रामाविण मज चैन पडेना...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2018
Total Views |



राहुल गांधींच्या देवदर्शनानंतर सुरू झालेला हा रामायणाचा पाठ २०१९ च्या पार्श्वभूमीवरच पाहायला हवा. कारण, केरळमधली राजकीय समीकरणे या दोन पक्षांच्या भोवतीच फिरत राहिली आहेत.

 

रामाविण मज चैन पडेना, नाही जिवासी आराम,’ असे लहानसे भजन आहे. भीमसेन जोशींनी आपल्या उत्कट गायनशैलीने ते अजरामर केले. या भजनाचा संदर्भ आता लागू होण्याचे कारण म्हणजे, डाव्यांच्या अस्तित्वाचा शेवटचा टप्पा ठरलेल्या केरळमध्ये जे काही सुरू आहे ते. केरळ हे डाव्यांच्या हातातले शेवटचे राज्य. डाव्यांची धर्माविषयीची मते जगजाहीर आहेत. मार्क्सने तर धर्माला अफूची गोळीम्हणून बादच करून टाकले होते. कलियुगाचा प्रताप म्हणायचा की डाव्यांना उशिरा सुुचलेले शहाणपण, पण आता कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियानावाचा आणि पुन्हा कंसात मार्क्सवादीअसे विशेषण धारण करणारा पक्ष आता रामायणाचे पाठ करणार आहे. केवळ पाठ नव्हे, तर त्याचे जिल्हाश: कार्यक्रमही होणार आहेत. वस्तुत: मल्याळी जनता हे रामायणाचे पाठ गेले अनेक वर्षे करीत आहे. त्याला कारकिडकमअसे संबोधले जाते. कारकिडकमया नावावरून मल्याळीव्यतिरिक्त भाषा जाणणार्‍या मंडळींसमोर प्रश्‍नचिन्हच उभे राहण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे भाषा. मल्याळी कालगणनेनुसार वर्षातून एकदा हा पंधरवडा येतो. या पंधरवड्यात घरोघर रामायणाचे मल्याळी आवर्तन केले जाते. आता सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियायात सहभागी होणार आहे. केरळमधील १४ जिल्ह्यांत याचे कार्यक्रम होणार असून संस्कृत संगमनावाच्या संस्थेच्या माध्यमातून हे कार्यक्रम केले जाणार आहेत.

 

आता संस्कृत संगमही एखादी संघ परिवारातील संस्थाच वाटू शकते, मात्र असे मुळीच नाही. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने स्थापन केलेली ही संस्था आहे. सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्‍या विविध घटकांना जोडण्यासाठी ही संस्था गेल्या वर्षीपासून कामाला लागली आहे. गेल्यावर्षी भाजपच्या युवा मोर्चाच्या पहिल्या अधिवेशनानंतर केरळमध्ये भाजपच्या चलनवलनाला जोरदार सुरुवात झाली. भाषेमुळे अडलेले हे वादळ आता फार काळ आपल्या राज्यात येण्यापासून रोखता येणार नाही, याची पुरेपूर जाणीव आता कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाला झाली आहे. त्यासाठीच हे उद्योग सुरू झाले आहेत. केरळ तसेही भाजपसारख्या हिंदुत्व विचार मानणार्‍या राजकीय पक्षासाठी फारसे अनुकूल राहिलेले नाही. वरील वाक्य इतिहास ठरावा, अशी स्थिती आज भारतात आलेली आहे. शिक्षणाच्या बाबतीत आघाडीवर असलेले हे राज्य राजकीयदृष्ट्या काँग्रेस व कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाया दोनच पक्षांना आपले मतदान करीत आले आहे. याचे कारण या दोन्ही पक्षांनी बसविलेले आपले बस्तान. मल्याळी जनमानस रुढ अर्थाने धार्मिक व काहीसे कर्मकांडाकडेच झुकणारे असले तरीही त्याची राजकीय अभिव्यक्ती मात्र हे दोन राजकीय पक्षच राहिले आहेत. काँग्रेसला मिळालेली स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी व डाव्यांनी त्यावेळी तरुणांच्या डोक्यात भरलेली क्रांतीची भाषा, हेच या दोन पक्षांचे मूळ भांडवल. शेजारच्या तामिळनाडूमधील द्रविडी चळवळीचा बराचसा प्रभाव केरळवर पडला. केरळमध्ये बोलली जाणारी मल्याळम भाषा ही तामिळमधून आली असल्याचा दावा इथे केला जातो. त्यामागचा खरा तर्क ती संस्कृतमधून आलेली नाही, हा आहे. आजही मल्याळी भाषिक विचारवंतांमध्ये आपली भाषा संस्कृतमधून आलेली की तामिळमधून, यावर दोन गट आहेत आणि ते परस्परांसमोर उभे ठाकलेले दिसतात. मूळ मुद्दा असा की, इतकी सारी सोंगे करून भाजपला जे राजकीय यश मिळाले ते या पक्षांना मिळू शकेल काय?

