कंसाच्या तोंडी भगवद्गीता कशी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018   
Total Views |


 

 

आपली ‘फेफे’ उडाली आहे, आणि ती राज्यभरात पोहोचली आहे, हे लक्षात येताच आव्हाडांनी अखेर नेहमीप्रमाणे आपल्या भात्यातील ब्रम्हास्त्र बाहेर काढलं. हे अस्त्र म्हणजे अर्थातच जात! त्या पत्रकाराच्या आडनावावर विशेष जोर देत, ‘हा कसा बहुजनांवर अन्याय’ वगैरे नेहमीची बांग आळवली. परंतु, थेंबाने गेलेली हौदाने येत नाहीच (अजितदादांना हे चांगलंच ठाऊक आहे!). त्यामुळे अखेर व्हायचं तेच झालं. ज्या मुखातून आजवर समाजमनांत, जातीजातींत द्वेष प्रसवला गेला, त्या मुखातून गीतापठण झाल्यावर, शेवटी व्हायची ती फजिती झालीच.

 

महाराष्ट्रातील तथाकथित ‘जाणत्या राजा’चे पट्टशिष्य सध्या भलतेच सैरभैर झालेले दिसतात. कारण, मुळात त्यांचा गुरूच सैरभैर झाला आहे. मग गुरूपासून शिष्यांपर्यंत सारा संप्रदायच आता वाट्टेल तिथे, वाट्टेल तसं अद्वातद्वा बोलू लागला असून त्यामुळे आधीच दुरावलेला सत्तासोपान या नसत्या उठाठेवींमुळे त्यांच्यापासून अधिकाधिक दूर जाऊ लागल्याचं दिसतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या, पेशवाईच्या, स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांच्या इतिहासाला ओरबाडण्यापर्यंत आजवर या उठाठेवी मर्यादित होत्या. तेवढ्यावर समाधान न झाल्याने आता ही मंडळी थोरल्या साहेबांच्या कृपाशीर्वादाने थेट भगवद्गीतेपर्यंत पोहोचली आहेत. गुरुवारच्या घटनेचंच उदाहरण बघा. देशाचे भावी पंतप्रधान शरद पवार यांच्या पक्षाचे महत्त्वाचे आधारस्तंभ असलेले, महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अजित पवार (की सुप्रिया सुळे?) यांच्या मंत्रिमंडळात ब्राह्मणनिर्मूलन व गाझापट्टी पुनरुज्जीवन खात्यांचे मंत्री असलेले, पुरोगामीभूषण जितेंद्र आव्हाड यांनी आजवरच्या आपल्या कारकिर्दीला काळिमा फासत चक्क भगवद्गीतेतील श्लोक म्हणण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, त्याआधी त्यांनी भगवद्गीता तोंडपाठ असल्याचा दावाही केला आणि एका पत्रकाराने भगवद्गीतेतील काही ओळी दोन मिनिटं तरी म्हणून दाखवा, असं आव्हान देताच आव्हाडसाहेबांची ‘फेफे’ उडाली. आपली ‘फेफे’ उडाली आहे आणि ती राज्यभरात पोहोचली आहे, हे लक्षात येताच त्यांनी अखेर नेहमीप्रमाणे आपल्या भात्यातील ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. हे अस्त्र म्हणजे अर्थातच जात! फेसबुकवर लाइव्ह व्हिडिओ करून, त्या पत्रकाराच्या आडनावावर विशेष जोर देत, ‘हा कसा बहुजनांवर अन्याय’ वगैरे नेहमीची बांग आळवली परंतु, थेंबाने गेलेली हौदाने येत नाहीच (अजितदादांना हे चांगलंच ठाऊक आहे !). त्यामुळे अखेर व्हायचं तेच झालं. ज्या मुखातून आजवर समाजमनांत, जातीजातींत द्वेष प्रसवला गेला, त्या मुखातून गीतापठण झाल्यावर शेवटी व्हायची ती फजिती झालीच.

 

आपण जोशात आलो होतो आणि त्यामुळे आपल्या तोंडून ‘यदा यदाही..’ ऐवजी ‘यदा यदासी..’ आलं, असं स्पष्टीकरण मग आव्हाडांनी दिलं. हे स्पष्टीकरण अमान्य करण्याचं काहीच कारण नाही. अनेक गोष्टी इकडच्या तिकडे करण्यात हातखंडा असलेल्या पक्षात आव्हाडांसारख्या एखाद्याकडून एक अक्षर इकडचं तिकडे झालं तर त्यात वावगं काहीच नाही परंतु, जोशात येऊन थेट अख्खी गीता तोंडपाठ असल्याचा दावाच आव्हाडांनी केला. एवढा जोश? अतिजोश दाखवणाऱ्यांचं थोरले साहेब काय करतात काय करतात, हे इतक्या वर्षांत आव्हाडांना समजलं नाही काय? असेच एक अतिजोश दाखवणारे नुकतेच ‘बाहेर’ आलेत, त्यांना वाटल्यास आव्हाडांनी विचारून घ्यावं. किंबहुना, ते बाहेर आल्यामुळे आता आपलं काय होणार, या भीतीने आव्हाड अधिक जोशात आले, हे समजायला मार्ग नाही. कारण, एकाच वेळी ओबीसींचा नेता, त्याचवेळी मुंब्र्यातील मुस्लिमांचा नेता, त्याचवेळी पुरोगामी महाराष्ट्राचा आधारस्तंभ अशा अनेक दगडांवर आव्हाड गेली कित्येक वर्षं पाय ठेऊन उभे आहेत. कधी दहीहंडीच्या नावाखाली स्थानिक राजकारणात हातपाय मार, कधी मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळ, कधी महाराष्ट्राच्या इतिहासावर ब्राह्मणद्वेषाची चिखलफेक कर, कधी डाव्या विचारांच्या व्यासपीठावर जाऊन हिरोगिरी कर, असं बरंच काय काय आव्हाड अगदी मन लावून करत असतात. कारण दुसरं त्यांच्याकडे करण्यासारखं काहीच नाही. विकासात्मक राजकारणाची काहीही दृष्टी नाही, संघटनात्मक कौशल्य नाही, वक्तृत्वासाठी तोंड उघडलं तरी त्यातून जातीयतेचा दर्प, त्यामुळे मग बाकी करण्यासारखं जे उरतं, ते आव्हाड करत राहतात.

