पाकिस्तान आवडे कोणाला?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018
Total Views |


 
शशी थरूर यांना जी भीती वाटते, त्यापेक्षा भयंकर स्थिती त्यांच्या तिरूअनंतपुरमच्या चर्चमध्ये व तिथल्या ख्रिस्ती महिलांमध्ये आहे. मात्र, अत्यंत धूर्तपणे शशी थरूर त्यावर काही बोलणे टाळत आहेत, कारण तिथे मूळ मुद्दाच ख्रिस्ती मतपेटीचा आहे.
 

काँग्रेसचे वादग्रस्त नेते शशी थरूर यांनी त्यांच्या नेहमीच्याच वादग्रस्त शैलीनुसार एक विधान केले. “2019 मध्ये नरेंद्र मोदींचे सरकार पुन्हा निवडून आले तर या देशाचा हिंदू पाकिस्तान होईल,” अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली. त्यामागचा त्यांचा तर्क तो नेहमीचाच आहे. संघ व भाजपची हिंदूराष्ट्राची संकल्पना म्हणजेच पाकिस्तानची आरशातील प्रतिमा असा जड बोजड शब्द त्यांनी संघ-भाजपच्या हिंदुत्वाबद्दल वापरला आहे. एक बुद्धिमान आणि उत्तम संधीसाधू माणूस म्हणून शशी थरूरना लोक ओळखतात. युपीएच्या काळात परदेश सेवेत असलेले थरूर आपल्या लेखांमुळे लब्ध प्रतिष्ठितांच्या दुनियेत प्रसिद्ध होते. ल्युटंट दिल्लीतल्या तथाकथित पत्रकार व विचारवंतांच्या अजेंडावर या देशातील धोरणे कधी काळी चालायची. या सगळ्या कंपूचे थरूर ‘हिरो’ होते. 2009 साली त्यांनी सरळ आपल्या सेवेचा राजीनामा दिला आणि केरळमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. मुळात राहुल गांधी यांनीच काँग्रेसचे काय करायचे ते ठरविले असल्याने थरूर वगैरेंना काही वेगळे करावे लागले नाही. ज्या केरळमधील तिरूअनंतपुरममधून ते आता निवडून आले आहेत, त्या केरळमधील काँग्रेसचा गड कोसळला आणि आपल्या पक्षाची धुरा वाहण्यापेक्षा थरूर दिल्लीतच रमू लागले. आता मोदीविरोधी बौद्धिक विश्‍वात चमकोगिरी करण्याचे काम ते इमानेइतबारे करीत असतात.

 

शशी थरूर, मणिशंकर अय्यर यांच्यासारख्या लोकांनी पाकिस्तानची भीती दाखवून लोकांना मोदींपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, यापेक्षा हास्यास्पद काहीच नाही. जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा याच मंडळींनी पाकिस्तानी पाहुणचार झोडण्याची एकही संधी सोडलेली नाही. भारत-पाक संबंध सुधारण्याच्या नावाखाली ज्या अनेकांची दुकाने सजली, त्यात कधी काळी शशी थरूरही होते. कर्नाटक निवडणुकीच्या वेळी पाकिस्तानी अधिकार्‍यांबरोबर जेव्हा मणिशंकर अय्यर बसले होते, तेव्हा शशी थरूर यांना ही भीती वाटली नाही हे नवलच म्हणायला हवे. ज्या अनेक प्रकरणांमुळे शशी थरूर चर्चेत राहिले त्यामध्ये मेहेर तरार हेदेखील तितकेच महत्त्वाचे. आपल्या रंगेल स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या शशी थरूर यांची दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर आणि पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार यांच्यात झालेल्या ट्विटरवरच्या चकमकी एकेकाळी भरपूर गाजल्या होत्या. या दोन्ही महिलांनी शशी थरूर यांच्यावर कुणाचा हक्क अधिक याची एकमेकांत स्पर्धा सुरू केली होती. हेच थरूर महाशय सौदी अरेबियात संवादक म्हणून काम करीत होते. त्यावेळी भारत व पाकिस्तान यांच्या पाकिस्तानशी असलेल्या उत्तम संबंधांमुळे सौदीने संवादक म्हणून भूमिका घ्यावी, अशी उफराटी भूमिका घेतली होती. ज्या पक्षातल्या स्थानिक कार्यकर्त्यांना फाट्यावर मारून थरूर खासदार झाले, त्या पक्षाचे धोरणदेखील पाकिस्तानबरोबरच्या संवादात मध्यस्थ न आणण्याचेच होते. मात्र, थरूरना पाकिस्तानशी संवाद साधण्याची इतकी घाई होती की, त्यांनी हा घोळ घालून ठेवला होता. त्यामुळे शशी थरूर यांच्या पाकिस्तान भीतीला फार गंभीर घेण्याची फारशी गरज नाही. मग प्रश्‍न उरतो तो हा की, ही मंडळी असा वेडेपणा का करतात?

