मुख्याध्यापकांची बदली रद्दसाठी शाळेला ठोकले कुलूप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2018
Total Views |

दहिवद विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रशासन विचार करेल काय?- ग्रामस्थ

 
चाळीसगाव :
तालुक्यातील दहिवद येथे राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापकांची झालेली बदली रद्द करावी, या मागणीसाठी दहिवद ग्रामस्थांनी माध्यमिक शाळेलाच कुलूप ठोकले होते. याप्रकरणी ३ दिवसही उलटूनही अद्यापही कुलूप असल्याने शाळा बंद आहे. जोपर्यंत मुख्याध्यापकांची बदली रद्द केली जात नाही, तोपर्यंत कुलूप उघडणार नाही, असा पवित्रा पालकांसह ग्रामस्थांनी घेतला आहे. विद्यार्थ्यांनी देखील हिच मागणी लावून धरली आहे.
 
 
याबाबत तीन दिवसांपासून शाळा व्यवस्थापनाकडून कुठलाही तोडगा काढण्यात न आल्याने सलग तीन दिवस शाळेचे कामकाज बंद राहिले. विद्यार्थ्यांना कुलुप पाहून घरी माघारी परतावे लागले. सकाळी ११ ते ५ वाजेदरम्यान पाचवी ते दहावीचे वर्ग भरतात. या शाळेत परिसरातील ६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ईश्वरलाल अहिरे हे मुख्याध्यापक आहेत.
 
 
त्यांच्या काळात या शाळेत अनेक सुधारणा झाल्या. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होऊन त्यांचे अध्ययन सुधारले होते. विद्यार्थ्यांना चांगली शिस्त लागली होती. संस्थेने मुख्याध्यापक ईश्वरलाल अहिरे यांची अचानक तालुक्यातील गणेशपूर येथे बदली केली. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकार्‍यांची भेट घेऊन झालेली बदली त्वरीत रद्द करा, अन्यथा शाळेला कुलूप ठोकू, असा इशारा दिला होता.
 
 
यासंदर्भात कुठलीही दखल न घेतल्यामुळे सरपंच भीमराव पवार, उपसरपंच भीमराव खलाणे, हिंमत निकम, गोरख पवार, नितीन बागूल, दिलीप वाघ, गौरव पाटील, दिशा चिंतामण पाटील, गुलाब वाघ, जिभाऊ जाधव, संभाजी देवरे, शांताराम पवार, नवल पवार, भाईदस बोरसे, बबलू पवार, गोरख पवार, शरद पवार, अमोल वाघ, नितीन बागुल, मधुकर देवरे व पालक, ग्रामस्थांनी सोमवारी शाळेच्या प्रवेशव्दाराला कुलूप ठोकले होते.
 
 
जाणीवपूर्वक बदली केल्याचा आरोप
तालुक्यात कुठेही बदल्या नसताना व काहीही कारण नसताना जाणीवपूर्वक ही बदली करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. सकाळी विद्यार्थ्यांची शाळेत येण्यास सुरुवात झाली. परंतु, प्रवेशद्वारालाच कुलूप असल्याने शिक्षक व विद्यार्थी तेथेच थांबले. आज तिसर्‍या दिवशीही कुलूप न उघडल्याने विद्यार्थी घराकडे परतले. याबाबत शाळा व्यवस्थापन व ग्रामस्थांमध्ये चर्चा होऊन तोडगा निघेल अशी अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
 
 
तर प्रशासन जबाबदार...
प्रशासनाला अद्याप जाग येत नसल्याने परिसरातील हजारो गांवकरी आक्रमक झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असे ग्रामस्थांनी ठणकावून बजावले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@