 

छगन भुजबळ कारावासात गेल्यानंतर ओबीसी नेतृत्व म्हणून कुणाच्यातरी भाळी टिळा लावणं पवारांना गरजेचं होतंच, कारण भुजबळांचं अर्थकारण कितीही छातीत धडकी भरवणारं असलं, तरी त्यांचं संघटनकौशल्य, वक्तृत्व, राजकारणाचा आवाका याबाबतीत कोणीही शंका घेणार नाही. भुजबळांशिवाय राष्ट्रवादीचा ‘मराठाकेंद्री तोंडावळा’ अगदीच उघडा पडू लागला. गोपीनाथराव मुंडेंपासून ते एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, भाऊसाहेब फुंडकर, अलीकडे पंकजा मुंडे अशा अनेक दिग्गज नेत्यांमुळे भाजपकडे आधीच एकवटलेला ओबीसी समाज भुजबळ ज्याप्रकारे बाजूला टाकले गेले, ते पाहून अधिक जोमाने भाजपकडे एकवटू लागला. निवडणुकांमध्येही त्याचं प्रतिबिंब दिसू लागलं. राष्ट्रवादीकडे असं कुणीच नव्हतं. ‘धनुभाऊं’ना पुढे आणलं तरी पंचाईत. त्यामुळे मग आव्हाड अधिकाधिक वेगाने पुढे आणले गेले. एकीकडे फार मोठा कुणीतरी अभ्यासू वगैरे असल्याचा आव आणण्याची आणि दुसरीकडे सतत काही ना काही टिवल्याबावल्या करून या ना त्या कारणाने चर्चेत राहण्याची कला आव्हाडांना चांगलीच अवगत आहे. त्यातच, ‘ब्राह्मण वि. ब्राह्मणेतर’ असा वाद पेटवून त्यातच हळूच आपलं ‘मराठकेंद्री’ राजकारण पुढे सरकवायचं ही पवारांची गेल्या काही वर्षांतील गरज. यासाठी आव्हाड उपयोगी पडू लागले. कधी बाबासाहेब पुरंदरेंना विरोध कर, कधी शिवकालीन इतिहासातून काही ना काही काढून त्यावरून वादंग निर्माण कर, हे ब्राह्मणी-ते ब्राह्मणी असं प्रत्येक गोष्टीवर शिक्के मारत फिर, तर कधी डाव्यांच्या, तथाकथित पुरोगाम्यांच्या आणि अगदी कम्युनिस्टांच्या व्यासपीठावर जा, हे सगळं आव्हाड करतात. मध्यंतरी दोन-अडीच वर्षांपूर्वी पुण्यात त्या कन्हैय्याकुमारच्या कार्यक्रमात आव्हाडांना त्या संघटनांनी व्यासपीठावर बसूही दिलं नाही, अक्षरशः खाली उतरवलं. फर्ग्युसन महाविद्यालयात महाविद्यालयीन पोरांकडून फटके खावे लागले. तरीही, आव्हाड तसेच राहिले.

 

आता या भगवद्गीता वादाच्या निमित्ताने आव्हाडांनी पुन्हा एक नवा वाद ओढवून प्रसिद्धीचा झोत मिळवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु तो यशस्वी होणार नाही. आव्हाडांनी फेसबुक लाइव्ह करून जातीय गरळ ओकल्यानंतर त्या व्हिडिओवर समाजातील सर्व स्तरांतून ज्याप्रकारे आक्रमकपणे प्रतिक्रिया व्यक्त झाल्या, त्यातून हेच लक्षात येतं. कारण आव्हाड समजतात तेवढा समाज मूर्ख नाही. तो सगळं शांतपणे पाहतो आणि अखेर शांतपणे प्रत्येकाला आपापली जागा दाखवतो. आता आव्हाड हळूच कदाचित भगवद्गीता आणि राज्यघटना असाही नवा वाद सुरू करतील. ब्राह्मणी-अब्राह्मणी वगैरे फुत्कार सुरू होतील. परंतु, त्याने काहीही फरक पडण्यातला नाही. मुंब्र्यात एक, कळव्यात एक, पुण्या-मुंबईत एक आणि उर्वरित महाराष्ट्रात एक असे वेगवेगळे अवतार आणि त्यामागचा बोलविता धनी लोकांच्या लक्षात आला आहे. वास्तविक पाहता, आव्हाडांना भगवद्गीता मुखोद्गत करण्यास, तिचं पठण करण्यास, अगदी जाहीर वाचनाचे कार्यक्रम वगैरे घेण्यासही कुणी बंदी घातलेली नाही. त्यांनी ते जरूर करावं परंतु, केवळ आपल्या घाणेरड्या राजकारणाकरिता गीतेच्या पावित्र्याला डाग लावण्याचा प्रयत्न आव्हाड करणार असतील, तर दरवेळी त्यांची अशीच फजिती होत राहील. कारण, त्यांचा हेतू आणि नियत साफ नाही, हे साऱ्या जगाला कळून चुकलं आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाची भगवद्गीता कंसाच्या तोंडी न आलेलीच बरी.

@@AUTHORINFO_V1@@