 

काँग्रेसच्या दुसर्‍या फळीतले राजकारण त्यासाठी नीट समजून घेतले पाहिजे. चमचे, खुशमस्करे यांच्यामुळे काँग्रेसचे पतन इंदिरा गांधींपासूनच सुरू झाले होते. राहुल गांधींपर्यंत येता येता शशी थरूर सारख्यांनीही आपले हात यात धुवून घेतले. पक्ष वाढविण्यापेक्षा मोदींचा द्वेष उत्तमरित्या करणे, संघाला शिव्या देणे, गांधीहत्येच्या आरोपांचा कोळसा सतत उगाळत राहाणे यासारख्या गोष्टी करीत राहाव्या लागतात. ज्यामुळे सोनियामाई आणि त्यांच्या अवतीभवतीच्या सल्लागारांचा कंपू खुश राहातो. त्यामुळे मणिशंकर अय्यर काय? शशी थरूर काय? ही मंडळी सतत असेच बरळत राहतात. यातून सिद्ध काहीच होत नसले तरीही त्यांचे मालक मात्र खुश होतात. यांनीच त्यांना पक्ष चालविणे म्हणजे काय ते शिकविले आहे. त्यामुळे हे जे काही चालते, त्यालाच पक्ष चालविणे म्हणतात, असा हा प्रकार आहे. संघाला शिव्या देण्याचा हा प्रकार नवीन नाही. त्याला मुस्लीम किंवा ख्रिस्त्यांच्या लांगूलचालनाची फोडणी दिली की, एक पक्का सेक्युलर फार्स तयार होतो.

 

शशी थरूर यांना जी भीती वाटते, त्यापेक्षा भयंकर स्थिती त्यांच्या तिरूअनंतपुरमच्या चर्चमध्ये व तिथल्या ख्रिस्ती महिलांमध्ये आहे. मात्र, अत्यंत धूर्तपणे शशी थरूर त्यावर काही बोलणे टाळत आहेत, कारण तिथे मूळ मुद्दाच ख्रिस्ती मतपेटीचा आहे. एक महिला आपल्याकडून काही चुकीचे घडले आहे, असे समजून चर्चच्या कन्फेशन बॉक्समध्ये जाते आणि आपल्या तथाकथित चुकीची कबुली देते. ख्रिस्ती परंपरेनुसार तिला धीर देऊन पापक्षालनाचा मार्ग सांगण्यापेक्षा धर्मगुरूच पापाची नवी दालने उघडतो. इतकेच नाही तर आपल्या अन्य सहकारी धर्मगुरूंनाही या कुकर्मात सहभागी करून घेतो. त्या महिलेची तक्रार सुनावण्यासाठी चर्च स्वत:च कमिटी निर्माण करते. प्रकरण तापायला लागल्यानंतरच यात पोलीस सहभागी होतात. महिलेवर अत्याचार, तिच्या मूलभूत अधिकारांचे हनन यापैकी काहीही घडते, हे शशी थरूरसारख्या जगभरातल्या घडामोडींची माहिती ठेवणार्‍या आणि त्यावर पोपटपंची करणार्‍या माणसाला तिथला खासदार असूनही काहीच माहिती नसते, हे अविश्‍वसनीय आहे. मात्र, ख्रिस्ती मतांचा दट्ट्या इतका मजबूत आहे की, न चालताच तो दाब निर्माण करीत राहातो.

@@AUTHORINFO_V1@@