शहर विकासासाठी युतीचा प्रस्ताव, पण नंतर ना. महाजनांकडून संपर्कच नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2018
Total Views |

सुरेशदादा जैन यांनी स्पष्ट केली स्थिती, शिवसेना लढविणार सर्व जागा

जळगाव :
शहर विकासासाठी जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपाशी युती करण्याचा प्रस्ताव दिला होता पण नंतर ना. गिरीश महाजन यांच्याकडून संपर्कच झाला नाही. भाजपाच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करून अखेर शिवसेनेने १९ प्रभागात ७५ उमेदवार दिले असल्याचे माजीमंत्री
 
 
सुरेशदादा जैन यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले. या उमेदवारांची अधिकृत यादी यावेळी जाहीर करण्यात आली. माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील, माजी महापौर विष्णु भंगाळे, माजी उपमहापौर सुनील महाजन, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे आदी पत्रपरिषदेला उपस्थित होते.
 
 
युतीचा प्रस्ताव देण्यामागील भूमिका स्पष्ट करताना माजी महापौर रमेशदादा जैन म्हणाले की, शहरविकासात अडथळा नको म्हणून राज्यात विरोधी पक्षाचे सरकार असले तरी खाविआची समन्वयाची भूमिका होती. आमच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी होकार देत पुढील जबाबदारी ना. गिरीश महाजन यांच्यावर सोपविली होती. परंतु ना. महाजन यांनी संपर्क ठेवला नाही. त्याचे उत्तर तेच देऊ शकतील. युतीची चर्चा बसून झालीच नाही. तसेच उमेदवारांवरील वातावरणाचा दबाव टाळण्यासाठी त्यांची अधिकृत यादी बुधवारी जाहीर केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
 
पक्षाच्या जाहीरनाम्याविषयी ते म्हणाले की, फेरीवाल्यांना रोजगार मिळावा या उद्देशाने कायमस्वरुपी योजना राबविली जाईल. समांतर रस्त्यांची समस्या सुटावी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संपर्कात सुरेशदादा आहेत. अमृत योजनेच्या अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले आहे. भूमिगत गटार योजनेची प्रक्रिया सुरू आहे. पुढील २० ते २२ वर्षात होणारी लोकसंख्या वाढ गृहित धरून विविध कामांचा समावेश जाहीरनाम्यात असेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक साकारण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न आहे. तरुण पिढीला संधी मिळावी म्हणून निवडणूक न लढविण्याचा निर्णय मी घेतला असल्याची माहिती रमेशदादा जैन यांनी दिली. पण शहरासाठी कार्यरत राहू, नवीन पिढीला मार्गदर्शन करत राहीन, असेही ते म्हणाले.
 
सुरेशदादा म्हणाले की, शहर विकासाच्या हेतूने महापालिकेत युती व्हावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. गिरीश महाजन यांनी भेटून केली होती. पण नंतर ना. महाजन यांच्याकडून संपर्क झाला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची बुधवारी अंतिम मुदत होती. भाजपाच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करून अखेर शिवसेनेने १९ प्रभागात ७५ उमेदवारांना संधी दिली. यात ५५ ते ६० टक्के युवा कार्यकर्त्यांचा समावेश आहे. आवश्यकता भासल्यास मी स्वतः निवडणूक प्रचारात सहभागी होईल. जिल्ह्यातील पदाधिकारी देखील वॉर्डात फिरणार असल्याचे सुरेशदादांनी सांगितले. निवडणुकीनंतर युतीबद्दल ते म्हणाले की, राज्यात शिवसेना आणि भाजपा मित्रपक्ष आहे. पुढे काय होणार हे आज सांगू शकत नाही. त्यामुळे ३ ऑगस्टनंतर बोलणे उचित ठरेल.
 
@@AUTHORINFO_V1@@