभ्रमण’ म्हणतात. पृथ्वीचा सूर्याभोवतीचा परिभ्रमणाचा मार्ग हासुद्धा संपूर्ण वर्तुळाकार नाही. तो अंडाकृती (Elliptica) आकाराचा आहे. म्हणजेच काही वेळ जेव्हा पृथ्वी ही सूर्याच्या जास्त जवळ असते, तर काही वेळ ती सूर्यापासून जास्त लांब असते.

 

पृथ्वीचा जवळजवळ ७१ टक्के पृष्ठभाग हा पाण्याने व्यापलेला असून उरलेला भाग जमिनीने व्यापलेला आहे. हा भाग ७ खंडांत विभागलेला आहे. पृथ्वीची अनेक वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. पृथ्वीवर माऊंट एव्हरेस्ट हा घडीचा पर्वत, माऊंट एटना हा ज्वालामुखी पर्वत असे अनेक प्रकारचे पर्वत आहेत. नायगरा (Niagara Falls) सारखे धबधबे आहेत. नाईल, गंगा यासारख्या प्रचंड मोठ्या नद्या आहेत. भूजल सरोवर, अश्‍नीपातामुळे निर्माण झालेले सरोवरे अशी विविध प्रकारची सरोवरे आहेत. अनेक दर्‍या, गुहा, झरे आहेत. तसेच पृथ्वीच्या पोटात विविध खनिजे मिळतात, ज्यांचा आपण सर्वसामान्य जीवनात वापर करतो. त्यांचबरोबर काही अत्यंत मौल्यवान खनिजेही मिळतात. ज्यांचा वापर काही खास उद्योगांमध्येच केला जातो. कित्येक प्रकारचे खडक आहेत, त्यांचा बांधकामात व इतर अनेक गोष्टींमध्ये उपयोग होतो. पृथ्वीवर ५ प्रमुख महासागर आहेत. त्यात प्रशांत महासागर हा सर्वांत मोठा, तर आर्क्टिक महासागर हा सर्वात लहान आहे. तसेच कधीकधी भूकंप, त्सुनामी, भूस्खलन,ज्वालामुखी उद्रेक अशा जीवित व वित्तहानी करणार्‍या घटनाही घडत असतात. या सर्व नैसर्गिक वैशिष्ट्यांना ‘पृथ्वीची प्राकृतिक वैशिष्ट्ये’ (Physical Features of the earth) असे म्हटले जाते.

 

या पृथ्वीच्या प्राकृतिक वैशिष्ट्यांचा अभ्यास म्हणजेच भूगर्भशास्त्र (Geology ). जिओलॉजी हा शब्द ग्रीक भाषेतील असून, त्याचा शब्दश: अर्थ ‘जमिनीचा अभ्यास’असा आहे (Ge=Earth,Logia=study). अभ्यासाच्या प्रकारानुसार, भूगर्भशास्त्र अनेक विद्याशाखांमध्ये विभागता येते. खनिजांचा अभ्यास केल्यास खनिजशास्त्र (Mineralogy), भूकंपांचा अभ्यास केल्यास भूकंपशास्त्र (Seismology), ज्वालामुखींचा अभ्यास केल्यास ज्वालामुखीशास्त्र (Volcanology)), खडकांचा अभ्यास केल्यास खडकशास्त्र (Petrology), जीवाश्मांचा अभ्यास केल्यास जीवाश्मशास्त्र (Palaeontology), भूरसायनशास्त्र (Geochemistry), भूभौतिकशास्त्र (Geophysics) ही काही उदाहरणे. यांशिवाय भूगर्भशास्त्रांतर्गत अभियांत्रिकीच्या अनेक शाखाही विकसित झाल्या व होत आहेत. उदाहरणार्थ, खनन अभियांत्रिकी (Mining Engineering ), खनिजतेल अभियांत्रिकी (Petroleum Engineering), भूतंत्र अभियांत्रिकी (Geotechnical Engineering ), भूशास्त्रीय अभियांत्रिकी (Geological Engineering) इ. मधील प्रत्येक शाखेचा सखोल अभ्यास केल्यास, अजून अनेक उपशाखा विकसित होतात. उदाहरणार्थ, जीवाश्मशास्त्रामध्ये जीवाश्मजीवशास्त्र (Palaeobotany) व जीवाश्मभूशास्त्र (Palaeogeology)अशा उपशाखा विकसित होतात.

 

अभ्यासाच्या प्रकारानुसार कामाचे स्वरूपही बदलते. उदाहरणार्थ, खडकशास्त्राचा अभ्यास करताना साईट (Site) वरून एखादा खडक आणणे आणि प्रयोगशाळेत सूक्ष्मदर्शकाखाली त्याच्या वैशिष्ट्यांचे निरीक्षण करणे व निष्कर्ष काढून योग्य ते मार्गदर्शन करणे वगैरे कामे अंतर्भूत असतात, तर ज्वालामुखीशास्त्राचा अभ्यास करताना वेळप्रसंगी त्या धगधगत्या ज्वालामुखीजवळ उभे राहून, धोक्याच्या छायेतदेखील काम करावे लागू शकते. शिवाय, या सगळ्या शाखा कोणत्या ना कोणत्यातरी प्रकारे एकमेकांशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे अभ्यास करताना तो सर्वसमावेशक करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

 

तर या लेखातून आपण भूगर्भशास्त्राबद्दल अगदी ढोबळ अशी माहिती बघितली. पुढील लेखांमध्ये आपण प्रत्येक शाखेबद्दल अधिक माहिती घेऊ.

-निनाद भागवत

@@AUTHORINFO_V1@@