एबी फॉर्म चुकला: शिवसेनेचे २ उमेदवार अपक्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018
Total Views |

भापसे, सोनवणे यांना फटका, अपक्षांचेही अर्ज त्रुटींमुळे बाद

 
जळगाव :
जळगाव मनपा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी गुरुवारपासून सुरू झाली. यात पहिलाच झटका शिवसेनेच्या दोन अधिकृत उमेदवारांना बसला. जिजाबाई भापसे आणि विक्रम (गणेश) किसन सोनवणे यांचे एबी फॉर्म बाद झाल्याने त्यांना आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे.
 
 
उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या अर्जांची छाननी हा टप्पा महत्त्वाचा आणि निर्णायकही असतो. यावेळी अनुभवी व ज्येष्ठ सदस्यही नकळत घडलेल्या चुकांमुळे निवडणूक प्रक्रियेतून बाद होतात. तसाच प्रकार शिवसेना सदस्यांच्या बाबतीत घडला.
 
 
प्रभाग क्रमांक १९ (ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून - विक्रम (गणेश) किसन सोनवणे आणि (क) सर्वसाधारण महिला गटातून - जिजाबाई अण्णासाहेब भापसे यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून आपले अर्ज दाखल केले आहेत. त्यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आले पण नेमकी त्यातच चूक झाल्याने आता या दोघांनाही अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरावे लागणार आहे. उमेदवारांनी चूक दुरूस्त करण्याची संधी मिळावी, अशी विनंती निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना केली. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. अधिकार्‍यांनी आमच्या हातात नसल्याचे सांगितले, अशी माहिती जिजाबाई भापसे यांचा मुलगा सुरेशराव अण्णासाहेब भापसे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
चूक काय झाली?
सोनवणे यांच्या अर्जाला सौ. विक्रम (गणेश) किसन सोनवणे तर जिजाबाई भापसे यांच्या अर्जाला अण्णासाहेब आसराजी भापसे या नावाचा एबी फॉर्म जोडण्यात आला. त्यामुळे निवडणूक अधिकार्‍यांनी हे दोनही एबी फॉर्म बाद केले.
६३ अर्ज अवैध
भाजपा आणि शिवसेना युतीचे संकेत, त्यामुळे उफाळलेले पक्षांतर्गत वाद, उमेदवारांची अधिकृत यादी वेळेत जाहीर करण्यात सर्वच पक्षांना आलेले अपयश आणि निष्ठावंतांची ऐनवेळी कापण्यात आलेली तिकीटे यासारख्या अतिशय नाट्यमय घडामोडींमुळे महापालिका निवडणूक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होत असून, गुरुवारी नामनिदशनपत्रांच्या झालेल्या छाननीत अनेकांचे अर्ज बाद झाले. अर्जावर सूचक व अनुमोदक यांच्या स्वाक्षरी नसल्यापासून ते निवडणूक खर्च सादर न केल्याची कारणे यात आहेत. प्रभाग क्रमांक १, २, ३, १३, १४, १५ व १९ मध्ये एकूण २१५ नामनिर्देशनपत्र दाखल होते. त्यापैकी १५२ वैध तर ६३ अवैध ठरले आहेत.
 
दुसर्‍या व पाचव्या मजल्यावर छाननी प्रक्रिया
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अंतिम दिवशी बुधवारी (दि.११) तब्बल पाचशेवर अर्ज महापालिका दप्तरी दाखल झाले. मुदतीअखेर दाखल अर्जांची एकूण संख्या ६१५ असून, त्यांच्या छाननीचे काम गुरुवारी सकाळपासून सुरू झाले. दुसर्‍या व पाचव्या मजल्यावर अर्ज दाखल करण्याच्या ठिकाणीच छाननीची व्यवस्था करण्यात आली होती. उमेदवारांसह त्यांचे नातेवाईक व मित्रमंडळींनी मोठ्या संख्येने महापालिकेत गर्दी केली होती. दुसर्‍या मजल्यावर तर सकाळी ११.३० ते १२ वाजेपर्यंत पाय ठेवायलाही जागा नव्हती. सभागृहाच्या बाहेर नुसता कलकलाट, गोंगाट होता. मधूनच ध्वनीक्षेपकावरून केली जाणारी घोषणा ऐकू येत होती. सभागृहात अनेक उमेदवार आपल्या क्रमांकाच्या प्रतीक्षेत बसले होते. विशेष म्हणजे इथेही राजकीय भेटीगाठी व खलबते सुरू होती.
 
