सतीश चिखलीकर ठरला केवळ संशयित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2018
Total Views |

 


 
 
१८ कोटींच्या लाच प्रकरणातील मुळ तक्रार गायब
 

नाशिक : राज्यभर गाजलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांच्यावरील अठरा कोटींच्या संशयास्पद मालमत्तेच्या खटल्यातील मूळ तक्रारच गहाळ झाली आहे. न्यायालयाच्या कस्टडीत ही प्रत नसल्याने त्यात कायदेशीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पोलिसांनी अभियंता चिखलीकर यालाच संशयित म्हणून नोंदविल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. यामुळे संशयाचा फायदा मिळून मुख्य आरोपी असलेला सतीश चिखलीकर सुटण्याची शक्यता बळावली आहे.

 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यावर लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाची कारवाई नवी नाही. मात्र २०१३ मध्ये नाशिकच्या सतीश चिखलीकर याला २२ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. त्याच्या अटकेनंतर जे घबाड सापडले होते, त्याने संपूर्ण महाराष्ट्रालाच हादरे बसले होते. त्यातच राज्यभरात अभियंता चिखलीकर याच्या तब्बल ७८ ठिकाणी मालमत्ता सपडल्या होत्या. सापडलेल्या एकूण मालमत्तेची मोजदाद झाली असता १८ कोटींची बेहिशोबी मालमत्ता चिखलीकर याच्याकडे आढळून आली होती. लाच घेणे आणि बेहिशोबी मालमत्ता जमविणे, असे दोन खटले एकत्रितरित्या चिखलीकर याच्यावर सध्या चालू होते. ही मालमत्ता काही राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याची चर्चाही पसरली होती. नाशिक न्यायालयात अद्याप हा खटला सुरू आहे.

 

मात्र काल तो अचानक चर्चेत आला. या खटल्याच्या फाईलमधील मूळ तक्रार गहाळ असल्याचे आढळले. याबाबत माहिती मिळाल्यावर संबंध न्यायालयीन यंत्रणा हादरली आहे. न्यायालयाने त्याची माहिती सरकारवाडा पोलीस स्टेशनला कळविली. त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात न्यायालयीन कर्मचार्यांसह अभियंता सतीश चिखलीकर यालाही संशयित आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या खटल्याला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

 

पद्मनाभन मंदिरापेक्षा जास्त संपत्ती?

 

चिखलीकर याला अटक झाली, तेव्हा केरळमधील पद्मनाभन मंदिरातील भुयारातून अनेकविध प्रकारची संपत्ती आढळली होती आणि चिखलीकर याचीही महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात असणाऱ्या बँक लॉकरमधून संपत्ती बाहेर पडत होती. त्यामुळे पद्मनाभन मंदिरापेक्षा जास्त संपत्ती चिखलीकरकडे आहे की काय? अशी चर्चा नाशिकमध्ये रंगली होती.

 

रोज खर्च करायचा केवळ १०० रुपये

 

चिखलीकर याला अटक झाल्यानंतर त्याचे राहणीमान आणि त्याचे दैनंदिन जीवन याचे अनेक किस्से चर्चिले गेले. पोलीस चौकशीत त्याने आपण दिवसाला केवळ १०० रुपयेच खर्च करतो, असे सांगितले होते. त्यामुळे एवढ्या संपत्तीचे चिखलीकरला करायचे तरी काय होते? हा प्रश्न सर्वांना भेडसावत होता.

 

बाहुबली आले होते चर्चेत

 

नाशिकचे बाहुबली नेते त्यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते सांभाळत होते. त्यामुळे चिखलीकरच्या माया जमविण्याच्या उद्योगामागे त्यांचे ‘भुज’ होते का? त्यामुळेच चिखलीकरला ‘बळ’ मिळाले का? अशी चर्चा नागरिकांत रंगली होती.

@@AUTHORINFO_V1@@