 

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या आधी राहुल गांधींनी हे तथाकथित सॉफ्ट हिंदुत्वअवलंबायला सुरुवात केली होती. गुजरातच्या निवडणुकीमध्ये शेकडो मंदिरांच्या दर्शनानंतरसुद्धा गुजरातचा जनताजनार्दन काँग्रेसला पावला नाही. भाजपच्या हिंदुत्वाला मिळालेला प्रतिसाद हा अशा कर्मकांडांना मिळालेला नसून त्याला काही वैचारिक व राष्ट्रवादाचे अधिष्ठान आहे, हे या बावळटांना लक्षात येत नाही. अयोध्येचे आंदोलन आणि त्याला समग्र हिंदू समाजाने दिलेला दणदणीत पाठिंबा हा शाहबानो प्रकरणापासून चालत आलेल्या लांगूलचालनाच्या नीतींना दिलेला दणका होता. सत्ताप्राप्तीसाठी केलेले मुस्लिमांचे लांगूलचालन हा नव्वदीच्या राजकारणातला सर्वात मोठा चिंतेचा विषय होता. या सगळ्या काळात डाव्यांनी कुठलीही भूमिका घेतली नव्हती, उलट राममंदिराच्या मुद्द्यावर डावे काँग्रेससोबतच होते. धर्म ही अफूची गोळीहा मार्क्सचा सिद्धांत कोणत्या धर्माच्या संदर्भात आहे, याची चिकित्सा न करताच डावे या काँग्रेसच्या कच्छपी लागले होते. त्यामुळे जनमानसात जे काही खदखदत होते, त्यापासून ही मंडळी पूर्णपणे अलिप्त राहिली. महाआरत्या, यात्रा ही त्यासाठीची निमित्ते ठरली. राम मंदिराचे आंदोलन ही भाजपसाठी ठरलेली संजीवनी होती, हा डाव्या विचारवंतांचा लाडका सिद्धांत ते जसा मांडतात, तसा खरा नाही. भाजप यात्रेचा नैसर्गिक यात्री होता आणि तो ईप्सित ठिकाणी जाऊन पोहोचला. आता या मंडळींना वाटते की, अशा प्रकारच्या धार्मिक कर्मकांडांमधून आपल्यालाही सत्ताप्राप्तीचा मार्ग सापडू शकेल. राहुल गांधींनतर केरळमध्ये हे उद्योग सुरू व्हावेत, हा काही योगायोग नाही. कारण, केरळमधील राजकारण नेहमी याच दोन पक्षांमध्ये फिरत राहिले आहे. अगदी मोदी लाटेच्या २०१४ सालीसुद्धा देशभरात स्थिती वेगळी होती आणि केरळची स्थिती वेगळी होती. २००९ साली लोकसभेच्या २० पैकी १३ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. २०१४ साली काँग्रेसला ८ जागा मिळाल्या, तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाला ५. यात डाव्या विचारातून फाटाफुटीने निर्माण झालेल्या उमेदवारांनीही मोठी भूमिका निभावली आहे. राहुल गांधी तिथे येऊन पोहोचण्याआधी डाव्यांना आता काही ना काही करणे आवश्यक आहे. रामायण पाठाचा हा प्रयोग त्यांना किती यश मिळवून देतो ते येणारा काळच ठरवेल, परंतु यामुळे केरळमधील डाव्यांचा हिंदूविरोधी हिंसक चेहरा झाकला जाईल, असे मुळीच नाही.

@@AUTHORINFO_V1@@