साहित्यिक ‘एनेम’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jul-2018
Total Views |



नाशिक शहरातील सांस्कृतिक व राजकीय पटलावर आपला ठसा उमटवणारे ‘वाकडी वाट’कार कवी एन. एम. आव्हाड यांची ग्रंथसंपदा ‘निवृत्तीनामा’ हा ललित लेखसंग्रह तसेच ‘जनमानसातील मानस’, ‘दूरचे डोंगर’, ‘विज्ञान तरंग’, ‘चेतना चिंतमणीचा’ एवढी ग्रंथसंपदा आहे. अशा एन. एम. आव्हाड यांची १० जुलै २०१८ रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालय येथे प्राणज्योत मालवली.

 

‘एनेम’ हे त्यांचे लोकमानसातील आवडीने ठेवलेले व त्यांनाही आवडलेले अल्पाक्षरी नाव... निवृत्ती महादू आव्हाड हे त्यांचे पूर्ण नाव. ते मुळचे सिन्नर तालुक्यातील ठाणगावचे. त्यांचा जन्म ८ एप्रिल १९४० रोजी झाला. शिक्षणानिमित्त गावाबाहेर पडल्यावर सिव्हिल इंजिनिअर होऊन नाशिक शहरातच ते वास्तव्यास होते. हिच आपली कर्मभूमी मानून नाशिक परिसरात आपला व्यवसाय करत असताना समाजातील सुखदु:खांच्या जाणीवा साहित्यांतून त्यांनी मांडल्या. लेख, कवितेच्या रुपाने शब्दबद्ध केल्या. ठाणगावातील दोंडाची यमुनाबाई हिच्याशी विवाह करून नाशिकला ते स्थायिक झाले.

 

साहित्य लिहिणारा कवी, लेखक याचे प्रथम व्यक्त होण्याचे व्यासपीठ म्हणजे त्याच्यो घरातील व्यक्ती. त्याप्रमाणे ‘एनेम’ हे आपली धर्मपत्नी मनोरमा यांना साहित्य ऐकवत. त्यांचे मित्र रमेश केंगे, लोकेश शेवडे, सटाणककर हा त्यांच्या कवितांचा पहिला चाहता वर्ग होता. तो त्यांना साहित्य लिखाणास प्रोत्साहन देत गेला. ‘एनेम’ यांचे व्यक्तिमत्व रुबाबदार होते. त्यांच्या लौकिकाला भर टाकणारे होते. क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्षपद, नाशिक जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती ही त्यांची ठळक ओळख जनसामान्यांत होती. साहित्य क्षेत्रातील कवी-लेखक त्यांना त्यांच्या पुस्तकांमुळे ‘सारस्वतीय’ म्हणून ओळखत. त्यांच्या काव्याबाबत फ. मु. शिंदे लिहितात, ‘एन. एम. आव्हाड हे मला समजदार कवी वाटतात. त्यांच्या कविता या उपजत मोकळेपणाने बोलत राहणं या वृत्तीच्या आहेत. मोडापासून खोडापर्यंत त्यांची दृष्टी काव्यातून धावताना दिसली.

 

सन २००५ साली ७८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये कविवर्य केशव मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली केटी.एच. एम. कॉलेजच्या आवारात संपन्न झाले. साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिकेत विको टर्मरिकचे मालक व साहित्यिक पेंढरकर यांची मुलाखत होती. कार्यक्रमपत्रिकेत ‘एनेम’ यांना सन्मानित करण्याचा उल्लेख नव्हता. परंतु, ऐनवेळी त्यांना पेंढरकरांची मुलाखत घेण्यास सांगण्यात आले. त्यांनी ती साहित्याच्या दरबारात ऐनवेळी मिळालेला सन्मान समजून मुलाखतीत चांगले रंग भरल्याचे मी पाहिले आहे. ते प्रेमळ आणि उमद्या स्वभावाने सर्वांची मने जिंकून घेणारे होते.

 

लग्न सोहळ्याच्या निमित्ताने एकदा त्यांची व माझी चर्चा झाली. तेव्हा समाजात मंगलाष्टक चालू असताना मध्येच राजकीय व्यक्ती, प्रतिष्ठीत व्यक्ती मंगलाष्टक थांबवून बोलतात, हे गैर असून अशी प्रथा अनिष्ट आहे. ती एक वैश्विक प्रार्थना असून तिच्यात व्यत्यय आणून भाषणे थांबवली पाहिजे. यावर ‘एनेम’ यांनी “लोकांचे प्रेम आपण समजू शकतो, पण कार्यक्रमात व्यत्यय आणायला नको,” असे मत व्यक्त केले. सिन्नर तालुक्यात साहित्यिक चळवळीला पुढे नेण्यासाठी सिन्नर भूषण सुमंतभाई गुजराती, भास्कर गवळी प्रयत्न करत होते. त्यांच्याशी माझी गावी आल्यावर यावर चर्चा होत असे. तेव्हा त्यांनी ‘‘तुम्ही महाराष्ट्रभर कवितेचे कार्यक्रम करता, तर तुमच्या दातली गावात कार्यक्रम व्हावा,” ही इच्छा व्यक्ती केली. त्यावर साहित्य मंडळ रसास्वाद सिन्नरचे साहित्यिक अरूण घोडेराव, भावसार जाधव या मंडळींबरोबर चर्चा करुन तसेच कवी प्रा. डॉ. शंकर बोराडे, कृष्णाजी भगत यांच्याशी चर्चा करून सन २००५ साली नाशिक जिल्हा पहिले ग्रामीण साहित्य संमेलन दातली येथे संपन्न झाले. त्याचे स्वागताध्यक्ष कविवर्य ‘एनेम’ उर्फ आव्हाड साहेब हे होते.

 

कवी शंकर बोराडे, एनेम यांचे वर्गशिक्षक राम क्षीरसागर, पत्रकार हेमंत कुलकर्णी यांनी वृत्तपत्रांतून जनसामान्यांपर्यंत ‘एनेम’ यांची साहित्यसंपदा पोहोचविली. ‘एनेम’ यांच्या कवितांबाबत त्यावेळचे ‘मराठी साहित्य संस्कृती मंडळा’चे अध्यक्ष विद्याधर गोखले यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिकला आल्यावर ‘एनेम’ यांच्या घरी हेमंत कुलकर्णी यांचे समवेत ‘वाकडी वाट’ या कवितासंग्रहातील कवितेचे वाचन केले. ‘एनेम’ साहित्य प्रांतात डामाडौलाने वावरले नाहीत. परंतु, कवितेचा ध्यानसाधना व प्रांजळपणा त्यांनी शेवटपर्यंत जपला. वयाच्या ७८ व्या वर्षी, त्यांचे १० जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या काव्याच्या रुपाने, ग्रंथसंपदेच्या रुपाने ते साहित्यकृतीतून आपल्या सोबत आहे. हेच ते देणं साहित्यिकाचं...

 

‘एनेम’ यांच्या शब्दात सांगायचे तर, ते बेफिकीर कवितेतून व्यक्त होतात.

भूमिका माझी मी करतो

येथे कोणाचे काय जाईल?

संपेल माझा प्रवेश तेव्हा

थांबून येथे काम राहील

गीता माझी माऊली बोलली

जाऊ दे जायचे ते जाईल

सर्व तू सोडशील तेव्हा

नाव तर इथंच राहील...

 
- रमेश आव्हाड 
@@AUTHORINFO_V1@@