उशिरापर्यंत गर्दी
दुसर्‍या मजल्यावरील गर्दी दुपारी दोन वाजेनंतर कमी झाली. मात्र, पाचव्या मजल्यावर सायंकाळी सहा वाजेनंतरही छाननी सुरू होती. त्यामुळे इथे गर्दी होती. अनेक उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते जिन्यात बसून होते. महापालिकेने पाचव्या मजल्यावर प्रतिक्षालय अथवा आसनव्यवस्था केली नसल्याबद्दल मनोज आहुजा यांनी नाराजी व्यक्त केली.
चूक दुरुस्त करण्याचे बुधवारपासून प्रयत्न, तरीही घोळ
शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांची यादी बुधवारी पत्रपरिषद घेऊन जाहीर करण्यात आली. या यादीत प्रभाग क्रमांक १९ मधील उमेदवारांच्या नावात चूक झाल्याचे लक्षात येताच ती दुरुस्त करून घेण्याचे तत्परतेने सांगण्यात आले. प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींनी आपल्याजवळील यादीत सुधारणा करून घेतली पण शिवसेनेच्या यादीत ही चूक तशीच राहून गेली आणि तीच एबी फॉर्ममध्ये उमटली.
मतदारयादीत वेगळे नाव आढळल्याने खुबचंद साहित्या यांच्या अर्जावर हरकत
प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक व शिवसेनेचे प्रभाग क्रमांक १६ (ड) मधील अधिकृत उमेदवार खुबचंद प्रेमचंद साहित्या यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवार मनोज आहुजा यांनी हरकत घेतली. आहुजा यांचे वकील बी. पी. साळी यांनी ‘तरुण भारत’ला सांगितले की, साहित्या यांनी खुबचंद प्रेमचंद साहित्या व प्रेमचंद खुबचंद साहित्या या नावाने दोन अर्ज दाखल केले होते. पण मतदारयादीत त्यांचे नाव प्रेमचंद खुबचंद साहित्या असे आहे. या नावाची व्यक्ती व कोणतेही अधिकृत कागदपत्र अस्तित्त्वात नसल्याने साहित्या यांचा अर्ज बाद करावा, अशी मागणी आहुजा यांची होती. त्यावर सुनावणी होऊन निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी तक्रार फेटाळली आणि साहित्या यांचा अर्ज मंजूर केला.
सूचक व अनुमोदकांची स्वाक्षरी नसल्याने अर्ज बाद
प्रभाग क्रमांक १४ (ड) मधील उमेदवार दिनेश तिलोकचंद लोटवाणी यांच्या अर्जावर सूचक व अनुमोदक यांची स्वाक्षरी नसल्याने तर मुविकोराज कोल्हे यांनी निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न केल्याने त्यांचा अर्ज बाद ठरला.
प्रभाग क्रमांक ४ (ड) मधील मो. खालीद मो. हमीद बागवान यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बागवान यांना सप्टेंबर २००१ पूर्वी तीन अपत्ये तर सप्टेंबर २००१ नंतर एक अपत्य आहे. त्यांनी सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेल्या अपत्याची माहिती दडविली असल्याची तक्रार याच प्रभागातील अपक्ष उमेदवार दीपक माळी यांनी दुपारी साडेचार वाजता महापालिकेत दाखल केली. त्यावर अद्याप सुनावणी झाली नसल्याची माहिती मिळाली.
थकबाकी नसणे प्रमुख निकष
नो ड्यूज, शौचालयाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र (व्हॅलिडिटी) किंवा टोकन, सूचक व अनुमोदक यापैकी एकात त्रुटी आढळल्यास अर्ज बाद होण्याची उमेदवारांना भीती होती. महापालिकेची कोणत्याही स्वरुपाची थकबाकी नको हा प्रमुख निकष असल्याचे भाजपाचे सरचिटणीस दीपक सूर्यवंशी यांनी सांगितले.
प्रक्रियेत हवा होता एकसारखेपणा
दुसर्‍या व पाचव्या मजल्यावर प्रभागनिहाय अर्ज छाननी सुरू होती. पण या प्रक्रियेत एकसारखेपणा नसल्याचे भाजपाचे विशाल त्रिपाठी यांनी सांगितले. दुसर्‍या मजल्यावर अ, ब, क, ड यानुसार एकेका उमेदवाराला अर्जाची छाननी करण्यासाठी निवडणूक अधिकार्‍यांच्या कक्षात (आर.ओ.) बोलाविले जात होते. पाचव्या मजल्यावर मात्र, सर्वच गटांतील उमेदवारांना एकदम बोलावले जात असल्याचे विशाल त्रिपाठी यांनी सांगितले.
अर्ज छाननीत प्रत्येकाच्या चेहर्‍यावर बदलत होते भाव
उमदेवाराला साधारण १० ते १५ मिनिटे लागत होती. अनुभवी किंवा नवखा उमेदवार काय? प्रत्येकाच्या चेहर्‍यावर तणाव स्पष्टपणे दिसत होता. त्यांना धीर देण्याचे काम नातेवाईक, मित्रमंडळी व कार्यकर्ते नेटाने करीत होते. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कक्षात जाऊन आल्यानंतर मात्र, अनेकांच्या चेहर्‍यावर ‘एकदाचे सुटलो’ असा भाव उमटत होता, तर अर्ज बाद झालेल्यांचे चेहरे उतरल्याचे दिसत होते.
जयश्री उमेश पाटील यांची भाजपातून हकालपट्टी
भाजपाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत जयश्री उमेश पाटील यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षविरोधी कारवाया तसेच पक्षाची बदनामी केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. त्यांना सर्व जबाबदार्‍यांमधून मुक्त करण्यात आले असल्याचे पक्षातर्फे कळविण्यात आले आहे. बैठकीस ना. गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे, विभाग संघटनमंत्री किशोर काळकर, आ. चंदूभाई पटेल, जिल्हा संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, जिल्हा सरचिटणीस दीपक सूर्यवंशी, महेश जोशी, राजेंद्र पाटील हे उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@