पावसाळी पर्यटनात पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करा : मंत्री जयकुमार रावल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2018
Total Views |

व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला जिल्ह्यांचा आढावा
पावसाळी पर्यटन स्थळांवर हेल्पलाईन नंबरचे फलक लावण्याचे निर्देश

 
 
नागपूर, १२ जुलै :
पर्यटन स्थळांवर पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी होते. अशा स्थितीत पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत स्थानिक प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र येथे व्हिडियो कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांशी संवाद साधला. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त स्मर्तना पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत हेडे आदी उपस्थित होते.
 
 
यावेळी बोलतांना पर्यटन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, राज्यातील विविध जिल्ह्यात १०० टक्केहून अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर अपेक्षित पाऊस पडल्याने पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे पर्यटन स्थळांवर पर्यटकांची सुरक्षितता बाधित होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
 
 
प्रत्येक जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने हेल्पलाईन नंबर असलेले फलक दर्शनी भागात लावावे. धबधबे तसेच पाण्याच्या ठिकाणी असणार्‍या पर्यटन स्थळाजवळ पार्किंग व्यवस्था, आपातकालीन आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी एसओपी तयार करावा. पर्यटन स्थळावर खानपान तसेच पिण्याच्या पाण्याची अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने पावसाळ्याच्या काळात नियमित तपासणी करावी. किनारपट्टी क्षेत्रातील पर्यटनस्थळावर धोकादायक स्थळाचे माहिती फलक लावावेत, अशा सूचना पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या.
 
 
अपर जिल्हाधिकारी हे पर्यटन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यांनी जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एनडीआरएफ व एसडीआरएफच्या नियमित बैठकी घेऊन करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घ्यावा. याशिवाय पोलीस प्रशासनाने देखील पर्यटन क्षेत्रात सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून कार्य करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. पर्यटन स्थळांवर लावण्यात येणार्‍या सूचनांचे पर्यटकांनी काटेकोर पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही रावल यांनी यावेळी केले.
 
 
रायगड जिल्ह्यातील जंगल तसेच किल्ल्यावर ट्रेकींग करणार्‍या पर्यटकांसाठी गावातील सुशिक्षीत ५० युवकांचा चमू तयार करण्यात आला आहे. या चमुद्वारे ट्रेकींगसाठी येणार्‍या प्रत्येक पर्यटकांची नोंदणी करणे, तसेच त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्याचे काम करण्यात येत आहे. या माध्यमातून गावातील युवकांना रोजगार देखील उपलब्ध झाला असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली. रायगड येथे रोजगारक्षम पर्यटन विकासाला चालना देण्यात आल्याबद्दल पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हाधिकारी यांचे अभिनंदन केले.
 
 
यावेळी रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सिंधूदुर्ग येथील जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांनी लाईफ गार्ड, होमगार्ड कर्मचार्‍यांची संख्या वाढविणे यासंदर्भात मागणी केली. याशिवाय पुणे येथील पोलीस उपायुक्त सुर्यवंशी यांनी जिल्ह्यात पर्यटन पोलीस स्टेशन स्थापनेसाठी शासनाच्या वतीने परवानगी द्यावी, अशी विनंती केली. या सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री रावल यांनी सांगितले
 
@@AUTHORINFO_V1@@